computer

भारतातील इतिहासप्रसिद्ध १० पेटिंग्ज....यातली तुम्हांला किती माहित आहेत?

मित्रांनो, तुम्ही जगभरातली पेटिंग्स पाहत असाल. लोकांची प्रतिभा पाहुन थक्क व्हायला होते. एकाहुन एक सरस पेटिंग्ज जगाचे लक्ष वेधून घेत असतात. अनेक पेटिंग्ज तर इतकी हुबेहूब असतात की ती हाताने रंगवलेली पेटिंग्ज आहेत हेच लवकर समजत नाही. आता तर थ्री-डी पेंटिंगचा जमाना आला आहे. ही पेटिंग्ज लाखों रूपयांमध्ये विकली जातात हो मंडळी!!

माणसाने अश्मयुगात गुहेतल्या भिंतीवर काढलेल्या चित्रांपासून माणसाच्या चित्रकलेला सुरुवात झाली असली, तरी हा काही सगळ्यांचाच प्रांत नव्हे. पण ज्यांच्याहाती हे कसब आहे, ते सॉलीड महान लोक आहेत. त्यांची काही पेटिंग्स आहेत आख्ख्या जगात टॉपवर आहेत.  अर्थात जगात असं होत असेल तर आपले भारतीय कसे मागे राहतील? खरेतर भारतातसुद्धा एकापेक्षा एक श्रेष्ठ चित्रकार होऊन गेले. राजा रवि वर्मा असतील किंवा आताचे एम एफ हुसेन, त्यांची चित्रे आजपण जगात प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, सध्या जग जरा दूर ठेवू आणि  आज भारतातल्या काही प्रसिद्ध पेटिंग्जबद्दल आपण जाणून घेऊ...

१. तयब मेहता यांचे महिषासुर

या पेटिंगमधुन महिषासुर नावाच्या राक्षसची गोष्ट सांगितली गेली आहे. तयब मेहता २२ वर्षांचे असताना मुंबईत त्यांनी फाळणीच्या दरम्यान जमावाला एका माणसाला भोसकून मारताना पाह्यलं होतं. या घटनेचा परिणाम त्यांच्यावर इतका झाला की तो प्रभाव त्यांच्या चित्रावरही स्पष्ट दिसे. मेहता यांनी हे पेटिंग त्यांच्या शांती निकेतनच्या भेटीनंतर बनवले होते. या पेटिंगमधून प्राचीन काळातील भारतीय संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने कलर साईज आणि पेटिंगचा फॉर्म तयार केला आहे. म्हणूनच हे चित्र आजच्या काळातलं महत्वाचं पेटिंग मानले जाते. जवळजवळ अकरा कोटींना २००५ साली हे चित्र विकले गेले होते.  मंडळी, एका कोटीमध्ये  किती शून्य असतात याचा हिशोब करा तेव्हा कळेल किती महाग आहे हे पेटिंग!

2) एस एच रझा यांची बिंदु पेटिंग

सईद हैदर रझा भारतातील प्रसिद्ध मॉडर्न आर्टिस्ट होते. भारतीय पद्धतीच्या पेंटिग्जमुळे त्यांची जगभरात ख्याती होती. त्यांचे म्हणणे होते कि बिंदु हा जीवन आणि एनर्जीचा मुख्य स्रोत असतो. हे रझा म्हणजे पेटिंगचे लई शौकीन असलेले माणूस. मंडळी, या लोकांना जग वेडे म्हणो किंवा काही म्हणो यांना पडलेली नसते. ते फक्त त्यांच्या कलेच्या प्रेमात असतात. एखादी गोष्ट आवडली म्हणजे पूर्ण आयुष्य त्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागतात आणि अशाच लोकांच्या कलाकृति जगात अमर होतात. रजा यांनीही आपलं पूर्ण आयुष्य या बिंदू पेटिंग्जसाठी अर्पण केले होते. 

3) राजा रवि वर्मा यांची शकुंतला

मंडळी,  राजा रवि वर्मा हे भारतातल्या असामान्य लोकांपैकी एक!! रवि वर्मा त्यांच्या बोल्ड पेटिंग्ससाठी प्रसिद्ध होते. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती शकुंतला या पेंटिंगमुळे! शकुंतला प्रसिद्ध कवी कालिदास यांचे नाटक. हे चित्र त्याच नाटकातील एक प्रसंग दाखवत आहे. एक स्त्री आपल्या पायातील काटा काढत आहे असा तो प्रसंग आहे. शकुंतला काटा काढत असताना तीचा पती दुष्यंतची वाट बघत आहे असा नाटकात प्रसंग आहे. या एका पेटिंगने रवि वर्मा यांना त्यांच्या इतर पेटिंग्जपेक्षा कैक जास्त पटीने प्रसिद्धि मिळवून दिली. 

4) रवींद्रनाथ टागोर यांनी काढलेली त्यांची स्वतःची पेटिंग

मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर  आधुनिक काळात संतासारखे आयुष्य ते जगले. त्यांच्या साहित्यिक रचनेला नोबेल पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. ते लेखक असण्याबरोबर एक चांगले चित्रकारसुद्धा होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटाकडे आल्यावर पेटिंग करायला सुरवात केली. नंतरच्या काळात त्यांनी हजारो पेटिंग्ज काढली. या सर्व पेटिंग्जमध्ये त्यांनी काढलेले सेल्फप्रोट्रेट  सर्वात प्रसिद्ध आहे. 

