computer

आसामच्या पठ्ठ्याने मारुती स्विफ्ट लँबोर्गीनीमध्ये कशी बदलली?

पंजाबी गाण्यांमध्ये लँबोर्गीनी कार बघून देशात अनेक तरुणांना आपल्याकडे पण लँबोर्गीनी असावी असे वाटते. पण या कारसाठी पैसाही मजबूत मोजावा लागतो. पण जर स्वप्न बघितले तर त्यासाठी मार्ग पण सापडतो असे म्हटले जाते. ही गोष्ट आसाममधल्या एका मॅकेनिकने सिद्ध केली आहे. पठ्ठ्याने चक्क आपली मारुती स्विफ्ट लँबोर्गीनीमध्ये बदलून दाखवली आहे. 

आसाममधील करीमगंज येथे नरुल हक नावाचा ३१ वर्षीय मोटर मॅकेनिक राहतो. भावाला हौस होती लँबोर्गीनीची पण बजेट नव्हते. मग काय तो कामाला लागला आणि मारुती स्विफ्टचे रूपांतर लँबोर्गीनीमध्ये केले. आपल्या गॅरेजमध्ये काम सुरू करत त्याने ८ महिने सतत काम केले. ६ लाख रुपये या कामासाठी त्याला खर्च आला. शेवटी त्याने स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.

नरुलचे वडीलपण मॅकेनिक असल्याने त्याचा लहानपणापासून या कामात चांगला हात आहे. नरुल फास्ट अँड फ्युरियसचा फॅन आहे. या सिनेमांमध्ये दाखवलेल्या कार्स आपल्याकडे पण असाव्यात असे त्याला नेहमी वाटत असे. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्याने त्याला घरी बसावे लागले होते. 

याच काळात त्याला स्वतःची लँबोर्गीनी रेप्लिका म्हणजे सोप्या भाषेत 'डूप्लिकेट' बनविण्याची आयडिया आली. मग त्याने जुनी स्विफ्ट खरेदी केली आणि लँबोर्गीनीचे पार्टस कसे तयार होतात, हे युट्यूबवर बघायला सुरुवात केली. काम सुरू तर केले पण हे काम महागात जाईल हे त्याला वाटले नव्हते. खर्च वाढत जाऊन सहा लाखात त्याला ही गाडी पडली. पण स्वप्न मोठे असल्याने त्याला खर्चाचे काय विशेष वाटले नाही.

आता त्याला चिंता पडली आहे ती या गोष्टीची की, ही गाडी फिरवणे बेकायदेशीर तर ठरणार नाही ना? जर तशी अडचण नसेल तर आपण ही गाडी भरपूर फिरवणार असे पण तो सांगतो. तसेच जर आपल्याएवढेच इतर कुणाचे या गाडीवर प्रेम असेल तर आपण ही गाडी विकायला पण तयार असल्याचे त्याने सांगितले आहे. 

जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर पुढे त्याला फरारी बनविण्याचे पण वेध लागले आहे. एक गोष्ट मात्र नक्की की जर याचा असाच स्पीड राहिला तर या मोठ्या कंपनींना हा टेन्शन देईल हे नक्की...

सबस्क्राईब करा

* indicates required