computer

लेन्सकथा : इटालियन फोटोग्राफरच्या नजरेतून लॉकडाऊनच्या फोटोकथा !!

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने फोटो आणि सेल्फी काढणं अगदीच सोपं झालं. असं असलं तरी लाईट, फ्रेम, कपोझिशन या गोष्टी प्रत्येकालाच ऍडजस्ट करता येतात असं नाही. फोटो काढणं ही एक कला आहे आणि त्या ही पलीकडे इतर समाज माध्यमांसारखाच फोटो  हे  जनजागृती करण्याचं आणि आसपासच्या घटना उजेडात आणण्याच एक माध्यम आहे. याचमुळेच तर कितीतरी जागतिक घटनांचं दृश्य स्वरूपात डॉक्युमेंटेशन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात होऊ शकलय. अशाच काळावर आपली छाप सोडणाऱ्या आणि आज फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांसमोर वेगळं जग मांडू पाहणाऱ्या फोटोग्राफर्सच्या कामा विषयी या सिरीजच्या माध्यमातून लिहीण्याचा मानस आहे.

इन्व्हायरमेंटल फोटोग्राफी आणि जनजागृती, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि वन्य जीवन, घरदार नसणाऱ्या बायका त्यांचं जीवन या सारख्या विषयांचा समावेश असेल.

जर तुम्हाला कुणी सांगितलं की मार्च महिन्यात कोरोना व्हायरस संपूर्ण इटलीमध्ये पसरत असताना लॉकडाऊन घोषित केल्यावर एक फोटोग्राफर फोटो काढत फिरत होता तर?  हो, एक कलंदर माणूस हे काम करत होता. या इटालियन फोटोग्राफरचं नाव आहे  ॲलेक्स माजोली. कोरोना आणि लॉकडाऊनचा नेमका काय परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर होतोय हे टिपणं हा त्याचा या फोटो काढण्यामागचा मूळ हेतू होता. 

गेल्या कित्येक वर्षांपासून ॲलेक्स माजोली त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्या कॅमेरात कैद करत आहेत. युद्ध आणि त्यातून येणारा संघर्ष हे त्यांच्या फोटोंचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. कोरोना महामारी ही युद्धातून जन्मली नसली तरी पूर्ण जग एका अभूतपूर्व अशा संघर्षाला सामोरे जात आहे. साहजिकच या परिस्थितीचे फोटो त्यांना टिपायचे होते.  तसा ॲलेक्स माजोली यांचा जन्म इटलीतल्या रेवन्ना भागातला. किंबहुना तिथल्या उत्तर भागातला. त्यांच्या मते उत्तरेकडील माणसं इतरांच्या दुःखात खूप आत्मियतेने सहभागी होतात. तिथली प्रत्येक गोष्ट इतर अनेक ठिकाणांपेक्षा अधिक नाट्यमय असते. त्यात काव्य असतं. या सर्व गोष्टींमुळेच की काय, पण ॲलेक्स जेव्हा इटलीच्याच सिसीली भागात काम करु लागले, तेव्हा त्यांना तिथे ही नाट्यमयता आणि काव्य अधिक तीव्रतेनं जाणवलं. हे सिसीलीकर संवेदनशील आहेत. त्यामुळं त्यांना दुःख अधिक खोलवर जाणवतं.  ते या दु:खांचं तत्वज्ञान अधिक खोलवर जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माजोलींना जाणवलं की सिसिलीत त्यांना या कोरोना शोकांतिकेच दृश्यस्वरूप अधिक सुस्पष्ट दिसेल.

माजोली ज्या सिसिली विषयी सांगतायत त्या सिसिलितलं सांस्कृतिक जग हे इटलीपेक्षा निराळं आहे. तिथली संस्कृती, स्थापत्यं, शिल्पं ही इटलीतल्या इतर भागांहून वेगळी आहेत.  इथल्या माणसांना आम्ही इटालियनपेक्षा आम्ही 'सिसिलियन' सांगताना जास्त अभिमान वाटतो. माणसा-माणसांतल्या संबंधावर इथली माणसं दृढ विश्वास ठेवतात. मग अर्थातच गेली तीस वर्ष फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ॲलेक्स माजोलींना लॉकडाऊन काळात सिसिलीचं आकर्षण वाटणं अगदीच साहजिक आहे.

माजोलींच्या मते स्वातंत्र्याची खरी व्याख्या म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य.  ज्या दिवसांत लोकांना घराबाहेर वा हवं तिथे बाहेर जाता न येणं म्हणजे जवळजवळ पारतंत्र्यच. पण स्वहितासाठी लादण्यात आलेल्या या पारतंत्र्याला लोक कसं सामोरं जात आहेत या विषयीचं चित्रण माजोली यांनी लॉकडाऊनच्या काळात काढलेल्या फोटोत आहे. एकीकडे कोरोना हे जैविक युद्ध आहे की नाही यावर वाद होत असतानाच माजोली यांच्या एका जुन्या व्हिडिओतलं वाक्य पुन्हा आजच्या परिस्थितिला चपखल बसतं. ते म्हणतात "युद्ध ही अत्यंत भयावह गोष्ट आहे. युद्धात माणसाचं खरं रूप जगासमोर येतं." माजोलींच्या या म्हणण्याचा आणि त्यांनी लॉकडाऊन मध्ये काढलेल्या फोटोंचा ताळमेळ लावायचा झाला तर माणूस हा स्वतःच्या जीवाला जपणारा आणि वरवर अत्यंत धीट वाटत असला तरी जीवावर बेतणाऱ्या संकटाला पाहून भेदरणारा प्राणी आहे हेच दिसून येतं. 

