computer

शर्मिला आणि टायगर पतौडीच्या लग्नाची गोष्ट....क्रिकेट आणि बॉलिवूडची पहिली लव्ह स्टोरी वादग्रस्त का ठरली ?

मंडळी, प्रेम ठरवून होत नसतं. कधी कोण आवडेल हे सांगता येत नाही. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते नेत्यांपर्यंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटी पासून ते क्रिकेटर्स पर्यंत कुणीही याला अपवाद असू शकत नाही. आणि एकदा कुणावर प्रेम झालं की त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जातात…

तर आज आम्ही अशीच एक आगळीवेगळी लव्हस्टोरी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. ही स्टोरी अनेक अर्थांनी वेगळी आहे. या प्रेमकथेने बरीच सामाजिक उलथापालथ केली होती आणि चित्रपट क्षेत्रात तसेच क्रिकेट विश्वात क्रांती घडवली असे म्हणायला सुद्धा हरकत नसावी… चला तर मग जाणून घेऊया ‘शर्मिला टागोर - मन्सूर अली खान पतौडी’ यांची ही प्रेमकहाणी…

ते साठचे दशक होते. त्यावेळी आतासारखी सामाजिक मोकळीक नव्हती. क्रश होते पण दिवसाला दहावेळा ब्रेकअप होत नव्हते. प्रेम करणंच मुळात भव्यदिव्य कामगिरी समजली जायची. आणि अशा काळात ही प्रेम कहाणी घडली. क्रिकेट मैदानावर ज्यांना ‘टायगर’ म्हणून ओळखलं जायचं त्या पतौडी यांचे जीवन कुठल्या सिनेमापेक्षा कमी नव्हते! नवाबी खानदानात जन्म घेतलेल्या मन्सूर अली खान यांनी क्रिकेट मैदान सुद्धा गाजवलं आणि शर्मिला टागोरला ‘पटवलं’.

शर्मिला टागोर सुद्धा सिनेक्षेत्रात टॉपवर असणारी अभिनेत्री होती. तिचे फिल्मी करिअर त्यावेळी शिखरावर होते. म्हणजेच दोघेही आपापल्या क्षेत्रात अव्वल कामगिरी करत होते. ते पहिल्यांदा कसे भेटले हा किस्सा वाचण्यासारखा आहे. १९६४ साली कलकत्ता येथे दोघांची भेट झाली. त्यावेळी मन्सूर आली यांना शर्मिला एक यशस्वी अभिनेत्री आहे हे माहित नव्हतं. शर्मिलाला मात्र क्रिकेट आणि पतौडी दोघांची माहिती होती. त्यांची ओळख क्रिकेटर एम. एल. जयसिंम्हा यांनी करून दिली. पहिल्या भेटीतच मन्सूर अली यांनी शर्मिलाला दिल्लीच्या पतौडी हाऊसचा नंबर दिला होता.

भारत विरुद्ध इंग्लंडच्या एका सामन्यात त्यावेळी मन्सूर अली यांनी नाबाद २०३ धावा केल्या होत्या. या यशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी शर्मिलाने पतौडी हाऊसचा नंबर फिरवला. त्यावेळी मन्सूर अली तिथे नव्हते म्हणून मग शर्मिलाने आपला नंबर देऊन ठेवला. थोड्यावेळाने मन्सूर आली यांचा शर्मिलाला फोन आला. दोघांची बोलणी झाली. इथून पुढे त्यांची मैत्री वाढत गेली आणि लवकरच नवाब शर्मिलावर फिदा झाले.

मग रीतसर मन्सूर अलींनी शर्मिला समोर आपल्या प्रेमाचा इजहार केला. असं म्हणतात की त्यांनी त्या काळात अगदी नवीनच आलेले रेफ्रिजरेटर शर्मिलाला भेट म्हणून दिले होते. शर्मिला जेव्हा क्रिकेट मॅच बघायला मैदानात येत असे तेव्हा तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी ती जिथे बसली आहे त्या बाजूला टायगर खान षटकार ठोकायचे म्हणे! शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि टागोरांच्या या कन्येने त्या प्रेमाचा स्वीकार केला. पण सर्व छान छान होईल ती प्रेमकहाणी कसली मंडळी? या कहाणीत सुद्धा बऱ्याच अडचणी होत्या.

