computer

बिल गेट्स आणि वॉरन बफे यांचा ऊर्जाप्रकल्प भविष्य कसे बदलेल? नायट्रियम न्यूक्लियर रिऍक्टर प्रोजेक्ट काय आहे?

बिल गेट्स हे नाव तुम्हाला फक्त कंप्युटर आणि आयटीशी (आणि सध्या त्याच्या गाजणार्‍या घटस्फोटाशी) संबंधित वाटत असेल आणि वॉरन बफे हे नाव फक्त गुंतवणूकीशी संबंधित वाटत असेल. आपापल्या क्षेत्रातल्या दोन दिग्गजांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे यांच्याकडे असणारा प्रचंड पैसा !

हे दोन्ही मित्र देखील आहेत हे दोन्ही मित्र आता एकत्र येऊन एका वेगळ्याच क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. आता कोणीही हा विचार करेल की ह्यांचं काय बॉ, आहेत पैसे बक्कळ तर गुंतवतील अणुउर्जेत आणि करतील दोनाचे चार! आज इथे प्लँट टाकतील तर उद्या मंगळावर टाकतील! सगळा पैशाचा खेळ आहे ! तर मग ही बातमी वाचण्यात काय मतलब आहे ? पण तुम्हाला कल्पना आहेच की बातमीत 'दम' असल्याशिवाय बोभाटा होत नाही. पण आधी हा काय प्रकल्प आहे ते जाणून घेऊ या !

बिल गेट्सने अणुऊर्जेचे महत्त्व ओळखून १५ वर्षांपूर्वी टेरापॉवर नावाची एक कंपनी सुरू केली होती. तर वॉरन बफेची पॅसीफाय पॉवर नावाची एक कंपनी आहे. तर या दोन्ही कंपन्या मिळून 'नायट्रियम न्यूक्लियर रिऍक्टर प्रोजेक्ट' सुरू करत आहेत. म्हणजे चक्क एक अणुभट्टी उभारून त्यावर आधारीत उर्जा प्रल्प उभा होत आहे.

अमेरिकेत वायोमींग नावाचे कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. याच राज्यात त्यांचा हा प्रकल्प येऊ घातला आहे. या राज्यात नेमका कुठे प्रकल्प येईल हे या वर्षाच्या शेवटी कळणार असले तरी एखाद्या बंद पडलेल्या कोळशाच्या प्लँटवर हा प्रकल्प येईल हे स्पष्ट आहे.

या प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे यात सोडीयम रिऍक्टरचा वापर करण्यात येणार आहे. यात असलेल्या मॉल्टन सॉल्ट एनर्जी स्टोरेज सिस्टीम यामुळे हा प्रकल्प इतर अणुऊर्जा प्रकल्पांच्या मानाने सुरक्षित, कमी खर्चिक तसेच अधिक कामगिरीक्षम असणार आहे.

तर या आता जाणून घेऊ या बातमीतला दम जो -मोल्टन सॉल्ट एनर्जी स्टोरेज - या चार शब्दात आहे. तर आता समजून घेऊ या की मोल्टन सॉल्ट एनर्जी स्टोरेज म्हणजे काय?

कोणत्याही भौगोलीक क्षेत्रात विजेची मागणी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्या क्षेत्रात दिवसरात्र काम करणारे कारखाने आहेत का? येत्या काही दिवसात हवामान बदलणार आहे का? येत्या काही दिवसात रोषणाई करावी लागेल असे उत्सव आहेत का? एक ना दोन अशी अनेक कारणे असतात. विजेची मागणी जास्तीतजास्त असते त्याला 'पीक पॉवर डिमांड पॉइंट' असे म्हणतात. हा पॉइंट कधीही बदलू शकतो. तो जसा बदलेल तसा पुरवठा झाला पाहीजे नाहीतर वीज पुरवठा बंद पडून खोळंबा होणार हे नक्की! अणुभट्टीत तयार होणारी उर्जा अशी ताबडतोब कमी जास्त करता येत नाही. असा त्वरीत बदल रँपींग या नावाने ओळखला जातो. हे रँपींग किती करायचे काही आयएसओ ने ठरवलेले नियम आहेत. मग यावर एकच उपाय आहे तो असा. जेव्हा मागणी 'पीक'ला नसेल तेव्हा जास्तीची उर्जा साठवून ठेवा आणि गरज लागेल तेव्हा वापरा. म्हणजेच वीज साठवून ठेवणंंआलं.