त्यांच्या एका फोटोत बसच्या आत प्रवाशांपासून स्वतःला वेगळं ठेवण्यासाठी ड्रायव्हरने चिकटपट्ट्या/ मास्किंग टेप वापरून एक आडोसा तयार केलाय हे दिसतंय. 

कोरोनाच्या या अवघड परिस्थिती आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांचा ही फोटो माजोलींनी काढलाय. योग्य ती सर्व दक्षता घेत तोंडाला मास्क लावून हे डॉक्टर गंभीर मुद्द्यावर बोलण्यासाठी एकत्र जमल्याचं आपल्याला फोटोत दिसतंय.

एका फोटोत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी चालू असणारी लगबग आपल्यला दिसतेय तर एका फोटोत कबुतरां मधून वाट काढत आपली रिकामी ट्रॉली ढकलणारा एक माणूस माजोलींनी टिपलाय. 

शहरातले रस्ते ओस पडलेले दिसत आहेत आणि शहरात ज्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची नागरिकांना दहशत वाटते ते जरा बिनधास्त फिरतायत.

एका फोटोत एक माणूस चर्चच्या पायऱ्यावर बसून आपला मोबाईल पाहतोय.  आजच्या घडीला माणूस ईश्वर आणि विज्ञान दोघांवर सारखाच अवलंबून आहे असं आपल्यला पाहताना वाटत आहे.

कोरोनाची दहशत एवढी आहे की प्रत्येकजण स्वतःच्या जीवाला जपतोय. कडकडीत बंद आहे म्हणूनच मध्यवर्ती भागात एरवी गर्दीने वेढलेला पुतळा आज एकटा आहे आणि एक परफेक्ट फ्रेम कॅप्चर करण्यासाठी बराच वेळ ताटकळावं लागलंय. त्या फोटोत पुतळ्यापासून फार दूरवरून एक माणूस चालत जातोय आणि त्याच्या सोबत पावलाशी रेंगाळणारी सावली फरफटत जातेय, जणू काही तो माणसाच्या मागे लागलेला काळ असावा.

आणि एका फोटोत एका प्रार्थना स्थळासमोर एक इसम ईश्वराची प्रार्थना करताना दिसतोय. जणू काही मृत्यू हे अंतिम सत्य असलं तरी तो लांबणीवर टाकण्याची ताकद ईश्वरात आहे हे त्याने मान्य केलंय.

एकूण ॲलेक्स माजोली यांचे हे सगळे फोटो पाहून माणसाला जगण्याची तीव्र ओढ असते. त्याला गतिमान जगण्याचं व्यसन लागलंय हेच सारखं समोर येत राहतं.अॅलेक्स माजोली मॅग्नम फोटोज चे सदस्य आहेत. मॅग्नम फोटो ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या फोटोग्राफरची एक कम्युनिटी आहे. सोबतच मॅग्नम फोटो हा बहुरंगी, बहुढंगी विचारांच्या अवलियांचा एक ग्रुप आहे. ज्याला जगात घडणाऱ्या प्रत्येक घटने विषयी उत्सुकता वाटते. आपल्या कलाकृतीतून जगाचं प्रतिबिंब कल्पकतेने लोकांसमोर मांडण हाच त्यांचा उद्देश आहे.

जागतिक पातळीवर लॉकडाऊनचे पडसाद उमटत असतानाच भारतही कोरोनाशी लढण्यासाठी सुसज्ज होतोय. भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाय योजना आखल्या जातायत. भारतीयांची स्वप्ननगरी असणारी मुबंई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतेय. नुकतंच वरळीतल्या NSCI डोममध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलाय. तिथे 500 बेडस् ची व्यवस्था करण्यात आलीये त्या वॉर्डचा फोटो काढलाय इंडिव्ह्यूजवल फोटोग्राफर असणाऱ्या विकास खोत यांनी. फोटोत एका प्रशस्थ जागेत रांगेने कॉट ठेवलेले दिसतायत आणि त्या संपूर्ण वॉर्डचं निर्जंतुकीकरण केलं जातंय.

दुसऱ्या फोटोत कामगार अत्यावश्यक सेवा पुरवणार्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रोटेक्टिव्ह सूट शिवताना दिसतायत. कामगारांनी तोंडावर मास्क लावलेले आहेत आणि प्रत्येकजण आपलं जण मन लावून, निष्ठेने करतना फोटोत दिसतोय.

ही माणसं आपलं कर्तव्य बजावण्यासाठी स्वतःला झोकून देतायत आणि अॅलेक्स माजोली, विकास खोत यांच्यासारखी अवलिया माणसं या घटना, गोष्टी फोटोच्या माध्यमातून जगासमोर आणतायत. ही दोन नावं प्रातिनिधिक असली तरी कोरोनामुळे बेरंग झालेल्या जगाचं प्रभावी चित्रण करण्यासाठी या फोटोंच ब्लॅक अँड व्हाईट असणं किती गरजेचं आहे हे माजोली आणि खोत दोघेही जाणून आहेत. 

लेखिका : विशाखा विश्वनाथ
[email protected] 

सबस्क्राईब करा

* indicates required