computer

बोभाटाची बाग - भाग १३ : ओळखा आजच्या बोभाटा बागेतली फुलं कशाची आहेत? यातल्या एका झाडाचं फळ तर आपण नेहमीच खातो!

या, आज आम्ही बोभाटाच्या बागेत फिरता फिरता तुम्हाला दोन कोडी घालणार आहोत. कोडी फारशी कठीण नाहीत, पण सहजासहजी सुटणारी पण नाहीत हे नक्की. तुम्हाला दोन सुंदर फुलं दाखवतो, तुम्ही फक्त ती कसली फूलं आहेत ते ओळखायचं!

आपला संबंध या फुलांच्या 'एंड प्रॉडक्ट' सोबत नेहमीच येतो. त्यामुळे पटकन सांगता येणार नाही, पण काही क्ल्यूज नक्की देतो ही कोडी सोडवायला!  

सोबत एकाच फुलाची चार छायाचित्र देत आहोत, ओळखून दाखवा हे फूल कशाचं आहे?? बोभाटाचे अनेक वाचक शेती करतात. ते हे फूल कदाचित ओळखतील. पण शहरी वाचकांना हे फूल कसलं आहे हे कळणार नाही. 

या झाडाच्या शेंगांशी आपला चांगलाच जवळचा संबंध आहे, पण त्या शेंगा या फुलाला धरत नाहीत. उपास असो वा नसो, यांसारखे चविष्ट दाणे मिळणं मुष्किलच आहे. पण बागेबाहेरच भय्या या शेंगा भाजतच असतो! इतकं सांगितल्यावर लक्षात आलं असेल की हे फूल आहे शेंगदाण्याचं!
 
चला एक कोडं तुम्ही सोडवलं असं गृहीत धरू या! दुसरं फूल मात्र तुम्ही ओळखणं फारच कठीण आहे!! बघा या फुलाचा फोटो आणि सांगा कसलं फूल आहे हे? डेव्हीडच्या स्टारसारखं दिसणारं हे फूल आहे कशाचं?

थोडेसे क्ल्यू देतो तुम्हाला! त्याच्या फळाची ओळख सांगतो. नात्यानं हे काकडीचं चुलतभावंड आहे, पण चवीला जरा डाव्या बाजूलाच आहे! याची भाजी बहुतेकांची नावडती भाजी आहे! या फुलाचं परागीभवन झाल्यावर येणारं फळ भलतंच लांबलचक असतं. भाज्या म्हणजेही फळच हे मात्र लक्षात असू द्या!  शास्त्रीय भाषेत Tricosanthes cucumerina हे त्याचं नामकरण आहे!

हे फळ वाळलं की आतून पोकळ असल्याने ऑस्ट्रेलीयातील आदिवासी यापासून बासरीसारखे वाद्य बनवतात! चला, फार टांगणीला न लावता सांगून टाकतो-हे फूल पडवळाचं आहे.
निसर्गाच्या खजिन्यात अशी अनेक कोडी आहेत जी सोडवता सोडवता कित्येक वर्षं निघून जातील. पण चार कोडी सुटली तर त्याचा आनंद जन्मभर पुरेल हे नक्की!! 

 

श्रेयनिर्देश- या लेखात वापरलेली शेंगदाण्याच्या फुलाची छायाचित्रं श्री नरेंद्र गोळे यांनी दिली आहेत. पडवळाच्या  फुलाचे छायाचित्र आणि माहिती आपल्या लेखिका अंजना देवस्थळे यांनी दिली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required