computer

उसाच्या रसात असतात हे औषधी गुण !!

उन्हाळ्यात भारतीयांचं सर्वात आवडतं ज्यूस म्हणजे उसाचा रस. उस पिळून काढलेला रस आणि त्यात थोडा लिंबाचा रस आणि बर्फ एवढं एकत्र केलं की देसी ज्यूस तयार होतो. उसाचा रस प्यायल्यावर उन्हात गारेगार वाटतं किंवा वर्षाच्या कोणत्याही महिन्यात प्यायलो तरी तरतरी येते. उसाच्या रसाचा एवढाच उपयोग आहे का? तर नाही. उसाच्या रसात काही औषधी गुणधर्म आहेत. ती कोणती ते आजच्या लेखात पाहूया.  

उसाचा रस म्हणजे शुद्ध  साखर नसते. उसाच्या रसात ७० ते ७५ टक्के पाणी, १३ ते १५ टक्के सुक्रोजच्या रूपातील साखर आणि १० ते १५ टक्के फायबर्स असतात. 

आता वळूया औषधी गुणांकडे. उसाच्या रसात शरीरासाठी गरजेचे असलेले फेनॉलिक आणि फ्लेवोनॉइड एंटीऑक्सिडेंट असतात. हे एंटीऑक्सिडेंट्स कॅन्सर होण्याचा धोका कमी करतात, तसेच तुमच्या DNA चं  रक्षण करून हृदयविकार आणि इतर गंभीर आजार होण्यापासून तुमचं रक्षण करतात.   

उसाच्या रसावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने ती एक जमेची बाजू ठरते. प्रक्रिया केलेली नसल्याने रसातील जीवनसत्व आणि खनिजे कायम राहतात. पोटॅशियम सारख्या खनिजामुळे तर व्यायामानंतर येणारी शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

काही महत्त्वाच्या गोष्टी

मधुमेह असेल तर उसाचा रस पिऊ नका. रस जर भांड्यात साठवून ठेवलेला असेल तर पिऊ नका. बर्फ न टाकता प्या. कारण बर्फामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.

तर मंडळी, पुढच्यावेळी उसाचा रस प्याल तेव्हा हे औषधी गुण नक्की लक्षात ठेवा.