computer

माशी मारायच्या नादात आजोबांनी घर जाळलं.. पुढच्यावेळी इलेक्ट्रिक रॅकेट वापरताना विचार कराल !!

(जळणाऱ्या घराचा फोटो प्रातिनिधिक)

घर जाळून कोळशाचा व्यापार करणे या अर्थाची एक मराठीत म्हण आहे. काल घडलेल्या एका विचित्र घटनेने त्याच म्हणीची आठवण यावी अशी परिस्थिती आहे. माशी जाळण्याच्या नादात एका ८० वर्षांच्या आजोबांनी चक्क स्वतःचे घर जाळून घेतले आहे.

माशा आणि डास कधीकधी इतके हैराण करून सोडतात की माणूस पूर्ण वैतागतो. या आजोबांचे पण काहीसे असंच झाले. आपल्या घरात आरामात जेवण करत असताना, त्यांच्या अवतीभोवती एक माशी गुणगुणत होती. तिचा काहीतरी बंदोबस्त करावा म्हणून त्यांनी इलेक्ट्रिक रॅकेट उचलले आणि लागले तिच्या मागे. आजोबा मागे आणि माशी पुढे असा खेळ सुरू झाला. हा लपंडाव पूर्ण घरभर सुरू होता.

असाच लपाछपीचा खेळ सुरू असताना आजोबा माशीच्या मागे किचनमध्ये शिरले. आज हीचं कांड करायचंच असा निश्चय आजोबांनी केला असावा. पण या इलेक्ट्रिक रॅकेटमुळे किचनमध्ये एक स्फोट झाला आणि त्या स्फोटात लागलेली आग पसरायला लागली. त्या आजोबांचे घराचे छप्पर पूर्ण या आगीत जळून गेले.

फ्रांसमधील दोर्दोन येथे घडलेली ही घटना जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. सुदैवाने त्या आजोबांना कुठलीही इजा झाली नाही. पण इलेक्ट्रिक रॅकेटचा वापर करताना विशेष काळजी घ्यायला हवी.

२००७साली थायलंडमधील एका मुलासोबत अशीच घटना घडली होती. त्याचा या घटनेत मृत्यू झाला होता. नुकत्याच युकेमध्ये घडलेल्या एका घटनेत प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी एकाने घरभर पणत्या लावून ठेवल्या आणि तिला आणायला गेला. दरम्यान त्या पणत्यांच्या दिवाळीने त्याचा फ्लॅट जळाला. थोडक्यात, थोडा अविचार मोठं नुकसान करू शकतो.

 

आणखी वाचा :

डास मारणाऱ्या रॅकेटची आयडिया आली तरी कुठून ? या रॅकेट मागची गोष्ट माहित आहे का ??

सबस्क्राईब करा

* indicates required