computer

लेन्सकथा : ४८वर्षांचं एकटेपण, टेबलटॉप फोटोग्राफीचा राजा आणि कलाकृतींच्या गोतावळ्यात रमलेला जागतिक कीर्तीचा महाराष्ट्रातला कलाकार!!

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने फोटो आणि सेल्फी काढणं अगदीच सोपं झालंय. असं असलं तरी लाईट, फ्रेम, कपोझिशन या गोष्टी प्रत्येकालाच ऍडजस्ट करता येतात असं नाही. फोटो काढणं ही एक कला आहे आणि त्याच्याही पलिकडे इतर समाजमाध्यमांसारखंच फोटो हे जनजागृती करण्याचं आणि आसपासच्या घटना उजेडात आणण्याचं एक माध्यम आहे. यामुळेच तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कितीतरी जागतिक घटनांचं दृश्य स्वरूपात डॉक्युमेंटेशन होऊ शकलंय. काळावर आपली छाप सोडणाऱ्या आणि आज फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांसमोर वेगळं जग मांडू पाहणाऱ्या अशाच फोटोग्राफर्सच्या कामाविषयी या मालिकेच्या माध्यमातून लिहिण्याचा मानस आहे.

या लेखमालिकेत इन्व्हायरमेंटल फोटोग्राफी आणि जनजागृती, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि वन्यजीवन, घरदार नसणाऱ्या बायका त्यांचं जीवन यांसारख्या विषयांचा समावेश असेल.

आपण सव्वा महिना घरात राहून कंटाळलोय. लॉकडाऊन कधी एकदा संपतं असं आपल्याला वाटतंय. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की ४८ वर्ष एखादा कलाकार स्वतःला प्रेयसीची वाट पाहत आत्मकैद करून घेतो आणि तरीही जगप्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून नावाजला जातो. तर तुम्ही विश्वास ठेवाल का? ठेवता येत नसेल तर मग ठेवा. कारण हा फोटोग्राफर भारतातलाच आहे. नव्हे, तो आपल्या महाराष्ट्रातल्या खानदेशच्या चाळीसगावचा आहे. त्याची ओळख त्याच्याच शब्दात करून द्यायची झाली तर 

                अलग हम सबसे रहते हैं,
                मिसाले तार तंबूरा 
                जरा छेडेसे मिलते हैं,
                 मिला लो जिसका जी चाहे ||
                            -केकी मूस

काहीशी अशी करून देता येते. या कलाकाराचं पूर्ण नाव कैकुश्रु माणिकजी मूस. त्यांची आई मात्र त्यांना 'केकी' म्हणूनच संबोधायची. नंतर हाच केकी जगासाठी कलामहर्षी केकी मूस झाला. ते महाराष्ट्रातल्या त्यांच्या समकालीन आणि कला विश्वातल्या प्रत्येकाचे 'बाबूजी' झाले, तर कुणाचे मूस साहेब. तरी या महान कलाकाराची खरी ओळख त्यांची बंद दाराआडची गंगा, यमुना, सरस्वती यांचा त्रिवेणी संगम असणारी आर्ट गॅलरी पाहत नाही, तोवर व्हायची नाही. कारण तीच तर होती त्यांची कर्मभूमी. याच जागेकडे त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. ४८ वर्षे इथल्याच भिंतींत आपलं जग उभारलं. त्यांच्याविषयी काही सांगायचं, बोलायचं किंवा लिहायचं म्हटलं तर या जागेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि हा उल्लेख मग सतत येतही राहतो.