5) निकोलस रोइरिख यांची कृष्णा पेंटिग

मित्रांनो, परदेशातील अनेक हुशार लोकं हिमालयात येऊन साधना करतात हे तुम्हाला माहित असेलच. निकोलससुद्धा सगळे जग फिरून आल्यावर कुलू येथे आले आणि इथेच स्थायिक झाले. कृष्णाच्या या पेटिंगमध्ये त्यांनी भगवान कृष्णला बासरी वाजवताना दाखवले आहे. हिमालयातील सुंदर पर्वतरांगेत एका झाडाख़ाली बसून कृष्ण बासुरी वाजवतो आहे अशी सुंदर पेटिंग त्यांनी काढली आहे. 

कधी मनालीला गेलात तर तिथे नगर पॅलेसच्या जवळच रोईरिख म्युझियम आहे. मनालीच्या पुढे हिमालयाकडे तुम्ही जाल न जाल, पण त्या तिथल्या  हिमाच्छादित दऱ्यापर्वतांची रोईरिखांनी काढलेली चित्रे पाहायला विसरु नका.

6) नंदलाल बोस यांची बापूजी पेटिंग

नंदलाल बोस  हे रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतन इथे चित्रकार होते. त्यांचं चित्रकलेतलं कसब असामान्य होते. त्यांनी महात्मा गांधींचे दांडी यात्रेत चालत असलेले चित्र काढले होते, ते नंतर खूपच प्रसिद्ध झाले. त्यांचे म्हणणे होते कि गांधीजी सर्व कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.   हे पेटिंग आता इंटरनॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट दिल्ली येथे ठेवलेले आहे.

7) एम एफ हुसेन यांची हॉर्सेस

मकबूल फिदा हुसैन हे नाव माहित नाही असं कुणीच नसेल. तुम्ही त्यांना त्यांच्या वेगळ्या चित्रशैलीसाठी ओळखत असाल, त्यांच्या माधुरी दिक्षित प्रेमासाठी ओळखत असाल किंवा वादग्रस्त चित्रांसाठी तरी. पण त्यांचं नाव ऐकलेलं नसणं जवळजवळ अशक्य आहे.  आधुनिक भारतातील सर्वोत्तम पेंटर म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदू देवतांची आक्षेपार्ह चित्रे काढल्यानंतर त्यांना भारत सोडावा लागला होता. 

त्यांची होर्सेस पेंटिंग तीन घोड़यांची एनर्जी दाखवते. एम एफ हुसेन यांच्या काही सर्वात चांगल्या पेंटिग्सपैकी हे एक मानले जाते. अमेरिकेत झालेल्या लिलावात ही पेंटिंग तब्बल एक कोटी रूपयांमध्ये विकली गेली. 

8) जेमिनी रॉय यांची थ्री पुजारीन्स

जेमिनि रॉय भारतीय कला क्षेत्रातील ख्यातनाम नाव मानले जाते. त्यांनी रंगांसोबत  प्रयोगा तर केलेच, पण नंतर त्यांनी स्वतःची खास चित्रशैली/स्टाईल निर्माण केली आहे. त्यांच्या या थ्री पुजारीन्स पेंटिंगमध्ये तीन पुजारी महिला आहेत.  बंगाली महिलांच्या रीतीरिवाजापासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे पेंटिंग काढले होते.

9) अमृता शेरगील यांची स्वतःची पेंटिंग

मंडळी, भारतीय चित्रशैलीत स्त्रियांचा टक्का नाही असं नाही बरं. अमृतांचीही स्वत:ची एक चित्रशैली आहे. प्रसाधन करणाऱ्या स्त्रिया, वधू अशी त्यांची काही पेंटिंग्ज खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी १९३१ साली काढलेले सेल्फ पोर्ट्रेट हे आजही भारतातले प्रमुख पेंटिंग समजले जाते. या पेंटिंगमध्ये त्यांनी स्वतःची अठरा वर्ष वय असलेली पेटिंग काढली आहे.
 

10) अबींद्रनाथ टागोर यांची भारतमाता पेंटींग

भारतात इतर देशातल्या चित्रशैलींचं अतिक्रमण होत असताना त्यांनी खास भारतीय चित्रशैली निर्माण करण्यासाठी  बंगाल स्कुल ऑफ आर्ट्स काढले.  त्यांच्या  इतर चित्रांसोबतच भारतमाता हे पेंटींग सर्वात प्रसिद्ध पेंटींग्जपैकी एक मानले जाते. या पेंटिंगमध्ये भगव्या वेषात भारत मातेला दाखवले आहे. त्यांना चार हात आहेत.१९०५ साली काढलेल्या या चित्रात प्रथमच भारताला मातेच्या, एका स्त्रिच्या रुपात दाखवण्यात आले होते. या चित्राने स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना प्रेरणा दिली होती. 

भारत मातेला पहिल्यांदा चित्ररूप देणारे अबनिन्द्रनाथ टागोर होते तरी कोण ?? वाचा एका क्रांतिकारकाबद्दल !!

 

मंडळी, जर तुम्ही मुंबईत राहात असाल तर भाग्यवान आहात. भारतातल्या प्रसिद्ध चित्रकारांच्या पेंटिंगची रिप्रिंट तुम्हांला जाम स्वस्तात मिळू शकते. साधारण दोन फूट बाय तीन फुटाचं चित्र ७५ रुपयांना तर दीड फूट बाय दोन फुटाचं चित्र फक्त ३०रुपयांना कुलाब्यातल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये मिळते

मंडळी,  भारतात पण असामान्य कलाकार होते आणि त्यांचं काम जगात भारी म्हणून आहे.  भारतातल्या या प्रसिद्ध पेंटींग्जची माहिती इतरांना पण व्हावी म्हणून जास्तीत जास्त  शेयर करा...

सबस्क्राईब करा

* indicates required