रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या या बेघर काकांना फेसबुकमुळे असा मिळाला मदतीचा हात !!

मंडळी, फेसबुकच्या विरोधात रोजच बोललं जातं. पण आपल्याला एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल की फेसबुकच्या माध्यमातून लोक एकत्र आल्याने काही चांगली कामे सुद्धा होत आहेत. आम्ही आज जी बातमी घेऊन आलो आहोत ती अशाच सकारात्मक कामाची आहे. मंडळी, एका फेसबुक पोस्टमुळे काय होऊ शकतं ते बघा.

अविनाश सिंग नावाच्या फेसबुक युझरने काही दिवसापूर्वी एका बेघर माणसाचा फोटो शेअर केला होता. या माणसाचं नाव आहे ‘राजा सिंग पूल’(वय ७६). राजा सिंग यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी चक्क ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलंय. ऑक्सफर्ड मधून पदवी संपादन केल्यानंतर ते १९६० साली भारतात परतले.

भारतात आल्यानंतर त्यांनी भावाचा मोटर पार्टचा बिझनस सांभाळायला सुरुवात केली. कालांतराने त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. भाऊ गेल्यानंतर सगळा बिझनस ते एकटे सांभाळू लागले. पुढे जाऊन हा बिझनस कोलमडला आणि त्यांच्यावर रेल्वे स्टेशनवर राहणायची वेळ आली.

त्यानंतर राजा सिंग दिल्लीतल्या बाबा खडक सिंग मार्गावर असलेल्या विजा सेंटरवर लोकांना विजा फॉर्म भरून देण्याचं काम करू लागले. ते आजही हेच काम करतात. रोजच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना सार्वजनिक शौचालयात जाऊन तयार व्हावं लागतं.

ते स्वतः कधीही कोणाकडून पैसे मागत नाहीत. लोकांनी जर मनापासून पैसे दिले तरच घेतात. बऱ्याचदा लोक एक रुपयाही न देता निघून जातात. पैसे नसल्याने त्यांचा उपास घडतो पण ते कधी ‘लंगर’ मध्ये जेवत नाहीत. त्यांच्या मताप्रमाणे लंगर मध्ये जेवण्यासाठी आपलंही त्यात योगदान असावं लागतं. ‘मी जर तसं योगदान करू शकत नसलो तर मला तिथे फुकट खाण्याचा अधिकार नाही.’ असं ते म्हणाले.

त्यांच्या मुलांविषयी विचारल्यावर ते म्हणाले की त्यांची मुले अमेरिका आणि इंग्लंड मध्ये स्थाईक झाली आहेत. या मुलांना आपल्या वडिलांची काळजी नाही.

आता खरा प्रश्न असा आहे की ऑक्सफर्ड सारख्या नावाजलेल्या विद्यापीठात शिकलेल्या व्यक्तीला नोकरी मिळणं एवढं कठीण आहे का ? यावर त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की त्यांना नोकरी करणं कधीही आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला नाही.

मंडळी अविनाश सिंगने फेसबुकववर त्यांचा फोटो आणि त्यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिल्यानंतर अनेक लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला. जवळ जवळ ४ हजार वेळा ही पोस्ट शेअर झाली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र आले व त्यांनी राजा सिंग यांची सोय ‘गुरु नानक सुक शाला’ मध्ये केली आहे. राजा सिंग यांना आता रेल्वे स्थानकावर झोपावं लागत नाही.

एक प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे. तो म्हणजे राजा सिंग हे खरच ऑक्सफर्ड मध्ये शिकले आहेत का ? कारण तसा कोणताही पुरावा त्यांच्याकडे मिळालेला नाही.

 

आणखी वाचा :

४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस व्हायरल व्हिडीओ मध्ये सापडला...वाचा नक्की काय घडलंय ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required