computer

कोरोना, मलेरिया, डेंग्यू आणि आता सापाचा दंश....या ब्रिटिशाने भारतात कायकाय दिव्ये पार केली पाहा!!

संकटे कधीच एकटी येत नाहीत. कधी कधी आपण एखाद्या प्रसंगातून बालंबाल बचावलो म्हणून सुटकेचा निश्वास सोडेपर्यंत दुसरे संकट अगदी दत्त म्हणून हजर असते. संकटांची अशी मालिका आपल्यापैकी प्रत्येकजण कधी न कधी अनुभवतोच. पण, अशावेळी आपल्याला धीर द्यायला आपली माणसं असतात. काही जण कृतीने किंवा काहीजण शब्दाने आधार देतात, धीर देतात. लोकांची आपल्याला मिळणारी ही साथच आपल्याला अशा कठीण प्रसंगातून तारून नेते.

पण, समजा तुम्ही तुमच्या कामानिमित्त कुठे बाहेरगावी किंवा बाहेरच्या देशात गेला आहात आणि तिथे अनोळखी ठिकाणी तुमच्यावर एखादे संकट कोसळले तर तुमची अवस्था काय होईल. एकतर अनोळखी प्रदेश त्यात अनोळखी लोक, अशा काळात कुणाला मदत मागणार आणि कोण आपल्याला मदतीचा हात पुढे करणार अशी कित्येक नकारात्मक विचारांचे तरंग आपल्याला आणखीन भांबावून सोडतात. अशा अनोळखी ठिकाणी आपल्याला मागे उभी राहते ती माणुसकी. असाच काहीसा प्रकार घडला आहे ब्रिटन मधील आयन जॉन्स सोबत, जो कामानिमित्त भारतात आला आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकून पडला.

दक्षिण इंग्लंडच्या आयसल ऑफ वेट या भागातील एका चॅरिटी ट्रस्टसाठी काम करणारा आयन जॉन्स हा आपल्या कामानिमित्त भारतात आला होता. भारतातील राजस्थान मधील काही कारागीरांच्या वस्तू विकत घेऊन त्या वस्तू तो ब्रिटनला नेत असे. यामुळे राजस्थानातील करागीरांचाही व्यवसाय चांगला चालत असे. आयन जोनस ज्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी काम करतो, त्या ट्रस्टकडून यासाठी त्याला सहाय्य मिळते. पण, अचानक सगळीकडेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला आपल्या मायदेशी जाणे शक्य झाले नाही. शिवाय, त्याचे ट्रस्ट इथे ज्या लोकांसाठी काम करते त्यांनाही अशा काळात एकटे सोडून जाण्यास त्याचे मन धजावत नव्हते. म्हणून तो राजस्थान मध्येच राहिला.

कुठलीही रिस्क नको म्हणून तो राजस्थान मध्ये राहिला खरा पण, रीस्कच त्याला शोधत आली. आधी आयनला मलेरिया झाला, त्यातून तो कसाबसा वाचला. पण, मग तोपर्यंत त्याला डेंग्यूचा ताप येऊ लागला. डेंग्यूतून बरा होतो न होतो तोच त्याला कोव्हीड-१९ची लागण झाली. एकामागून एक आलेल्या या आजारपणाला त्याने कसेबसे परतवून लावले खरे. सोबत काम करणारी माणसे होतीच त्याच्या आधाराला. पण, त्याच्या या स्थितीने तिकडे सातासमुद्रापार राहणारे त्याचे कुटुंबीय मात्र धास्तावले. पण, ते तरी काय करणार बिचारे?

आता इतकं सगळं झाल्यानंतर तरी संकटांनी त्याच्या पिच्छा सोडवा की नाही. पण कसलं काय? अजूनही एक भयानक संकट त्याची वाट बघत बसलं होतं. कोव्हीड मधून बरा होऊन त्याला जेमतेम आठवडा झाला होता तोपर्यंत त्याला राजस्थानच्या वाळवंटातील विषारी कोब्रा सापाने दंश केला. आता कोब्रा चावला म्हणजे माणूस जगेल का? कारण, कोब्रा ही सापातील अत्यंत विषारी जात मानली जाते. शिवाय, त्या राजस्थानच्या वाळवंटात त्याच्यावर उपचार तर कुठे लवकर मिळणार? मग त्याला जोधपुर मधील मेडीपल्स हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.

