computer

व्हिडीओ ऑफ दि डे : ही कार तर चक्क समुद्रात तरंगून राह्यली ना भाऊ...हा व्हायरल व्हिडीओ पाह्यला का ?

पावसाळा सुरू झालाय मंडळी. आता वर्षासहलींना सुरुवात होईल. मंडळी,  निसर्गरम्य ठिकाणी फिरणे जेवढे आनंददायी आहे, तेवढेच धोकादायकसुद्धा आहे.  तरुणांचे पावसाळ्यात ट्रेक ठरलेले असतात. आता तरुण म्हटले म्हणजे धिंगाणा आलाच ना राव!! पण दरवर्षी अनेकांच्या जीवावर या निसर्गसफरी बेतल्याचे आपण वाचत असतो.  पावसाळ्यात ज्या ठिकाणांना निसर्गाचे वरदान लाभले आहे तिथे कमालीची गर्दी होते आणि मग सेल्फी काढताना, समुद्रात पोहताना, अचानक नदीला पाणी आल्याने लोक वाहून गेले, दरीत कोसळले, कुठे दरड कोसळून पूर्ण बस अपघातग्रस्त झाली अशा बातम्यांना पण उधाण  येईल.   गेल्या काही वर्षांत सेल्फीमुळे जीव जाण्याचे प्रमाण पण वाढले आहे राव!! सध्या अशीच एक घटना सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पालघरजवळ विरार जिल्ह्यात समुद्रात चक्क एक कार तरंगताना अनेकांना दिसली मंडळी!! आता त्याचा व्हिडिओसुद्धा वायरल झाला आहे. असं म्हणतात की ती कार समुद्राकाठच्या रेतीत अडकली होती. तिथं अडकल्यानंतर कार बाहेर निघणे कठीण होऊन बसले होते. त्यात पाऊस सुरू झाला. त्यात वरुन जोरदार लाटा आदळू लागल्या आणि कार लाटांसोबत इकडे तिकडे होत होती. व्हिडिओत 2 लोक कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण उधाणलेल्या समुद्रापुढे कुणाचे चालणार आहे राव!! 

पोलीस सांगत आहेत की काही लोकांचा ग्रुप समुद्र किनारी पावसाचा आनंद घ्यावा म्हणून फिरायला गेला होता. पण तो आनंद त्यांच्या जीवावर बेतला मंडळी!! सुदैवाने जीवावर आले ते कारवर निभावले. त्या लोकांचा ग्रुप भरती दरम्यान कार किनाऱ्याजवळ घेऊन गेले. समुद्राच्या थोडे आत गेल्यावर मात्र कारचे टायर रेतीमध्ये फसले. त्यानंतर बराच वेळ कार लाटांसोबत तरंगत होती. 

बाहेर आलेल्या विडिओमध्ये कार जोरदार लाटांत फसल्याचे दिसत आहे. याचदरम्यान एक माणूस कारचा दरवाजा उघडून कारच्या बाहेर उडी मारतानाही दिसतो. सुदैवाने कार खूप आत जाण्याच्या आधी तो बाहेर आला. व्हिडिओत लाटांचा वेग पाहता त्या लाटा कारला वाहून नेत आहेत असे दिसतेय. अशात मग त्यात माणसाची काय खैर!! पूर्णपणे लाटांनी वेढलेल्या कारकडे एक माणूस मदतीसाठी पळत येताना दिसत आहे. कारमध्ये किती लोक होती हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु या अपघातात कुणालाच जखम झालेली नाहीय.  ती कार बराच वेळ समुद्रात तशीच तरंगत होती असं म्हटलं जात आहे. नंतर समुद्राजवळच्या गावातून एक ट्रॅक्टर बोलवून कार बाहेर काढण्यात आली. 

मंडळी, हवामान खात्यानुसार मंगळवार किंवा बुधवारी मान्सून कोकणात दाखल होईल. अशावेळी  समुद्राला जोरदार उधाण येते. पालघर मुंबईपासून अगदीच जवळ असल्याने मुंबईसहित पूर्ण कोकणात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आता हे सुरूच राहणार मंडळी. पाऊस आपल्यासाठी थांबून राहत नाही. आपल्याला आपली सोय सांभाळणे गरजेचे आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यास आपला निसर्ग सफरीचा प्लॅन पुढे ढकलणे केव्हापण योग्य. मान्सूनमध्ये अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढते राव!! म्हणून मान्सूनचा आनंद घेण्याबरोबर काळजी घेणे पण गरजेचे आहे.

तेव्हा आता वर्षासहल प्लॅन करा, पण आपली आणि सोबतच्या लोकांची काळजीही घ्या. मुख्य म्हणजे, भलते धाडस करायला जाऊ नका.

सबस्क्राईब करा

* indicates required