computer

जगातल्या सर्वात श्रीमंत ८ लोकांच्या या गाड्या पाहा, कदाचित तुमची गाडी काही लोकांच्या गाडीपेक्षा जास्त महाग असेल..

मंडळी, करोडपती, अरबपती माणूस म्हटला की त्याची लाइफस्टाइल तशीच महागडी असणार असाच आपला समाज असतो. पण हे खोटं ठरवलंय जगातील काही मोजक्या अतिश्रीमंत माणसांनी. आज आपण या अतिश्रीमंत लोकांच्या कार्सबद्दल जाणून घेणार आहोत. एवढ्या गर्भश्रीमंत माणसांकडे किती कोटी रुपयांच्या गाड्या असतील असा विचार करत असाल तर तुम्हाला जबरदस्त धक्का बसणार आहे. या श्रीमंत माणसांनी आपल्या साधेपणातून त्यांच्याकडच्या श्रीमंतीचा कुठेही भपकेबाजपणा दाखवलेला नाही.

चला तर जगातील ८ सर्वात श्रीमंत लोकांकडे कोणत्या कार्स आहेत ते पाहूयात.

१. मार्क झुकरबर्ग

फेसबुक आणि whatsapp चा मालक मार्क झुकरबर्ग दर वर्षाकाठी ६० बिलियन डॉलर कमावतो, पण तो वापरात असेलेली कार केवळ १६,००० डॉलर्स किमतीची ‘होंडा फिट’ आहे. ही कार सामान्य अमेरिकन माणसालाही परवडण्यासारखी आहे.  

२. स्टीव्ह बॅलमर

स्टीव्ह बॅलमेर हे मायक्रोसॉफ्टचे माजी CEO आहेत. त्यांची गणती जगातील अतिश्रीमंत उद्योगपतींमध्ये होते. त्यांच्या कारकडे बघून त्यांच्या श्रीमंतीची कल्पनाही येणार नाही. त्यांची कार ३१,००० डॉलर्सची ‘फोर्ड फ्युझन हायब्रीड’ आहे.

३. वॉरन बफे

वॉरन बफे हे आज सर्वांसाठी एक आदर्श बनलेले आहेत. त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. त्यांच्याकडच्या संपत्ती खेरीज ते त्यांच्या साधेपणासाठी ओळखला जातात. त्यांच्या कारची किंमत आहे जवळजवळ ५७००० रुपये. ते Cadillac XTS ही कार चालवतात.

४. स्टीव्ह वॉझ्नियाक

स्टीव्ह वॉझ्नियाक हे नाव स्टीव्ह जॉब्स इतकं प्रसिद्ध नाही, पण अॅपलच्या निर्मितीत स्टीव्ह वॉझ्नियाक यांचं योगदान हे स्टीव्ह जॉब्स यांच्या इतकंच मोठं आहे. हे सर्व बाजूला सारून त्यांची कार मात्र ते एक साधारण अमेरिकन असल्याचंच भासवते. स्टीव्ह वॉझ्नियाक ३८,००० डॉलर्सची शेवर्ले बोल्ट चालवतात.

५. रतन टाटा

टाटा कुटुंबीयांनी भारताच्या जडणघडणीत दिलेलं योगदान फार मोठं आहे. रतन टाटा यांच्या रोजच्या जीवनात मात्र याचा दिखावा आढळत नाही. त्यांच्याकडे नेक्स्न SUV कार असून या कारची किंमत  फक्त ६.२३ लाख आहे.

६. नारायण मूर्ती

भारतातल्या महत्वाच्या मोजक्या उद्योगपतींमध्ये नारायण मूर्तींचा समावेश होतो. त्यांच्याकडे असलेली कार मात्र अगदी साधी आहे. ते ‘महिंद्रा स्कॉर्पिओ’ वापरतात. या कारची किंमत अगदी १० लाखांपर्यंत आहे.

७. नंदन निलेकणी

नंदन निलेकणी हे इन्फोसिसचे माजी CEO आहेत. आज आपल्याकडे जो आधार कार्ड आहे तो त्यांच्याच कल्पनेतून आला आहे. अशा महत्वाच्या व्यक्तीची कारही तेवढीच भारी असली पाहिजे, पण याउलट ते भारताच्या रस्त्यारस्त्यावर दिसणारी ‘टोयोटा इनोव्हा’ वापरतात. या कारची किंमत केवळ १४ लाख आहे.

८. आनंद महिंद्रा

एखादा उद्योगपती जे विकतो तेच वापरतो असं फार क्वचित पाहायला मिळतं. आनंद महिंद्र याला अपवाद आहेत. ते महिंद्र कंपनीचीच कार ‘महिंद्र TUV300’ वापरतात.  

 

तर मंडळी, अशाप्रकारे ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ या म्हणीचा अर्थ या लोकांकडे बघून समजतो.