computer

दिनविशेष : 'लिओनार्दो दा विंची' यांच्या बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ?

लिओनार्दो दा विंची हा चित्रकार आणि संशोधक त्याच्या कामामुळे नेहमीच गूढ वाटत आलेला आहे. त्याची चित्रे असोत वा त्याने लावलेले शोध असोत, त्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत. त्याचे अनेक शोध हे काळाच्या पुढचे वाटतात. हे शोध त्याने कसे लावले असावेत हे आजही एक रहस्य आहे. त्याचं उलट लिहिणं त्याच्या कामाला आणखीच गूढ बनवतं. हे तर सोडाच, मोनालिसाचं हसू आणि तिचे डोळे आजही संशोधकांना गोंधळात पाडतात. रेनेसान्स काळातील एक महान चित्रकार आणि संशोधक म्हणून संपूर्ण जग त्याला ओळखतं.

आज लिओनार्दो दा विंची यांच्या पुण्यतिथी निमित्त वाचूयात त्यांच्याबद्दल १० काही रंजक गोष्टी.

१. लिओनार्दो दा विंची यांचा जन्म (एप्रिल १५, १४५२ - मे २, १५१९) इटलीच्या फ्लॉरेन्स प्रांतातल्या विंची या गावी झाला. ते एका सधन वकिलाचे अनौरस पुत्र होते. त्यांचा सांभाळ ५ वर्षापर्यंत आईने केला.

२. त्यांचं शिक्षण हे घरीच झालं, कारण त्याकाळात इटलीत औपचारिक शिक्षण नव्हते.

३. लिओनार्दो हे आकाशाचा रंग निळा का आहे याचं बरोबर उत्तर देणारे पहिले शास्त्रज्ञ होते.

४. लिओनार्दो यांना एकावेळी एका हाताने लिहिणं आणि दुसऱ्या हातांनी चित्र काढणं दोन्ही गोष्टी यायच्या.

५. कॉन्टॅक्ट लेन्सची कल्पना मांडण्याचं श्रेय लिओनार्दो दा विंची यांच्याकडे जातं.

६. मोनालिसाबद्दल अनेक मतं मांडली जातात. एका मताप्रमाणे ती गरोदर असल्याने ती स्मित करत आहे.

७. दुसऱ्या एका मताप्रमाणे मोनालिसा म्हणजे लिओनार्दो स्वतः आहेत. म्हणजेच त्यांनी स्वतःला स्त्री वेशात उभं केलं आहे.

८. लिओनार्दो दा विंची यांनी लावलेले शोध

लिओनार्दो दा विंची यांनी त्याकाळात जे शोध लावले त्यांच्याकडे एकदा नजर टाकली की समजतं ते काळाच्या किती पुढे होते. त्यांनी १५ व्या शतकात पॅराशुट, हेलिकॉप्टर, विमान, झुलता पूल मोटरकार इत्यादी गोष्टींची संकल्पना मांडली होती.

९. लिओनार्दो यांच्या एकूण कामाकडे बघता त्यांचं आणि चर्चचं कधी पटलेलं दिसत नाही. त्यांनी बायबलमधल्या नोहाच्या जलप्रलयाच्या गोष्टीला खोडून काढलं होतं.

१०. लिओनार्दोंचे शेवटचे शब्द काहीसे असे होते :

“मी देवाला आणि मानवजातीला दुखावलं आहे कारण माझं काम जितक्या दर्जाचं व्हायला हवं होतं तेवढं झालं नाही...’

 

मंडळी, या महान संशोधक आणि चित्रकाराला बोभाटाचा सलाम !!

 

आणखी वाचा :

ही आहे जगातील सर्वात महागडी पेंटिंग - विकली गेली तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला !!

सबस्क्राईब करा

* indicates required