चाळीसगाव स्टेशनच्या धुळे प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच एक दगडी बंगला दिसतो. त्याचं नाव 'रेब्रा स्ट्रीट'. ते केकींचं कलादालन. जातिवंत कलाकार असलेल्या केकी यांचा मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत १९१२ मध्ये एका पारशी कुटूंबात जन्म झाला. तत्कालिन व्ही.टी स्टेशनचे बिल्डर केकींचे मामा होते. तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्मलेले केकी मुबंईच्या विल्सन महाविद्यालयात पदवीपर्यंत शिकले. पुढील उच्च शिक्षण त्यांनी इंग्लंडमध्ये पूर्ण केलं. जगभरातल्या कलावंतांना भेटल्यावर ते मुंबईत परतले तेव्हा मुंबईत स्थाईक न होता ते चाळीसगावच्या वडिलोपार्जित बंगल्यात येऊन राहिले. त्याच बंगल्यात त्यांनी स्वतःला कोंडून घेत अखंड कलासाधना केली. 

सलग ४८ वर्ष या घरात राहून केकी त्यांच्या प्रेयसीची वाट पाहत होते असंही म्हटलं जातं. रोज रात्री एक वाजता मुंबईहून पंजाब मेल चाळीसगाव स्टेशनला पोहोचतो. त्या मेलच्या वेळी ते बंगल्याच्या गेटवर येऊन थांबायचे. ती त्या मेलने येणार होती म्हणे. त्यांना ती खरोखरच येईल अशी आशा होती. ती कोण होती? ती खरंच येणार होती का? या आणि अशा कितीतरी गोष्टी अनुत्तरित राहतात. त्यांचं वैयक्तिक आयुष्य धूसर आणि प्रकाशात आलेलं नसलं तरी त्यांच्या कॅमेऱ्याने मात्र कित्येकांना प्रकाश झोतात आणलं.

चित्रकाराचा पिंड असणारे मूस साहेब नंतर छायाचित्रांकडे वळले. त्यांच्या छायाचित्रांइतकीच त्यांची चित्रं ही लक्षवेधी होती. तुम्ही म्हणाल,"घरात स्वतःला कोंडून घेणारा विक्षिप्त माणूस, काय कुणाचे फोटो काढेल!" मूस साहेबांच्या ख्यातीचं रहस्य तर इथेच आहे. त्यांनी त्यांच्या घरातल्या स्टुडिओत स्वित्झर्लंडच्या बर्फापापासून ते मधाच्या पोळ्यातल्या इंदिरा गांधी इथपर्यंत सगळ्यांचा फोटो काढलाय. एवढंच नाही तर स्वतःच स्वतःचे फोटो आणि आत्ताच्या भाषेत सेल्फी ही त्यांनी क्लिक केलेत.

 मूस नावाच्या चित्रकाराचा छायाचित्रकार होण्यासाठी दुसरं महायुद्ध कारणीभूत ठरलं .ज्यावर ऑइल पेंटिंग केलं जायचं तो कागद दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारतात येणं बंद झालं. मग साहेबांनी टीनच्या पत्र्यावर पेंटिंग करायला सुरुवात केली खरी, पण त्यांचं रंगांत रमणारं मन हळूहळू प्रकाशाकडे झुकू लागलं आणि दीर्घकाळ ते त्यातच रमले. १९३० च्या आसपास फोटोग्राफीसारखं नवीन आकर्षक तंत्रज्ञान भुरळ पाडत होतं. असं असलं तरी ते खर्चिक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त कृष्णधवलच होतं. त्यात करियर करायचं, तर मुंबई-पुण्यासारख्या शहरात रहायला हवं. पण मूस साहेबांनी तर मुंबईपासून ३३० किलोमीटर असणाऱ्या चाळीसगावमध्ये राहणं पसंत केलं होतं. तिथेच राहून त्यांनी देश-परदेशांतल्या पुरस्कारांवर आपलं नावही कोरलं. ते जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी होते. 

मूस साहेबांनी फोटोग्राफीत असं काय वेगळं केलं? तर त्यांनी टेबलटॉप फोटोग्राफीत मास्टरी मिळवली. फेक फोटोग्राफीचा अजब प्रयोग केला. त्यांनी बोकडापासून एका वृद्ध महिलेपर्यंत, नावारूपाला आलेल्यांपासून ते सेल्फ पोर्ट्रेटपर्यंत पोर्ट्रेट फोटोग्राफी केली. 

