f
computer

जगाच्या इतिहासात या ७ प्राणघातक रसायनांनी लाखो लोकांचा बळी घेतला !!

शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेक वर्षांपासून मानव वेगवेगळ्या घातक हत्यारांचा वापर करत आलेला आहे. मागील काही वर्षांपासून होणाऱ्या युद्धांकडे बघितलं तर मोठाल्या स्फोटक हत्यारांपेक्षा कमी खर्चिक हत्यारे जास्त घातक ठरली आहेत. रणगाडे आणि बंदुकीबरोबर रासायनिक शास्त्रांच्या वापरातून युद्ध जिंकता येतं हे आता सिद्द झालं आहे.

मागील १०० वर्षांच्या इतिहासात विषारी आणि कृत्रिम रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर करून शत्रूला नामशेष करण्याच्या नव्या पद्धतीमुळे युद्धाचा चेहराच बदललेला दिसतोय. मंडळी, दरवेळी अणु बॉम्बचा वापर करावाच लागतो असं नाही. काहीवेळा रासायनिक हत्यारांनी सुद्धा शत्रूवर मात करता येते. आज आपण अशाच प्राणघातक हत्यारांबद्दल जाणून घेणार आहोत.

चला तर जाणून घेऊया ती हत्यारे आहेत तरी कोणती !

१. एजंट ऑरेंज

हर्बसाईड ऑरेंज या केमिकलला एजंट ऑरेंज या नावाने ओळखल जातं. अमेरिकेचं व्हियेतनामशी झालेल्या युद्धात (१९५५ ते १९७५) अमेरिकेने या केमिकलचा वापर व्हियेतनामच्या जंगलांना नष्ट करण्यासाठी केला होता. विमानांना जमिनीवरील हालचाली नीट बघता याव्यात म्हणून अश्या पद्धतीने जंगल साफ करण्याचा प्लॅन होता. पण मंडळी, याचा विपरीत परिणाम व्हियेतनामी नागरिकांवर झाला आणि असंख्य लोक मारले गेले. ३० लाख लोकांना यामुळे बाधा झाली.

एजंट ऑरेंजमुळे व्हियेतनाम मध्ये कॅन्सर, श्वसनाचे विकार आणि त्वचेच्या कॅन्सर सारखे भयंकर रोग पसरले. आजही या भागात मुलांना जन्मताच व्यंग असते.

२. सरीन गॅस

सरीन गॅस हा जीवघेणा वायू अवघ्या १० मिनिटात माणसांचा जीव घेतो. या गॅस मुळे लकवा मारला जातो आणि जीव गुदमररून जीव जातो. इतर हत्यारांपेक्षा हे हत्यार जास्त खतरनाक आहे याचं कारण म्हणजे या वायुला रंग आणि वास नाही. हा वायू सोडल्यानंतर त्याच्याबद्दल संकेत मिळण्याच्या आत आपण गतप्राण झालेलो असतो. सद्दाम हुसेनने या हत्याराचा वापर करून अनेक कुर्दी नागरिकांचा जीव घेतला होता.

Gerhard Scharder या शास्त्रज्ञाला या जीवघेण्या गॅसचा शोध योगायोगाने लागला. खऱ्या अर्थाने त्याचा वापर कोणाचे प्राण घेण्यासाठी होणार नव्हता. द्रव सरीनचा वापर चक्क कीटकनाशक म्हणून केला जातो.

३. Phosgene

हा एक अत्यंत घातक असा विषारी वायू आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी याच्या वापरातून ८० लाख माणसांना यमसदनी पोहोचवण्यात आलं होतं. या वायूचा वास हा नुकत्याच कापलेल्या गवता सारखा असतो. श्वासा वाटे तो आपल्या फुफ्फुसात जाऊन तिथल्या पेशींवर हल्ला करतो.

४. मस्टर्ड गॅस

या वायूचा वास मोहरी किंवा लसणासारखा सारखा असतो. घातक रासायनिक शस्त्र म्हणून मस्टर्ड गॅस ओळखली जाते. पहिल्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटीशांच्या विरुद्ध या रासायनिक वायूचा वापर केला होता. हा वायू शत्रूच्या गोटात सोडल्यानंतर त्याचा प्रभाव बराच काळ टिकून राहतो. हा वायू रेंगाळत राहिल्याने तो अधिक प्राणघातक ठरतो.

५. Lewisite

हा विषारी वायू शरीरात गेल्यानंतर मळमळ, उलट्या, अतिसार या सारखी लक्षणं दिसू लागतात. युद्धाच्या काळात या वायूपासून बचावासाठी सैनिकांना मास्क देण्यात येत पण या वायुपुढे मास्कही निकामी ठरला. शेवटी सुदैवाने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान यावर उतारा शोधण्यात आला आणि हळू हळू याचा वापरही बंद झाला.

६. सायनोजन क्लोरायड

पहिल्या महायुद्धाच्या वेळी या वायूचा उपयोग केला गेला. हा वायू इतका विषारी ठरला की १५ ते ३० सेकंदात त्याचा प्रभाव सुरु होई आणि अवघ्या ६ ते ८ मिनिटात माणसाचा मृत्यू अटळ असायचा.

या वायुमुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उठणे आणि मळमळ होऊन उलटी येण्यासारखी सुरुवातीची लक्षणे दिसतात. जलद गतीने जीव घेण्यासाठी या रासायनिक हत्याराचा वापर केला गेला.

७. हायड्रोजन सायनाईड

हायड्रोजन सायनाईड चा वापर करूनच नाझी राजवटीत ज्यूंची अमानुष कत्तल करण्यात आली होती. हायड्रोजन सायनाईडमुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो व माणसाला तडफडून मृत्यूला सामोरे जावे लागते. नाझी राजवटीत एकावेळी अनेक ज्यूंना अंघोळीच्या निमित्ताने एका खोलीत नेलं जात असे. त्या खोलीत एक नळी लावलेली असायची ज्यातून पाणी बाहेर पडेल असं भासवलं जायचं. एकदा का ज्यू आत गेले की त्यांना बाहेरून बंद करण्यात येई. ज्या नळीतून पाणी येईल असं वाटायचं त्या नळीतून हायड्रोजन सायनाईड बाहेर पडायचा. आणि मग काही वेळातच मृतदेहांचा खच पडलेला दिसत असे.

 

मडळी, अशी घातक रसायने भविष्यात तर खूप येतील. प्रश्न हा आहे, की ती वापरून मानवाने मानवसंहार करावाच का ? तुम्हांला काय वाटतं ?

 

आणखी वाचा :

अणु बॉंम्बची पहिली टेस्ट केव्हा आणि कुठे झाली ? त्याला मॅनहॅटन प्रोजेक्ट का म्हणतात ?