computer

RT-PCR चाचणीत येणारी CT Value तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगते?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इतका विळखा बसलाय की आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव आहे. प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत आहेत. जशी लक्षणांची माहिती प्रत्येकाला झाली आहे तसेच काही मेडिकल टर्म्सही माहिती झाल्या तर गोष्टी सोप्या होतील. फक्त ताण न घेता त्याचा अर्थ नीट समजून घेतला तर योग्य मार्गदर्शन मिळायला मदत मिळेल. एकदा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आला की आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test)  करायला सांगतात. या टेस्टमध्ये असणारी CT Value म्हणजे नक्की काय? त्यात येणाऱ्या Valueचा अर्थ आज समजून घेऊयात.

RT-PCR चाचणीतील CT Value म्हणजे रुग्णातील विषाणूंची संख्या (Virus Load). CT Value मधून रुग्णाच्या शरीरात कोरोनाच्या विषाणूचा किती संसर्ग झाला आहे हे कळते. अमेरिकन असोसिएशन फॉर क्लिनिकल केमिस्ट्रीच्या म्हणण्यानुसार विषाणूचा RNA (viral RNA) सापडण्यासाठी जेवढी आवर्तने घ्यावी लागतात ती संख्या म्हणजे CT value होय. CT Value जितकी कमी तितका रुग्णाच्या नमुन्यात व्हायरल आरएनएची संख्या जास्त असते. जर एखाद्या रुग्णाची CT Value ३५ आली तर तर त्यास कोरोनाबाधित मानलं जात नाही. मात्र ही संख्या ३५ पेक्षा कमी असेल तर रुग्ण कोरोनाबाधित ठरतो.

जेव्हा CT Value कमी दर्शवली जाते, तेव्हा रुग्णाची स्थिती अधिक गंभीर आहे असं समजलं जातं. २३ ते ३५  दरम्यान संख्या असेल तर रुग्णाची स्थिती धोक्याबाहेर मानली जाते. २२ पेक्षा कमी संख्या असेल तर रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे गरजेचे आहे. जर ही संख्या १५ पेक्षा कमी असेल तर रुग्णाची स्थिती धोकादायक म्हणजे त्याला आक्सिजन बेडची गरज लागू शकते. १० पेक्षा कमी संख्या असेल तर आयसीयू बेडची आवश्यकता असू शकते. थोडक्यात CT Value मुळे रुग्णातील कोरोना संसर्गाच्या जोखीम किती आहे याचा अंदाज लावता येतो.

अर्थात ही संख्या म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नव्हे, कारण ही संख्या रुग्णाचे वय, जुने आजार, आताची लक्षणे या सर्व बाबींवर अवलंबून असते. रुग्णाकडून नमुना घेण्याची पद्धत, तेव्हाची वेळ यावरही या संख्येचे विश्लेषण अवलंबून असते. त्यामुळे घाबरून न जाता योग्य सल्ला घेऊनच पुढचे निर्णय घेणे योग्य राहील.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required