टेबलटॉपची जादुई दुनिया -

मूस साहेबांच्या टेबलटॉप फोटोग्राफीच्या दुनियेत सैर मारणं म्हणजे दोन भावांतल्या भांडणातल्या गंमतीपासून  ते सैनिकांचा बूट सुट्टीवर असताना केवढा आनंदी असतो हे पाहण्याचा पल्ला एका दमात गाठणं!! पण त्या आधी टेबलटॉप फोटोग्राफी म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. योग्य प्रकाश आणि वस्तूंची कल्पक मांडणी, त्यांचा योग्य उंचीवरून काढलेला, सावल्यांवर विशेष भर असणाऱ्या छायाचित्राला टेबलटॉप फोटो म्हणतात. तो काढण्याच्या पद्धतीला टेबलटॉप फोटोग्राफी म्हटलं जातं. 

केकी मूस यांच्या सर्वच कलाकृतीतून आनंद आणि प्रेम या मानवी भावनांचं प्रकटीकरण सतत होत राहातं. प्रेमाचं बायप्रॉडक्ट असलेला विरहही त्यांच्या कलाकृतीतून डोकावत राहतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे टूटी तुरबत ही कलाकृती. कबरीवर आपले लांबसडक केस पसरवून शोक व्यक्त करणारी स्त्री आपल्याला यात दिसते. या फोटोतली ना स्त्री खरी, ना कबर! सगळं पुठ्ठ्याचंच. पण याची तीळमात्र शंका आपल्याला येत नाही. एक दुसऱ्या फोटोत नृत्य करण्यात दंग असणारी स्त्री त्यांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्या फोटोतही महाल पुठ्ठ्याचा आणि स्त्रीचं चित्र म्हणजे कार्डबोर्ड कटिंग आहे. 

त्यांची स्प्लिट मिल्क ही कलाकृती ह्यूमरस टेबलटॉपचा उत्कृष्ठ नमुना मानण्यात येते. दोन भाऊ आपापसांत भांडतायत, एकाने दुसऱ्याचं दूध सांडलंय आणि तो मिश्कीलपणे पाहतोय. या दोन्ही मुलांकडे त्यांची आई पाहतेय असा काहीसा हा फोटो. तुम्हाला वाटेल यात काय विशेष? हे नाट्य तर घराघरात असतं. काढला असेल फोटो घरातच, असतील माणसं घरात. तर असं नाहीये. त्यांनी एक काचेची बशी, दोन कप यांचा वापर करत ही अफलातून कलाकृती साकारली आहे. कपांवर अचूक हाव भाव रेखाटत, बशीवर पुठ्ठ्याची टोपी लावत त्यांनी या नाट्यात प्राण फुंकलेत.

'नॉन पॉलिटिकल फेस ऑफ नेहरू' अजून एक प्रसिद्ध कलाकृती. फोटोत नेहरूंचा चेहरा कुठेच दिसत नाही. तरी फोटो मात्र नेहरूंचाच. डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकावर गुलाबाचं फुल, बुद्धाचा पुतळा, समोर पृथ्वीगोल आणि त्यावर गांधीटोपी!! जगाला शांतीचा संदेश देणारा हा नेहरूंचा फोटो पाहायला खुद्द नेहरू केकींच्या घरी आले होते. 

या टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या चीजवस्तू त्यांनी घरातच जमवल्या होत्या. ओरिगामी, वुड कार्व्हिंग, क्ले मॉडेलिंग इत्यादी कलाप्रकारांत ते नेटाने पारंगत झाले. त्याचाच वापर त्यांनी टेबलटॉपसाठी केला. त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगावच्या केकी मूस कलादालनात आहेत. जवळजवळ त्यांच्या १५०० कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे. त्यांचे खूप कमी टेबलटॉप नेटवर उपलब्ध असल्याने जोवर आपण केकींच्या दालनाला भेट देत नाही तोवर त्यांच्या कलाकृतीतला आनंद, प्रेम वाटून घेऊ शकत नाही. हीच ती गोष्ट आहे ज्यामुळे जगाला या घराकडे लक्ष द्यावंच लागतं.

