computer

१ जुलैपासून प्लास्टिकच्या कोणत्या वस्तूंवर बंदी येतेय? यादी तर पाहून घ्या..

संपूर्ण जग प्लास्टिकच्या भस्मासुरासोबत लढा देत आहे. स्वस्त आणि टिकाऊ म्हणून आधी लोकप्रिय झालेल्या या मूलद्रव्याने हळूहळू सगळंच गिळंकृत केलं आणि लोकांना धोक्याची जाणीव झाली. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम वेगळे सांगण्याची गरज नाही. याचसाठी हळूहळू करत पूर्णपणे प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. सगळ्यांना 'कळतं' पण 'वळतं' याची खात्री देता येणार नाही. म्हणून सरकारकडून असे निर्बंध येणे उपयोगाचे ठरते.

गेली चार वर्षे सिंगल युज प्लॅस्टिक म्हणजेच एकदा वापर करून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमीकमी करत जाण्याच्या दृष्टीने नियम येत आहेत. १ जुलैपासून आता नवे नियम आले आहेत. या माध्यमातून आता यात अजून काही प्लॅस्टिक वस्तू आहेत, ज्यांच्या वापरावर पुढच्या महिन्यापासून पूर्णपणे बंधने येणार आहेत. प्लॅस्टिकपासून होणारे प्रदूषण, समुद्री जीवांना होणारे नुकसान, तसेच इतरही अनेक गोष्टींचा विचार करता प्लॅस्टिक वापर करण्यावर बंदी घालणे गरजेचे होऊन बसले आहे. याचमुळे खालील वस्तूंवर एक तारखेपासून बंदी असणार आहे.

१) प्लॅस्टिकची दांडी असलेले इयरबड्स
२) फुग्यांमध्ये लावली जाणारी प्लॅस्टिक स्टिक
३) आईसस्क्रीमची प्लास्टिक कांडी
४) घरात वापरले जाणारे थर्माकोल
५) सिंगल युज प्लॅस्टिक असणारे निमंत्रण पत्र
६) प्लॅस्टिक कप
७) प्लॅस्टिक प्लेट
८) प्लॅस्टिक चमचे, चाकू, स्ट्रॉ
९) मिठाईच्या डब्यावर लावले जाणारे प्लॅस्टिक रॅपर
१०) सिगरेट पॅकेट
११) १०० मायक्रोनपेक्षा कमी प्लॅस्टिक आणि पीव्हीसी बॅनर

या वस्तू आता तुम्हाला एक तारखेपासून बाजारात दिसणार नाहीत. या वस्तूंवर पूर्णपणे बंदी आहे का आणि याचा कुठे वापर तर होत नाही ना हे बघण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर कंट्रोल रूम तयार केल्या जाणार आहेत. तसेच स्पेशल इनफोर्समेंट टिम्स देखील या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर किंवा विक्री होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवणार आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार ज्या दुकानात पहिल्यांदा वरील प्लॅस्टिक सापडेल त्यांना ५०० रूपये, दुसऱ्यावेळेस १००० रुपये, तिसऱ्या वेळेस २००० रुपये दंड अशा पद्धतीने नियम लागू करण्यात आले आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required