computer

प्लास्टिकच्या बाटल्या सोडा, वापरा आता या नव्या इकोफ्रेंडली बांबूच्या बाटल्या..

प्लास्टिक पिशव्या वापरणं बंद करणं सोप्पं आहे, कारण प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय असतो. हेच प्लास्टिक बॉटल्सच्या बाबतीत शक्य नाही. रोजच्या वापरातील प्लास्टिक बाटल्या काढून टाकल्या तर पाणी न्यायचं कशातून?

....पण भारतात एक असा उद्योजक आहे ज्याने प्लास्टिक बाटलीला इकोफ्रेंडली पर्याय शोधून काढलाय. चला तर बघूया तो उपाय काय आहे.

मुळचा आसामचा असणारा ध्रीतीमन बोरा याने बांबूपासून बाटल्या तयार केल्या आहेत. या बाटल्या 'लिक-प्रुफ’ आहेत. म्हणजे बाटली बांबूची असली तरी पाणी गळणार नाही. त्यासाठी तो बांबूवर एक विशिष्ट प्रकारचं वॉटरप्रुफ तेल लावतो. तसेच या बाटलीला असलेलं झाकणही फार विचारपूर्वक तयार केलेलं आहे. 

ध्रीतीमन बोरा याने बांबूपासून तयार केलेलं फर्निचर विकण्यापासून सुरुवात केली होती. व्यवसायात स्थिर झाल्यावर जवळजवळ १७ वर्षांनी त्याला बांबू बाटलीची आयडिया सुचली. आयडिया तर सुचली, पण यासाठी लागणारा मजबूत बांबू मिळत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर ‘भालुका’ नावाचा बांबू बाटलीसाठी योग्य असल्याचा शोध त्याला लागला.

दिल्लीत झालेल्या एका प्रदर्शनात त्याने हे नवीन प्रॉडक्ट पहिल्यांदा लोकांसमोर ठेवलं, पण लोकांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. पुढे त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने बाटलीला चकचकीत तेल लावून जलरोधक केलं. बाहेरच्या तेलकट मुलाम्याने बाटली आकर्षक पण दिसू लागली. 

मंडळी, ही प्रत्येक बाटली हाताने बनवली जाते.  त्यासाठी ५ तासांचा कालावधी लागतो. सध्या ध्रीतीमन आणि त्याची टीम महिन्याला १५०० बाटल्या बनवते. या बाटल्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात. काहीवेळा ग्राहकाच्या पसंतीनुसार त्या बनवल्या जातात. त्याची किंमत २५०, ४०० ते ६०० ठेवण्यात आली आहे.

मंडळी, ही आयडिया तशी नवीन नाही. चीनमधला एक माणूस् अशा प्रकारच्या बाटल्या फार पूर्वीपासून विकत आहे. त्या बाटल्यांना आतून काचेचा मुलामा असतो आणि स्टीलचं झाकण असतं. ध्रीतीमनने शोधून काढलेली देसी बाटली फार झगामगा नसली तरी उपयोगी मात्र आहे.

कशी वाटली ही आयडिया ? तुमचं मत नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required