३५ वर्षीय दिग्गजाने आजच्याच दिवशी खेळला होता शेवटचा सामना, ४०२ सामने अन् केल्या आहेत ११ हजार धावा..

क्रिकेटच्या इतिहासात ३० जून या तारखेला विशेष महत्व आहे. या दिवशी ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये स्टार भारतीय खेळाडूने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला होता. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. वनडे मालिकेतील तिसरा सामना सुरू होता, जो भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात भारतीय दिग्गज फलंदाजाने ५५ चेंडूंचा सामना करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. मात्र कोणीही असा विचार केला नव्हता ही खेळी दिग्गज फलंदाजाच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची खेळी ठरेल. तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून युवराज सिंग (Yuvraj Singh) होता. आजच्याच दिवशी (३० जून) २०१७ मध्ये त्याने आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता.

विराट कोहली त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता. विराटच्या नेतृत्वाखाली युवराज सिंगने आपल्या कारकिर्दीतील अंतिम सामना खेळला. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ५ वनडे सामन्यांची मालिका सुरू होती. ही मालिका भारतीय संघाने ३-१ ने आपल्या नावावर केली होती. तर झाले असे की, पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसरा वनडे सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला होता. मालिकेत आघाडी घेण्यासाठी तिसरा वनडे सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण, वेस्ट इंडिज संघ कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकत होता.

भारतीय संघाला या महत्वाच्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायचा होता. त्यामुळे युवराज सिंगने जबाबदारी स्वीकारत ५५ चेंडूंचा सामना केला आणि ४ चौकारांच्या साहाय्याने ३९ धावा केल्या होत्या. तसेच एमएस धोनीने ७८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटक अखेर ४ गडी बाद  २५१ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवण्यासाठी २५२ धावांचा डोंगर सर करायचा होता. मात्र वेस्ट इंडिजचे फलंदाज आर अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनी मिळून वेस्ट इंडिजच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव ३८.१ षटकात संपुष्टात आला. भारतीय संघाने तिसरा वनडे सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिकेत २-० ची आघाडी घेतली होती.

युवराज सिंग हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अंडर -१९ विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि टी -२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. इतकेच नव्हे तर या स्पर्धांमध्ये तो मालिकावीर देखील ठरला आहे. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय  कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४०२ सामन्यांमध्ये ११ हजार पेक्षा अधिक धावा केल्या. यादरम्यान त्याने १७ शतके आणि ७१ अर्धशतके झळकावली.

सबस्क्राईब करा

* indicates required