computer

भाग २: विकिपीडियावर हे ६ विक्षिप्त आणि भीतीदायक पेजेस आहेत हे तुम्हाला माहित आहे का ?

भाग १: विकिपीडियावर हे ६ विक्षिप्त आणि भीतीदायक पेजेस आहेत हे तुम्हाला माहित आहे का ?

Halloween Day च्या निमित्ताने आपण अगदी भयानक आणि विचित्र अशा सहा विकिपीडिया पेजेसबद्दल माहिती जाणून घेतली होती. आज आम्ही त्या लेखाचा पुढील भाग घेऊन आलो आहोत. वाचताना धीर, हिम्मत, साहस जे काही काही असतं ते सर्व एकवटून वाचा. चला तर मग ह्या भयावह सफरीवर...

Armin Meiwes (अर्मीन मायवीस)

केव्हातरी आपण आपल्या आज्जी किंवा पणजीला म्हणताना ऐकलं असेल की, ”एखाद्या दिवशी माणूसच माणसाला खायला उठेल.” आपण मात्र आज्जीलाच वेड्यात काढायचो आणि विषय हसण्यावारी घ्यायचो. पण मित्रांनो तुम्ही कधी ह्या गोष्टीचा थोडा आणि वास्तववादी विचार केला आहे का? छे.....माणसाने माणसाला खाणं कसं शक्य आहे हे? दुर्दैवाने हे अगदी खरं आहे. हजारो लाखो वर्षांपासून जगातल्या बऱ्याचशा भागांत Human Cannibalism म्हणजे नरभक्षण पद्धत अस्तित्वात आहे.

अर्मीन मायवीस हा कॉम्प्युटर दुरुस्त करणारा एक साधारण मनुष्य होता. एकदा त्याच्यात जगावेगळी इच्छा निर्माण झाली.  त्याला माणसाचंच मांस खायचं होतं. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने २००१ मध्ये इंटरनेटवर तशी जाहिरातही टाकली. त्या जाहिरातीमध्ये स्वखुशीने कोणी तयार असल्यास आपल्याला संपर्क साधावा असे लिहिले होते. आश्चर्य म्हणजे बऱ्याच लोकांनी सुरुवातीला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्

यात बर्लिनमध्ये राहणारा आणि व्यवसायाने इंजिनियर असणाऱ्या एका व्यक्तीने ह्यासाठी तयारी दाखवली आणि झालेही असेच. अर्मीनने ह्या इसमाच्या शरीरावरचे जास्तीत जास्त मांस खाल्ले होते. ह्या घटनेचा व्हिडीओ बनवून त्यांनी इंटरनेटवरही टाकला होता. पुढे अर्मीन ह्याला खुनाच्या आरोपाखाली आजन्म कैदेची शिक्षा देण्यात आली. Armin Meiwes ह्या विकिपीडिया पेजवर ह्या घटनेची अजून सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

Ed & Lorraine Warren (एड आणि लॉरेन वॉरेन)

सरळ सांगायचं झाल्यास एड आणि लॉरेन हे दोघे भूतांना पाहू शकणारे, भुतांच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे, भूत पळवून लावणारे, भूत प्रेतांवर लिहिणारे लेखक होते. तुम्ही कॉनज्युरिंग आणि अॅनाबेल सिनेमांची नावे ऐकली असणार. हे दोन्ही सिनेमे एड आणि लॉरेन यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनांवर आधारीत आहेत असं म्हटलं जातं. या दोघांचे संपूर्ण आयुष्य दैवी शक्ती, भूत ह्यांच्यासोबत लढण्यात गेले. त्यांनी दैवी शक्ती ह्या विषयावर बरीचशी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ह्या विकिपीडिया पेजला भेट दिली तर प्रत्येक गोष्टी अजून खोलात जाऊन वाचता येतील.

Carl Tanzler (कार्ल टॅन्झलर)

कार्ल टॅन्झलर हे रेडिओलॉजी तंत्रज्ञ म्हणून फ्लोरिडामधील मरीन हॉस्पीटल मध्ये काम करायचे. ह्या हॉस्पिटलमध्ये आपल्या क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या  एलिनावर ते फिदा झाले होते. एलिना ही मूळची क्युबाची होती. १९३१ साली दुर्दैवाने क्षयरोगातच एलीनाचा मृत्यू झाला. तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्ल ह्यांना तिच्या मृत्यूमुळे प्रचंड मोठा धक्का बसला होता. ते रोज स्मशानभूमीमध्ये तिच्या कबरीशेजारी बसून राहायचे. १९३३ मध्ये एका रात्री त्यांनी तिचे उरलेले अवशेष कबर खोदून आपल्या घरी नेले. १९४० मध्ये एलीनाची बहिण जेव्हा कार्लच्या घरी गेली तेव्हा ह्या गोष्टीचा उलगडा झाला. पोलिसांनी कार्लला ह्यांना लगेच अटकही केली. पुढील तपासात कार्ल हे एक मानसिक रोगी असल्याचे सिद्ध झाले.

आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘द सायको’ ह्या क्लासिक सिनेमाची कथा देखील ह्या घटनेशी मिळतीजुळती वाटते.

H.H.Holmes

१८८९ मध्ये ह्या महाशयांनी एक हॉटेल बांधले. त्या हॉटेलमध्ये अनेक छुप्या खोल्या होत्या. त्या खोल्यांचे बांधकाम असे केले होते की आवाज खोल्यांमधून अजिबात बाहेर जाणार नाही. ह्या खोल्यांमध्ये जाण्याचे मार्गही खूपच गुंतागुंतीचे होते. हे हॉटेल ह्या महाशयांनी शांततेत खून करता यावेत ह्याचसाठी बांधले होते. ह्या त्यांनी तब्बल २७ खुनाचे आरोप मान्य केले होते. पण असं म्हणतात की हा आकडा यापेक्षा बराच मोठा होता. २०० पेक्षा जास्त खुनांचा आरोप त्यांच्यावर होता. सर्वात पाहिला खून त्यांनी स्वतःच्याच प्रेयसीचा केला होता.

होम्स यांचे बिझनेस पार्टनर बेन्जामिन यांच्या हत्येसाठी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्या हॉटेल मध्ये त्यांनी हे खून केले त्या हॉटेल ला ‘द मर्डर कॅसल’ म्हणून ओळखलं जातं.

ONA

ONA (Order of Nine Angles) ही युके येथील एक सैतानी संस्था आहे. १९६० मध्ये उदयाला आलेल्या ह्या संस्थेचे जगातील बऱ्याच भागांमध्ये गट आहेत. नव-नाझी म्हणजे नाझी विचारांचं नवीन रूप मान्य असलेली आणि Black Order हे गट त्यापैकीच एक. गटांशी जोडलेले संबंध आणि फॅसिझमवरील विश्वासामुळे ही संस्था अतिशय बदनाम आहे. ONA च्या मते भौतिकशास्त्र वगैरे सर्व थोतांड असून जादुई शक्तीवर विश्वास ठेवणे हे गरजेचे आहे.

The Hands Resist Him

बिल स्टोनहॅम हे बॉस्टनमध्ये राहणारे एक चित्रकार आहेत. १९७२ मध्ये त्यांनी The Hands Resist Him हे चित्र काढले होते. ह्या चित्रामध्ये एक छोटा मुलगा आपल्या बाहुलीला घेऊन एका काचेच्या खिडकीबाहेर उभा आहे. काचेच्या त्या बाजूला बरेचसे हात दिसत आहेत असं एकंदर ते चित्र होतं. पण इतक्या सुंदर चित्राला प्रसिद्धी मिळाली ती झपाटलेले चित्र म्हणून. तर असे का? बऱ्याच लोकांचे असे म्हणणे होते की, ह्या चित्रात दिसणाऱ्या बाहुलीची हालचाल होते.

सर्वात प्रथम हे चित्र द गॉडफादर चित्रपटात काम केलेल्या जॉन मारले ह्यांनी खरेदी केले होते. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका वयस्कर जोडप्याने हे चित्र खरेदी केले, पण त्यांनाही वाईट अनुभव येत गेले. म्हणून ebay वर हे चित्र विकण्यासाठी त्यांनी जाहिरातही दिली. चित्रासंबंधी लिहिताना त्यांनी हे चित्र झपाटलेले आहे असेही लिहिले होते.

झपाटलेली १० पेंटिंग्ज !! त्यांच्या कहाण्यांवर तुमचा विश्वासच बसणार नाही राव !!

तर वाचकहो, या सहा विकिपीडिया पेजेसवर दिलेल्या माहितीशी बोभाटा सहमत असेलच असे नाही. बोभाटा वाचक ह्या गोष्टींकडे फक्त रोचक माहिती म्हणून बघतील अशी आम्ही अपेक्षा करतो.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required