फोटो स्टोरी : बोअरवेलमध्ये पडलेला प्रिन्स सध्या काय करतो ?

(हा मूळ लेख २०१९ साली लिहिलेला आहे)
जुलै २००६ सालच्या एका घटनेने आपल्या सगळ्यांना २४ तासांसाठी टीव्ही समोर बसवून ठेवलं होतं. त्या घटनेतला हा फोटो आहे. काही आठवलं का ? आठवत नसेल तर आम्हीच सांगतो. हा आहे प्रिन्स. हो तोच मुलगा जो बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सैनाला बोलावण्यात आलं होतं. या घटनेला आता १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या फोटो स्टोरीमध्ये आपण हा प्रिन्स सध्या काय करतो ते पाहणार आहोत.
हा आहे प्रिन्सचा सध्याचा फोटो.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील हलदेहेडी गावात ही घटना घडली होती. त्यावेळी प्रिन्स ४ वर्षांचा होता. आता तो १७ वर्षांचा आहे. एवढ्या वर्षात बरंच काही बदललंय. त्याला किती प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती हे तुम्ही पाहिलं आहेच. ही प्रसिद्धी आता ओसरली आहे. सुरुवातीच्या काळात भेटायला येणाऱ्यांचा आणि मदतीचा ओघ प्रचंड होता पण आता तो आटलाय असं स्वतः प्रिन्स म्हणतो.
त्याला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याच्या कुटुंबाला ६ लाख रुपये मिळाले होते. हे पैसे नवीन घर बांधण्यात संपले. प्रिन्सचे वडील हे घरात एकमेव कमावते असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती पुन्हा हलाखीची झाली आहे. घरच्या गरिबीमुळे प्रिन्सला त्याची खाजगी शाळा सोडावी लागली होती, पण आता त्याने सरकारी शाळेत १० वीत प्रवेश मिळवला आहे.
पैशांखेरीज प्रिन्सच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलू असं आश्वासन देण्यात होतं, पण हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही अशी त्याच्या कुटुंबाची तक्रार आहे. त्याने काही नियम व आटी पूर्ण केल्या तर त्याला सैन्यात घेतलं जाईल असंही त्याला सांगण्यात आलं होतं. सध्या तो या दिशेने काम करतोय. त्याला सैन्यात जायचं आहे. तो म्हणतो की मला सैनिकांनी वाचवलं म्हणून मलाही सैन्यात जायचं आहे.
मंडळी, ज्या बोअरवेल मध्ये तो पडला होता ती आता बुजवण्यात आली आहे. गावासाठी आता शेजारीच दुसरी बोअरवेल बनवण्यात आला आहे. प्रिन्सच्या घटनेची चांगली बाजू म्हणजे गावात काही मुलभूत सुविधा आल्या. जसे की नाले बांधण्यात आले.
अशीच एक घटना नुकतीच घडली होती. पण दुर्दैवाने या घटनेतील ५ वर्षांची मुलगी वाचू शकली नाही. हरियाणाच्याच कर्नाल जिल्ह्यातील हरसिंघपुरा गावातल्या ५० फुट खोल बोअरवेलमध्ये शिवानी नावाची मुलगी पडली होती. १८ तासांच्या बचाव अभियानानंतर तिचं मृत शरीर बाहेर काढण्यात आलं.
उघड्या बोअरवेलची समस्या अजूनही पूर्णपणे सोडवण्यात आलेली नाही हेच यातून दिसतं. आजही अशावेळी मुलाला बाहेर काढण्यासाठी दिवसच्या दिवस जातात, याविरुद्ध चीनमध्ये मात्र खास यंत्रणा तयार करण्यात आली आहे. हा पाहा व्हिडीओ.