computer

शिकल्या सवरल्यांना गंडा घालून बरबाद करणारा राइस पुलर स्कॅम ! सांगलीतील सामूहिक आत्महत्येचे हे खरे कारण ? जाणून घ्या..डोळस व्हा आणि अशा गोष्टींना बळी पडू नका..

नुकत्याच टीव्हीवर झळकलेल्या एका बातमीने आख्खा महाराष्ट्र हादरवला होता! सांगलीमधील एका कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती! या घटनेने सांगलीकरच काय संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
एका सुशिक्षित कुटुंबाने हा असा निर्णय का घ्यावा हे ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यासाठी एक चक्रावून टाकणारे कोड़े होते. पोलीस तपासाची चक्रे फिरल्यानंतर प्राथमिक तपासाअंती पोलीसांच्या हाती आलेली माहिती अशी होती की वनमोरे कुटुंबीय कर्जबाजारी झाले होते आणि यातून सुटका होणे शक्य नाही या निष्कर्षापर्यंत पोहचल्यावर त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला होता.

हे संभ्रमात टाकणारे होते.

कर्ज कोणाला नसते? बरं घरातले कर्ते पुरुष चांगल्या नोकऱ्या करत होते. त्यामुळे गरीब शेतकऱ्याप्रमाणे कर्जबाजारी झाल्यावर हवालदिल होण्यासारखे ते असहाय्य नव्हते. मग आपली सुटका नाही असे वाटायला लावण्याइतपत असे किती कर्ज होते त्यांच्या डोक्यावर?
मृतांच्या खिशातील चिठ्ठ्यांवर लिहिलेली काही नावे आणि आसपास लोकांमध्ये चौकशीअंती समोर आलेल्या काही गोष्टींनी तपासाला वेगळीच दिशा दिली. वनमोरे कुटुंबीय कोणते तरी यंत्र विकल्यावर काही हजार करोड रूपये मिळण्याच्या गोष्टी मित्रवर्तुळात आणि नातेवाईकांत करत असल्याचे पोलीसांना समजले. एवढी मोठी रक्कम मिळून आपण अब्जपती होणार हा आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्या आत्मविश्वासाने अविचारीपणे मोठ्या व्याजदराने कर्ज घेण्याचा निर्णय घ्यावा अशी कोणती गोष्ट कारणीभूत होती? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात एक एक साखळी सुटत गेली आणि अविश्वसनीय अशी कित्येक सत्ये समोर आली. या आत्महत्येच्या प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्राबाहेरही पसरली आहेत याचा शोध लागला. वनमोरे यांच्याप्रमाणेच अशा अनेक केसेस उघडकीला आल्या ज्यात फशी पडलेल्या व्यक्तीने डोक्यावर झालेल्या कर्जाचे ओझे असह्य होऊन आत्महत्या केली होती.
 

तपासात असे निष्पन्न झाले की एक नवीन टोळी कार्यरत आ. ही टोळी छोटे व्यापारी, शेतकरी आणि मोठे व्यावसायिक यांना आपले टारगेट बनवत आहे. या लोकांनी समोरच्या ‘बळीच्या बकऱ्या'चा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी फुलप्रूफ प्लॅन बनवलेला असतो. हे लोक स्वतःला विविध भारतीय आणि परदेशी वैज्ञानिक संस्थांशी निगडीत असल्याचे भासवतात नि त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे नि ओळखपत्रे बनवलेली आहेत. BARC, ISRO, NASA, DRDO यांसारख्या नामवंत नि प्रतिष्ठित एजन्सीजचे प्रमाणपत्र दाखवले की समोरचा का जाळ्यात फसणार नाही? आपल्याकडे तांबे, इरिडियमपासून बनवलेले एक चमत्कारी यंत्र आहे हा दावा हे लोक करतात. या यंत्रात इरिडियम आणि रेडियमपासून बनवलेले असल्याने किरणोत्सर्गी गुणधर्मे आहेत हे सांगताना या यंत्राचा डेमो देताना ते रेडिएशनविरोधी कपड़ेदेखील घालतात.

त्यांच्या दाव्यानुसार हे राईस पुलिंग मशीन आहे. हे धान्य खेचणारे जादुई यंत्र आहे. ‘धनधान्याची भरभराट’ ही संकल्पना यामागे असावी. हे यंत्र आंतरराष्ट्रीय बाजारात आले की यूएस स्पेस एजन्सीज किंवा इतर जागतिक अवकाश संस्था हे यंत्र हजारो कोटींना विकत घेईल. या यंत्राचा एक इंच तुकडा अकरा कोटी इतक्या किमतीचा आहे, ही आणि अशी अनेक प्रलोभने दाखवण्यात येतात. इतकं नियोजनबद्ध फसवले जात असताना आपण फसवले जातोय याची यत्किंचितही कल्पना समोरच्याला येत नाही. काही हजार करोड मिळणार आहेतच ना हा आंधळा विश्वास त्याच्यात कुठून येतो देव जाणे, पण त्या जोरावर तो ८० लाखांपासून करोडोंपर्यंत व्याजाने कर्ज काढतो. खोल खोल गर्तेत उतरत जाताना तो उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघतो. हजारो करोड रुपयांच्या राशीत आपण लोळत आहोत या स्वप्नातून तो जागा होतो या जाणीवेसह की तो लुटला गेलाय, बरबाद झालाय आणि जिथून परतणे शक्य नाही.
 

अशा प्रकारची फसवणूक महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, फरीदाबाद यांसारख्या दुसऱ्या राज्यात देखील घडल्या आहेत. दिल्ली पोलीस आणि रिझर्व बँकेने लोकांना अवाहन केले आहे की अशा प्रकारचा प्रस्ताव कोणी तुमच्यापुढे मांडल्यास त्याला फशी न पडता त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा.
या आधीही असे प्रकार घडले आहेत. पैस दुप्पट करुन देतो, पैशाचा पाउस पाडून दाखवतो अशा प्रकारची आमिषे दाखवून भोळ्या भाबड्या लोकांना फसवल्याची अनेक उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत. काहींनी गुप्तधन मिळवून देतो सांगत नरबळीचे गुन्हे देखील घडवून आणले आहेत. आतापर्यंत तरी या प्रकरणात अज्ञानी आणि अन्धश्रद्ध लोक टारगेट होते, पण आता अशा कल्पनांना सुशिक्षित लोक सहजासहजी भुलणार नाहीत हे ओळखून अपराधी आता त्यांची आमिषे सायन्सच्या गळाला लावून बसले आहेत हे दुर्दैवी आहे. मोठमोठ्या वैज्ञानिक संस्थांची नावे, बनावट कागदपत्रे, रेडिएशनविरोधी सूट, तांदूळ खेचण्याचे प्रात्यक्षिक या सर्व गोष्टीना विज्ञानाच्या निकषावर तपासून पाहणारे बुद्धिप्रामाण्यवादी लोकही फसले नाहीत तरच नवल!

तात्पर्य एकच, तुम्ही अडाणी असा वा शिकलेले, ‘हव्यास’ ही एक कॉमन गोष्ट तुम्हाला एका रांगेत बसवू शकते. आधुनिक जीवनशैलीने माणसे चैनी, विलासी बनत चालली आहेत. बँक खात्यात पैसा हवा, अजून, अजून, अजून हवा हा हव्यास जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा सावज शिकारी खेळ सुरूच राहणार !
शिकार्यांचे शिकारीचे तंत्र बदलत राहील, सावजांची नावे बदलत राहतील.....!
या खेळाला अंत नाही!!!!
 

सबस्क्राईब करा

* indicates required