computer

महिला चालकांना कितीही नावं ठेवा, पण या बाईंमुळेच आज आपण कार चालवत आहोत..

रस्त्यावर कुणीही जरा वेडीवाकडी गाडी चालवली, लोक लगेच “हां, बाई गाडी चालवत असणार.” असं म्हणतात. कितीतरी पुरूष वाईट ड्रायव्हर असतात, पण दोषाच्या धनी होतात त्या नेहमी बायका. पण माहीत आहे का, जगातला सगळ्यात पहिला कारमधून केला गेलेला लांबचा प्रवास हा एका बाईनं केला होता ते? या बाई नुसत्या प्रवास करून थांबल्या नाहीत, तर त्यांनी प्रवासादरम्यान कारमध्ये काही बदल केले आणि पुढच्या सुखकर प्रवासांसाठी कारमध्ये काय बदल आवश्यक आहेत हे ही सांगितलं.  

या बाईंचं नांव आहे बर्था  रिंगर-बेन्झ!! हो, बेन्झ म्हटल्यावर लगेच लिंक लागली असेल ना? हो, कार्ल बेन्झच्या म्हणजेच नवर्‍याच्या गाडीला खर्‍या अर्थानं प्रसिद्ध बर्थांनीच केलं..

कार्ल आणि बर्था बेन्झ त्यांच्या गाडीसोबत..

कार्ल बेन्झना आधीपासून घोड्याशिवाय धावणारी गाडी बनवायची होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले होते. पण हा उद्योग चालू केल्यापासून वर्षभरातच पैशांचं पाठबळ आणि बेभरवशाच्या भागीदारामुळं डबघाईला आला. एव्हाना कार्ल बेन्झ आणि बर्था रिंगर यांचं लग्न ठरलं होतं. बर्था श्रीमंत घरातल्या होत्या, त्यामुळं त्यांनी भावी हुंड्याच्या पैशातून कार्लच्या कंपनीत गुंतवणूक केली. हे वर्ष होतं १८७०. पुढं दोन वर्षांतच त्यांचं लग्न झालं आणि तेव्हाच्या जर्मन कायद्यानुसार बर्थाचा कार्लची पत्नी असल्यानं गुंतवणूकदार म्हणून त्या कंपनीतला हक्क संपला. पण तरीही कार्ल तिच्याकडून हुंड्यातून आलेली रक्कम त्याच्या कंपनीत वापरत होते.

कार्ल बेन्झनी त्यांच्या स्वप्नातली घोड्याशिवाय धावणारी पहिली कार १८८५मध्ये बनवली आणि तिला नांव दिलं- बेन्झ पेटंट मोटारवॅगन. पूर्णपणे स्वयंचलित असलेली ही होती जगातली पहिलीवहिली कार. २९ जानेवारी १८८६मध्ये त्यांनी या कारसाठी पेटंटही घेतलं.

पण या कारच्या चाचण्या घेताना काय गंमती झाल्या माहित आहे? १८८५मध्ये डिझाईन केलेली कार कंट्रोलच होत नव्हती. चाचणीच्या दरम्यानच ती जाऊन एका भिंतीला धडकली. मग कार्लनी १८८६मध्ये आधीच्या कारमध्ये बदल करून दुसरी कार आणली. तिची लोकांसमोरची चाचणी चांगली झाली, पण असं म्हणतात की त्या चाचणीच्या वेळेस रस्त्यावरून एक खाटिक त्याच्या घोडागाडीतून त्याचा माल घेऊन जात होता. तर तो घोडा विनाघोडयाच्या गाडीला पाहून घाबरून उधळला आणि त्या खाटकाचा खराब झालेला सगळा माल बेन्झना विकत घ्यावा लागला. १८८८च्या पूर्वार्धात बेन्झनी आणखी सुधारणा केलेली गाडी बनवली, तिला लोक तिसर्‍या क्रमांकाची बेन्झ पेटंट मोटारवॅगन म्हणून ओळखतात. या गाडीची विक्रीही सुरू झाली होती.

पण.... हा सगळा हौशी मामला होता. लोक मेकॅनिकच्या मदतीनं अगदी इथून तिथंपर्यंत जायचे आणि परत यायचे. कुणीच गाडी खरोखरीच्या प्रवासासाठी म्हणून वापरली नव्हती. बेन्झच्या गाड्यांची विक्रीही म्हणावी तशी नव्हती, लोकांचा या विनाघोड्यांच्या गाडीवर विश्वास नव्हता, या गाड्या खरोखरी प्रवासासाठी वापरता येतील असा कुणाला विश्वास वाटत नव्हता आणि या प्रोजेक्टमध्ये बेन्झ कुटुंबाचे बरेच पैसे खर्च झाले होते. आतापर्यंत चांगलीच कमाई व्हायला हवी होती, पण होत मात्र नव्हती.

बर्थांनी हीच कार चालवली, तिचं स्टिअरिंग व्हील तर पाहा..