ही वीज साठवायचे अनेक मार्ग आहेत पण प्रत्येक मार्गाचा खर्च आहे. उदाहरणार्थ - बॅटरीमध्ये वीज जमा करून ठेवणं, म्हणजे बॅटर्‍या बनवण्याचा खर्च आला. यावर एक उपाय असा आहे की सोडीयम आणि पोटॅशियमच्या क्षारांमध्ये ही उर्जा साठवून ठेवायची. म्हणजे जेव्हा अतिरिक्त वीज हातात असेल तेव्हा हे क्षार वितळेपर्यंत गरम करून ठेवायचे आणि जेव्हा वीजेची मागणी वाढेल तेव्हा हीच उर्जा टर्बाइनला पुरवून अधिक वीजेची निर्मिती करायची.

पण मग हे करण्यासाठी पाणी पण वापरता येईल. हो शक्य आहे पण शाळेत असताना तुम्ही वाचलं असेलच की पाणी लवकर गरम होतं आणि थंडही होतं. म्हणजे पाण्यात साठवलेली उर्जा लवकर संपते. सोडीयम आणि पोटॅशियमचे क्षार उर्जा मोठ्या काळापर्यंत साठवून ठेवू शकतात.

पुन्हा एकदा रोजच्या व्यवहारातील दाखला देतो. पाय मुरगळल्यावर गरम पाण्याचा शेक देण्याच्या ऐवजी गरम मिठाचा शेक देतात कारण मिठाचा शेक बराच वेळ टिकतो. अगदी हेच तत्व इथे वापरात येतं. फक्त साध्या मिठाऐवजी सोडीयम आणि पोटॅशियमचे नायट्रेट इथे वापरले जातात. साधारण ५४० अंश तापवल्यावर ते क्षार वितळतात, पण बराच काळ उर्जा धरून ठेवतात. याला म्हणतात मोल्टन सॉल्ट एनर्जी स्टोरेज !

हे खटाटोप करायचे नसतील तर दुसरा उपाय म्हणजे लिथीयमच्या बॅटरीत वीज साठवून ठेवायची. परंतु यासाठी येणारा खर्च हा मोल्टन सॉल्टपेक्षा ३३ पट महागडा आहे. मोल्टन सॉल्ट स्वस्त असतात. वितळलेले सॉल्ट पाण्याइतकेच प्रवाही असतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण सुरक्षित ठेवतात. म्हणजेच हे क्षार 'ग्रीन एनर्जी' देतात. त्यामुळेच बील गेट्स आणि वॉरन बफे यांनी हा मार्ग स्विकारला आहे. जास्तीतजास्त उर्जा आणि कमीतकमी पर्यावरणाची हानी !

बिल गेट्स यांनी वायोमींग चे गव्हर्नर मार्क गार्डन यांच्यासोबत बोलताना नायट्रियम हे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट करू शकतो असा दावा केला आहे. वायोमींग हे राज्य मोठ्या प्रमाणावर कोळसा उत्पादक असल्याने आणि इथे ग्रीन हाऊस गॅसची निर्मिती देखील अधिक होत असल्याने या ठिकाणी या प्रकल्प सुरू करण्यामागील कारणे उलगडू शकतात.

अनेक अभ्यासक तर याला पुढील पिढीची अणुऊर्जा म्हणत आहेत. यातील सोप्या डिजाईनमुळे कमी पैशांत अधिक कामे होणार आहे. नेहमीच्या अणुऊर्जा प्रकल्पाएवढेच यावर अवलंबून राहिले तर या प्रकल्पातील ३४५ मेगावॅट ऊर्जा ही अडीच लाख घरांना ऊर्जा पुरवू शकते. त्याचप्रमाणे या प्रकल्पातून तयार होणाऱ्या हायड्रोजनच्या माध्यमातून ट्रक आणि इतर गाड्या देखील चालू शकणार आहेत.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगवान, कमी खर्चिक आहेच पण पर्यावरण आणि इतर गोष्टींच्या दृष्टी महत्त्वाचा आहे असे म्हणायला जागा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required