१.१३ मिनिटाच्या व्हिडीओसाठी तो ७ महिने थांबला, शेवटी हाती आलेलं दृश्य पाहून सलाम कराल!!

बदलत्या तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफी आणि चित्रीकरण बऱ्याच प्रमाणात सोपे झाले आहे. चित्रीकरणासाठी आता वेगवेगळे प्रयोग सहज होताना दिसतात. काही वर्षांपर्यंत ड्रोन हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता, पण आता तो सर्रास वापरला जातो. ड्रोन कॅमेरा आणि तो हाताळणाऱ्या माणसाची कल्पकता एकत्र आल्यावर काय जादू केली जाऊ शकते हे नुकतेच एका फोटोग्राफरने दाखवून दिले आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. पण त्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा.
सोशल मीडियावर मेंढ्यांचा एक कळप प्रसिद्ध झाला आहे. त्यांना प्रसिद्ध करण्याचे काम केले आहे, इस्त्रायली फोटोग्राफर लियोर पटेल यांनी. गेली सात महिने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी एका मेंढ्यांच्या कळपाच्या हालचाली कैद केल्या. हिवाळा ते उन्हाळा या काळात त्यांनी ७ महिने भूक तहान विसरून फक्त या कळपाचे चित्रीकरण केले.
शेतातून, रस्त्यांवरून चालतानाचे त्यांचे एकेक क्षण ते शूट करत होते. जवळपास १०००- १७०० मेंढयांना त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हे चित्रीकरण त्यांनी एडिट केल्यावर समोर आलेलं दृश्य डोळे सुखावणारे होते. पटेल यांचं कॅमेरा कौशल्य आणि दृष्टीचे प्रचंड कौतुक होत आहे.
हा व्हिडीओ बघितल्यावर निसर्गातील या प्राण्यांचे शिस्तबद्ध जगणे तर समजतेच पण निसर्गाचे खरे सौंदर्य सुद्धा डोळ्यापुढे येते. या कलाकारांचे खरोखर कौतुक करायला हवे. अवघ्या १.१३ मिनिटांचा व्हिडीओ बनविण्यासाठी ७ महिने खर्च करणारे आपल्या कामावर किती प्रेम करत असतील याचा अंदाज येऊ शकतो.