computer

१२ व्या वर्षात एम. एससी, २२ व्या वर्षात पी एचडी आणि २३ व्या वर्षात प्राध्यापक...कोण आहे तो ?

कमी वयात अनेक मोठे पराक्रम गाजवणाऱ्या लोकांची संख्या आपल्या देशात मोठी आहे. कितीतरी वर्षं मेहनत करून देखील अनेकांना जे काम करता येत नाही ती कामे हे भन्नाट लोक कोवळ्या वयात करून दाखवत असतात. याच यादीत आता एक नवीन नाव जोडले गेले आहे. तथागत अवतार तुलसी हे ते नाव!! या पठ्ठ्याबद्दल जसजशा गोष्टी वाचत जाणार तसतसे तुम्हांला अधिकाधिक आश्चर्य वाटत जाईल. हा मुलगा १० वर्षांचा असताना त्याने आपले बी. एससी. पूर्ण केले, १२ वर्षाचा झाल्यावर तो एम. एससी झाला, २२ वर्षांचा होईतो त्याने पी एचडी पूर्ण केले आणि २३ व्या वर्षी तो प्राध्यापक झाला!! वाचूनच दम लागला ना?

सुप्रीम कोर्टात वकील असलेल्या तुलसी नारायण यांचा मुलगा असलेला तथागत खूप लहान असतानाच मोठमोठी गणिते कॅल्क्युलेटरशिवाय सोडवत होता, तेव्हाच त्याच्या परिवाराला कळून चुकले की हा मुलगा साधारण नाही. लहानपणापासूनच तो ब्रह्मांड, पृथ्वी, तारे यांच्याबद्दल प्रश्न विचारत असे. त्याच्या वडिलांनी त्याला स्टीफन हॉकिंगचे पुस्तक आणून दिले. त्यांनतर मग एवढ्या कमी वयात तो कृष्णविवरे म्हणजेच ब्लॅक होल, आईन्स्टाईनचा सिद्धांत, क्वांटम मॅकॅनिक्स यांचा अभ्यास करू लागला.

अर्थात कमी वयात इतक्या पदव्या मिळवणेही सोपे नव्हते. कारण एवढ्या कमी वयात पुढच्या वर्गांत जाऊ दिले जात नसे. शेवटी खूप प्रयत्न करत करत तो एकेक वर्ग पुढे सरकत गेला. कधीकधी यासाठी त्यांना थेट कोर्टातही जावे लागले होते. त्याची हुशारी बघून कोर्टाने नियम बदलला आणि भाऊ १० वर्षांचा असतानाच ग्रॅज्युएट झाला.

पुढे २००९ साली वयाच्या २२व्या वर्षी पी एचडी झाल्यावर लागलीच तो पुढच्या वर्षी मुंबई आयआयटीमध्ये तो प्राध्यापक म्हणून रुजू झाला. पण सातत्याने तब्येतीच्या तक्रारी यायला लागल्याने आयआयटी दिल्लीला बदली करावी म्हणून अर्ज केला पण त्याचा अर्ज नाकारण्यात आला.

२०१८पासून अवतार तुलसी नोकरीवर रुजू न झाल्याने आयआयटी मुंबईमधून त्याला एका वर्षानंतर म्हणजेच ऑक्टोबर २०१९मध्ये नोकरीवरून काढण्यात आले.

विविध परीक्षा पास झालेला, शिक्षणात अव्वल असलेला, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लसुद्धा नाव नोंदला गेलेला एक प्रतिभावंत भौतिकशास्त्रज्ञ आपल्यात आहे. आजच्या घडीला तो काय करत आहे हे जरी ज्ञात नसले तरी त्याचं लहान वयातलं आजवरचं यश पाहता नो पुढे जाऊनही काहीतरी नक्की करेल अशी आशा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required