आणि तेव्हा १८८८च्या ऑगस्टमध्ये ३९वर्षांच्या आणि पाच मुलांची आई असलेल्या बर्था १९४ किलोमीटर्स म्हणजे १२१ मैलांवर राहणार्‍या आईला भेटायला भल्या पहाटे निघाल्या. सोबत होती १३ वर्षांचा रिचर्ड आणि १५ वर्षांचा युजीन या त्यांच्या दोन मुलांची. गाडीला पेट्रोलची टाकी नव्हती आणि कार्बोरेटरमध्ये फक्त ४.५ लिटर पेट्रोल राहू शकत असे. बरं, गाडीत पेट्रोलपण थेट वापरता येत नसे, त्यासाठी लिगोरीन नावाचं पेट्रोल थिनर लागे. तेव्हा गाड्याच नव्हत्या तर पेट्रोलपंप काय असणार कप्पाळ?

या प्रवासादरम्यान काय घडलं?

--तेव्हा १८८८ मध्ये पेट्रोल आणि इंधनं औषधांच्या दुकानात मिळत असत. तेव्हा प्रवासादरम्यान बर्थांनी अशी लिगोरीन आणि पेट्रोल विकणारी मेडिकलची दुकानं शोधून काढली. जर्मनीतल्या विश्लॅक्स(Wiesloch)  या ठिकाणच्या दुकानात  त्यांनी लिगोरीन विकत घेतलं आणि म्हणून या गावाला जगातलं पहिलं इंधन स्थानक म्हणून ओळखलं जातं.

--प्रवासात इंधनाच्या पाईपमध्ये कचरा जमा झाला होता. युरोपियन स्त्रिया हॅट घालत आणि  हॅट डोक्यावर राहावी म्हणून पिनच्या साहाय्याने ती केसांत जखडून ठेवत. बर्थांनी या हॅटपिनचा उपयोग करून इंधनाच्या पाईपमधला कचरा साफ केला आणि त्यांच्या गार्टर बेल्ट(स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांना असलेला बेल्टचा प्रकार)चा इन्सुलेटर म्हणून उपयोग केला.

--त्यांच्या गाडीचे लाकडी ब्रेक्स चालेनात म्हणून एका चप्पल दुरूस्त करणार्‍याकडे जाऊन तिथं त्यांनी चामड्याचे ब्रेक पॅड्स बनवून घेतले. हे जगातले पहिले ब्रेक पॅड्स म्हणून प्रसिद्ध झाले.

--आता आपल्याकडे रेडिएटरमध्ये कूलंट टाकतात, पण तेव्हा गाडीचं इंजिन खूप गरम होऊ नये म्हणून पाणी टाकावं लागायचं. या प्रवासात सारखं पाणी टाकावं लागण्याचा चांगलाच त्रास बर्था बेन्झना झाला.

--या कारला दोनच गिअर्स होते. त्यामुळं गाडी चढावर चढू शकली नाही. बिचार्‍या युजीन आणि रिचर्डना चढावर गाडी  ढकलत न्यावी लागली.

--प्रवासादरम्यानच्या गावातले लोक या घोड्याविना चालणार्‍या गाडीला घाबरले. त्यांना हे सैतानाचं काम वाटलं. पण यामुळं बर्थांना आणि बेन्झच्या गाडीला खूप प्रसिद्धीही मिळाली.

--जाताना वाटेत लागलेल्या चढ्या डोंगररांगांना बर्था घाबरल्या होत्या त्यामुळं परत येताना बर्थां दुसर्‍या मार्गाने परतल्या.

बर्था बेन्झ त्यांच्या चार मुलांसोबत..

भल्या पहाटे निघालेल्या बर्था संध्याकाळ होताहोता माहेरी पोचल्या. त्यांनी या प्रवासाबद्दल कार्लना काहीच सांगितलं नव्हतं किंवा परवानगीही घेतली नव्हती. घरी पोचल्यावर त्यांनी तार करून नवर्‍याला आपल्या पराक्रमाबद्दल कळवलं.

परत आल्यावर बर्थांनी मिळालेल्या अनुभवांच्या शिदोरीच्या साहाय्यानं कार्लना त्यांच्या गाडीत सुधारणा सुचवल्या. त्यानुसार गाडीला चढावर चढण्यासाठी आणखी एक गिअर आणि ब्रेकची पॉवर वाढवण्यासाठी ब्रेक लाईनिंग या दोन सुधारणा त्यांतल्या अत्यंत महत्वाच्या होत.

बर्थांनी त्यांच्या या प्रवासामुळं कारचं सामर्थ्य आणि त्या कारनिर्मिती उद्योगाची महती, या दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या. तब्बल १९४ किलोमीटरच्या ज्या मार्गावरून बर्थांनी प्रवास केला, त्या मार्गाला सन २००८पासून बर्था मेमोरियल रूट म्हणून मान्यता मिळाली आहे आणि तो जगातल्या लांबच्या मार्गांपैकी एक मानला जातो.

५ मे १९४४रोजी ९५ वर्षांच्या बर्थांचं निधन झालं. कार्ल बेन्झनी त्यांच्या पत्नीबद्दल लिहिलं होतं,” माझ्या आयुष्याची बोट जवळजवळ बुडायची वेळ आली असताना माझ्यासोबत फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे माझी पत्नी. तिच्या धाड्साने आणि निर्भयपणाने तिनं त्या बोटीला आशेचे शिड दिले”. तन-मन आणि धनानेही बर्थांनी आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला जे योगदान दिलं आहे, त्यासाठी आपण नेहमीच त्यांचे ऋणी राहू..

सबस्क्राईब करा

* indicates required