हॉस्पिटल मध्ये जाईपर्यंत त्याची अवस्था अगदीच वाईट झाली होती. त्याला डोळ्यांसमोर अंधारी  येऊ लागली होती. शिवाय त्याला धड स्वतःच्या पायावर उभेही राहता येत नव्हते. जवळजवळ त्याचे डोळे अधू होण्यात आणि पाय लकवा मारल्यातच जमा होते. आता आधीच बिचारा इतक्या सगळ्या संकटातून पार पडलेला. त्याचे शरीर तरी नेमक्या किती आघाड्यांवर लढणार?

आधी त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनी निदान केले, की बहुतेक याला दुसऱ्यांदा कोरोना झाला असावा. म्हणून त्याची पुन्हा कोव्हीड-१९ साठी टेस्ट करण्यात आली. पण, यावेळी त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. मग डॉक्टरांनी त्याच्यावर सर्पदंशासाठीचे उपचार सुरु केले. काही दिवसातच त्याने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि आता तो यातून सुखरूप बचावला आहे. आठवड्यापूर्वीच त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आयन जॉन्स ज्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी काम करतो त्या सेबिरीयन संस्थेची एक इमारत जोधपुर मध्ये आहे आणि जॉन्स सध्या तिथेच राहतो आहे. ही संस्था राजस्थान मधील कारागीरांसाठी काम करते. त्यांनी बनवलेल्या वस्तू या संस्थेमार्फत ब्रिटन मध्ये पोहोचवल्या जातात. जॉन्स इथे भारतीय कारागीरांशी भेटून त्यांच्या सोबत संस्थेच्या वतीने व्यवहार करतो. इथल्या लोकांशी नेहमीच संपर्कात राहता यावे म्हणून आणि कारागिरांकडून घेतलेल्या वस्तू जमा करून ठेवण्यासाठी संस्थेने इथे एक इमारतही उभारली आहे तेच जॉन्सचे घर. या इमारतीच्या एका छोट्या खोलीत तो राहतो.

त्यादिवशी तो आपल्या खोलीत विश्रांती घेत होता. इतक्यात त्याचा कुत्रा रॉकी जोरजोरात भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने तो आपल्या खोलीतून बाहेर आला आणि इतक्यात तिथे आलेल्या कोब्राने त्याच्या हालचालींना घाबरून गेल्याने त्याला दोनदा दंश केला.

जोधपुरच्या मेडीप्लस हॉस्पिटल मध्ये त्याला अॅडमिट करण्यात आले. घाबरल्यामुळे त्याची अवस्था आणखीनच अत्यवस्थ झाली होती. सुमारे दोन आठवडे तरी तो हॉस्पिटलच्या आयसीयु युनिट मध्ये होता. शेवटी कोरोना पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे त्याला आयसीयूतून बाहेर काढले. परंतु तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत होता. त्याच्या संस्थेने त्याच्या उपचारासाठी डोनेशनच्या माध्यमातून पैसा उभा केला. शिवाय त्याला ब्रिटनला परत आणण्याचीही त्यांनी सोय केली होती. मात्र आयन जॉन्सने जाण्यास नकार दिला. त्याच्यावरची जबाबदारी मोठी होती. ती अशी अर्ध्यावर टाकून जाणे त्याला बरोबर वाटले नाही म्हणून त्याने अजून काही दिवस तरी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्यावर एकामागून एक आलेल्या या संकटांच्या मालिकांमुळे त्याच्या घरचेही घाबरून गेले होते. पण, जॉन्सने त्यांनाही दिलासा दिला आणि आपण सुखरूप असल्याची खात्री दिली. म्हणतात ना देव तरी त्याला कोण मारी!

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

 

 

आणखी वाचा:

साप चावल्यानंतर काय करावे ? या ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required