मुख्य अडचण अर्थातच वेगळे धर्म! त्या काळात एका हिंदू मुलीने, ते सुद्धा रवींद्रनाथ टागोरांचा वारसा सांगणाऱ्या मुलीने मुस्लिम पुरुषाशी लग्न करावे हे कुणालाच पचनी पडणारे नव्हते. याखेरीज पतौडी खानदानाच्या राहणीमानाच्या ज्या गोष्टी टागोर कुटुंबाच्या कानावर पडल्या होत्या त्याही फारशा चांगल्या नव्हत्या.

तिकडे पतौडी हे भोपाळचे नवाब होते. त्या राजेशाही घराण्यात सिनेमातील नटीने बेगम बनून प्रवेश करावा यालाही विरोध होताच. कारण तेव्हा शर्मिला ही ‘बिकिनी गर्ल’ म्हणून गाजत होती. तिचे बिकिनी मधील फोटो प्रसिद्ध झाले होते. परंपरा जपणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला हे कसे मान्य होईल?  पण मन्सूर अली खान यांच्या आईने शेवटी एका अटीवर मान्यता दिली… ती अट म्हणजे शर्मिलाने रीतसर इस्लाम धर्म स्वीकारावा तरच हे लग्न होईल. अर्थातच ही अट दोघांनी मान्य केली आणि शर्मिला टागोर आयेशा सुलतान बनली.

लोकांचाही या लग्नाला विरोध होता. पहिलं कारण म्हणजे मन्सूर अलींचा धर्म आणि दुसरं कारण होतं त्यांचा नसलेला एक डोळा. १९६१ साली ब्रिटन मध्ये झालेल्या एका कार अपघातात त्यांच्या डोळ्यात कारची तुटलेली विंडशील्ड शिरली होती. या अपघाताने त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला होता. लोकांना एका बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीने मुस्लीम आणि त्यातही एक डोळा नसलेल्या क्रिकेटरची लग्न करणं पटलं नव्हतं.

पण अखेर, ‘जब मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी ?’ प्रत्येक विरोधावर मात करत चार वर्षे चाललेला प्रेमाचा प्रवास 27 डिसेंबर 1969 रोजी सफल झाला आणि दोघांचा निकाह झाला.

या लग्नामुळे क्रिकेट आणि फिल्म दोन्ही क्षेत्रात खळबळ माजली. लग्नानंतर शर्मिला परत सिनेमात काम करणार की नाही याबाबत शंका घेतल्या गेल्या. पण मन्सूर अली हे मोकळ्या विचारांचे असल्याने त्यांनी शर्मिलाला काम करण्यास मज्जाव केला नाही हे विशेष! लग्नानंतरही शर्मिलाने अनेक हिट सिनेमे दिले. आराधना आणि अमर प्रेम हे सिनेमे त्यापैकीच आहेत.

मंडळी, अनेक विरोधाभास असणारा हा विवाह टिकेल की नाही अशी शंका घेणारे बरेच लोक होते. पण एकमेकांची मनस्वी साथ देऊन मन्सूर अली आणि शर्मिला यांनी हा विवाह टिकवला. नुसता टिकवलाच नव्हे तर यशस्वी सुद्धा करून दाखवला. त्यांना तीन मुले झाली. सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान. त्यापैकी सैफ, सोहा हे दोघेही सिनेमातच कार्यरत आहेत आणि सबा ही आघाडीची ज्वेलरी डिझायनर आहे. अनेक वर्षांच्या सहवासानंतर फुफ्फुसाच्या विकारामुळे मन्सूर अली वयाच्या सत्तराव्या वर्षी 2011 साली निधन पावले.

ही प्रेमकहाणी कशी वाटली मंडळी? कमेंट्स मध्ये आवर्जून कळवा आणि नक्की शेअर करा…

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required