computer

उचकी थांबवण्याचे ६ सॉल्लिड उपाय, यातला तुम्ही कोणता अंमलात आणता ?

असं म्हणतात की उचकी लागली म्हणजे कोणी तरी आपली आठवण काढत आहे. म्हणजेच एक प्रकारे ती व्यक्ती आपल्याला मिसकॉल देत आहे. पण काय हो, उचकी लागणे म्हणजे नेमकं काय होतं ? त्यापाठी कोणती करणं असतात ? आणि महत्वाचं म्हणजे उचकी लागल्यावर काय करावं ?

तुम्हाला माहित आहे ? नाही ? चला तर मग आम्हीच सांगतो.

उचकी का लागते ?

सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर उचकी लागणे म्हणजे विशिष्ट परिस्थितीला आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद उर्फ रिप्लाय. ही परिस्थिती म्हणजे जठरात आम्लाचे (अॅसिड) प्रमाण वाढणे, विषकारक पदार्थांची निर्मिती होणे किंवा अशाच प्रकारची असामान्य परिस्थिती निर्माण होणे. यामुळे होतं काय तर, छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होते व हवा फुफ्फुसात जाण्यास अडथळा निर्माण होतो. यावेळी जो विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो त्याला उचकी म्हणतात.

उचकी ही सर्वसाधारण आहे. कधीकधी ती सतत येत राहते. साधारणपणे ४ किंवा ५ वेळा उचकी येऊ शकते. पण काही वेळा ती एका मिनिटात ३० पेक्षा जास्त वेळा सुद्धा लागू शकते. उचकी जर महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागत असेल तर त्याला अडेलतट्टू उचकी म्हणतात.

चला तर आता वळूयात उचकीच्या उपायांकडे

उचकी लागल्यावर काय करावं ?

सर्वसाधारणपणे आपण उचकी लागल्यावर पाणी पितो. हा उपाय अगदी बरोबर आहे पण हे नॉर्मल उचकीच्या बाबतीत ठीक आहे ओ पण जर उचकी थांबतच नसेल तर काय करायचं ?

१. श्वास रोखून धरा

उचकी पाण्याने थांबू शकते पण काही वेळा ती काही केल्या बंदच होत नाही. अशावेळी मोठा श्वास घ्या आणि थोडावेळ श्वास रोखून धरा (एवढाही रोखू नका की श्वास कोंडेल). उचकी लागल्यावर फुफ्फुसात हवा जाण्यास अडथळा येत असल्याने तुम्ही जर श्वास रोखून धरला तर फुफ्फुसात पुरेशी हवा पोहोचून तुमची उचकी थांबू शकते. कधी कधी आपण जेवत असताना उचकी लागते. याचं कारण म्हणजे घाईघाईने जेवणे किंवा अचानक आलेला तिखट पदार्थ. यावर सुद्धा वरील उपाय उपयोगी पडतो.

२. गोड पदार्थ खा

गोड पदार्थाने उचकी थांबते याला वैज्ञानिक पुरावा नाही पण हा उपाय कामी येतो हे मात्र नक्की. साखर, चॉकलेट पावडर, किंवा शक्य झाल्यास मध खाल्ल्यास उचकी थांबते. साखरेबरोबर चार ते पाच काळ्या मिऱ्या तोंडात ठेवून चावल्यास आणि त्यावर पाणी प्यायल्यास त्वरित उचकी जाते.

३. आंबट पदार्थ खा

कैरी, चिंच. लिंबू, टोमॅटो यासारखे आंबट पदार्थ खाल्ल्याने देखील उचकी थांबते. एक चमचा लिंबाच्या रसाबरोबर एक चमचा मध एकत्र करून देखील तुम्ही खाऊ शकता.

४. मीठ किंवा मिठाचे पाणी

हा उपाय तुम्हाला अवघड वगैरे वाटू शकतो. एक चमचा मीठ तोंडात ठेवा. मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने उचकी थांबते पण जर तुम्हाला मीठ आवडत नसेल तर तुम्ही मिठाचं पाणी सुद्धा घेऊ शकता.

५. उलटे अंक मोजणे

उचकी लागली आणि तुमच्या आसपास पाणी किंवा काहीच उपाय नसतील तर उलटे अंक मोजा. अंक मोजताना श्वास रोखून धरल्यास आणखी फायदा होऊ शकतो.

६. गाणी लावा आणि नाचा

वरील उपायांबरोबरच काही इतर उपाय देखील तुम्ही करू शकता. उचकी लागल्यास तुम्हाला आवडतील ती गाणी ऐका आणि जर शक्य झालं तर नाचा सुद्धा. उचकीपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे राव.

 

राव, जर कधी उचकी लागलीच तर वरील उपाय नक्कीच करून बघा. आणि हो, दुसऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून ही पोस्ट नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required