computer

डोक्यावर लाखो रुपये घेतलेल्या शेतकऱ्याचा खोटा फोटो पाहिलात? आता खरा शेतकरी आणि त्याची खरी गोष्ट वाचा !!

शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ही गोष्ट या कोरोनाकाळात सिद्ध झाली आहे. पण तरीदेखील ज्या प्रमाणात पीक येते त्याच्या तुलनेने भाव मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. १२ महिने घाम गाळून, पीक वाढवून देखील भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांना होणारा त्रास मोठा असतो.

कालपासून एक बातमी सगळीकडे दिसतेय. डोक्यावर चक्क पैशांचे बंडल घेतलेला एक शेतकरी दिसत आहे. फोटो जरी खोटा असला तरी गोष्ट खरी आहे. शेतीमध्ये खरोखर सोने पिकवले म्हणावे अशी ही गोष्ट आहे. चला तर खऱ्या शेतकऱ्याला भेटू आणि खरी गोष्ट जाणून घेऊ!!

नाशिकच्या सिन्नरमधल्या एका शेतकऱ्याला शेतमालाला मिळालेला भाव पाहून सगळ्या शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या सोशल मीडियावर आज दिवसभर दिसत असलेल्या शेतकऱ्याचे नाव, विनायक हेमाडे असे आहे. ४१ दिवस केलेल्या मेहनतीचे फळ किती असावे? तर चक्क बारा लाख एक्कावन्न हजार (१२,५१,०००) रुपये!!

(हे आहेत खरे विनायक हेमाडे)

विनायक हेमाडे यांच्या ४ एकरांत लावलेल्या कोथिंबीरीला मिळालेला हा भाव बघून कित्येकांचे डोळे विस्फारले आहेत. कारण चार एकर शेत असणाऱ्या माणसाची चार वर्षात देखील जी कमाई होत नाही ती त्यांनी ४० दिवसांत करून दाखवली आहे. शिवाजी दराडे या व्यापाऱ्यांची नजर त्यांच्या कोथिंबीरीवर गेली आणि हेमाडे यांचे नशीबच बदलले. सध्याच्या काळात कोथिंबीरीला चांगला भाव मिळत आहे आणि त्याचाच फायदा विनायक हेमाडेंना झाला आहे.

कोरोनामुळे अनेक ठिकाणी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांवर आपले इतकी मेहनत करून पिकवलेले पीक फेकून येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जर अशीच कमाई शेतकऱ्यांची नियमित झाली तर देशाचा चेहरामोहरा बदलायला वेळ लागणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required