computer

आगीत भस्मसात झालेलं अपयश जगप्रसिद्ध खेळणी बनवून असं धुऊन काढलं-जाणून घ्या लेगोंची जन्मकथा!!

प्रतिभेला परिश्रमाची जोड मिळाली की आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटाला माणूस सहज समोरा जाऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. नशिबाच्या एका फटक्याने सर्वस्व नाहीसे झालेले लोक आपल्या जिद्दीने नशिबावरच मात करतात. पौराणिक कथेतली राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाचे उदाहरण आपण नेहमीच ऐकतो. अशीच एक कथा आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत.

या बहाद्दराचे सर्वस्व एका रात्रीत आगीने जाळून टाकले, पण हा पठ्ठ्या केवळ पुन्हा उभा राहिलाच असे नाही तर त्याने मुलांच्या खेळण्यांची अजरामर कंपनी तयार केली. या कंपनीचं नाव “लेगो”.

लेगो कंपनी आणि तिचे प्रसिद्ध खेळणी अस्तित्वात येण्यामागे आगीचं मोठं योगदान आहे. त्याचं झालं असं की लेगोचे जन्मदाता 'ऑल कर्क क्रिस्तीयान्सन' हे फर्निचरचं दुकान चालवायचे. एकेदिवशी दुकानातील लाकडांना आग लागली आणि संपूर्ण दुकानच पेटलं. या आगीने दुकानाची बिल्डींग जाळून खाक झाली. क्रिस्तीयान्सन हे शून्यावर आले. त्यांना नव्याने व्यवसाय उभारावा लागला.

(ऑल कर्क क्रिस्तीयान्सन)

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा” या ओळीप्रमाणे क्रिस्तीयान्सन यांनी पुन्हा व्यवसाय सुरु केला, पण यावेळी त्यांनी स्वस्तातली खेळणी विकायला सुरुवात केली. यासाठी नवीन कंपनीचा जन्म झाला. त्याचं नाव होतं “लेगो” (Lego). हे नाव डॅनिश शब्द “leg godt” यावरून जन्माला आलं. leg godt चा अर्थ होतो play well. या वाक्याचा अर्थच लेगोचा ब्रीदवाक्य आहे. खेळण्यांमधून मुलांच्या बुद्धीमत्तेला वाव देण्यासाठी लेगोने प्रयोग केले आहेत.

क्रिस्तीयान्सन यांनी सुरुवातीला लाकडी खेळणी विकली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी प्लास्टिक-इंजेक्शन मोल्डिंग मशीन विकत घेतली आणि खेळणी बनवण्याचे नवनवीन प्रयोग केले. १९४७ नंतर त्यांना ही खेळणी विकण्याची परवानगी मिळाली. यानंतर लेगोची गाडी सुस्साट धावायला लागली.

लेगो जगभर प्रसिद्ध तर झालीच पण या खेळण्यांवर आधारित सिनेमे पण आले. २०१४ पासून ५ सिनेमे येऊन गेलेत. यात लेगो बॅटमॅनचा पण समावेश आहे.

एक महत्वाची बाब अशी की लेगोचे मालक डॅनिश असले तरी त्यांनी कंपनीला इंग्रजी नाव दिलेलं आहे. या मागे फार मोठा विचार आहे. त्यांना मित्र राष्ट्रांना हे नाव अर्पण करायचं होतं. या मित्र राष्ट्रांनीच डेन्मार्कला दुसऱ्या महायुद्धात स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं.

मंडळी, काहीवेळा वाईटातल्या वाईट गोष्टीतूनही काहीतरी चांगलं निघू शकतं. लेगो कंपनीच्या आगीतून खेळण्याचा एक नवीन प्रकार जन्माला आला. जवळजवळ ७० वर्षानंतरही ही खेळणी मुलांमध्ये तेवढीच प्रसिद्ध आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required