केकी आणि त्यांचा लोकसंग्रह

जगापासून स्वतःला लांब ठेवणारा हा अवलिया जगासाठी मात्र स्वतःच्या घराचे दरवाजे उघडे ठेवायचा. म्हणूनच आचार्य अत्रे, शिवाजी भावे, दादा धर्माधिकारी, बाबा आमटे, ना.सी.फडके अशा कितीतरी जणांचे फोटो त्यांच्या आर्ट गॅलरीत पाहायला मिळतात. एवढंच नाही, तर त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसांचे ते फोटो काढत. कित्येकदा तर कॅमेरा रोल संपवायचा म्हणून लोकांना बोलवून घेत ते त्यांचे फोटो काढून देत. असाच चाळीसगावच्या चेटकीणीचा पोर्ट्रेट फोटो त्यांनी काढलाय. सुरकुतल्या चेहऱ्याची, पिंजारल्या केसांची ही फासे पारधीण त्यांनी आपल्या कलाकृतीतून अमर केली.

फेक फोटोग्राफी करून त्यांनी कुण्या सुप्रसिद्ध व्यक्तीला वेटर केलंय तर कुणाला शिपाई!  कधी प्रकाशाचे खेळ खेळताना, फोटोत स्वतःचंच प्रतिबिंब कैद करत ते भूतही झालेत. प्रो. जहांगीर उनवला हे त्यांचे गुरू. गुरू शिष्याच्या या जोडीचा फोटोग्राफीत हात भारतात आजवर कुणीही धरू शकलेलं नाही. असं असूनही एकांतवासात राहिल्याने हा कलाकार जगाला फारसा परिचित नाही. मूस साहेब एकटे राहिले खरे, पण आपल्या कलाकृतींच्या कबिल्यासोबत. ते ज्या घरात राहिले तिथेच त्यांनी ३१ डिसेंबर १९८९ ला अखेरचा श्वास घेतला. मला सदैव माझ्या कलाकृती दिसल्या पाहिजेत ही त्यांची इच्छा म्हणून त्यांची कबरही त्यांच्या दगडी बंगल्याबाहेरच आहे. 

मी डॉक्युमेंटरी फिल्मसाठी जेव्हा सलग सहा दिवस माझ्या सहकाऱ्यांसह सकाळ संध्याकाळ त्यांच्या या वास्तूत कामासाठी जात होते आणि अजूनही जाते, तेव्हा त्यांचं कला दालन नव्याने मला मोहित करतं. कधी तिथली गूढता अंगावर येते, तर कधी तिथे कुठलीशी अनाम शक्ती जाणवते. त्यांना कुठली अशी आस होती ज्यामुळे ते ४८वर्ष घरात राहू शकले? कुठला असा पण त्यानी केला होता ज्यामुळे ते स्थानबद्ध होते? हे प्रश्न सतत सतावत राहतात. हे प्रश्न कुठल्याही सामान्य रसिकाला पडू शकतील. फक्त त्यासाठी आपली पावलं त्यांच्या कला दालनाच्या पायरीपर्यंत जायला हवीत.

४ तपं स्वतःला घरात कोंडून घेणाऱ्या या महान कलाकाराची प्लास्टर ऑफ पॅरिसची एक कलाकृती आजच्या एकूण जागतिक परिस्थितीवर चपखल भाष्य करू शकतेय. 'अवर फोनी फ्रेंड ऑफ यस्टरडे' म्हणजेच 'आमचा कालचा फसवा दोस्त' ही कलाकृती आहे अडीचफुटी ड्रॅगनची. हिंदी-चिनी भाई-भाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा बनवला होता. खरोखरच काही फ्रेंड फोनी वाटण्याच्या आजच्या सद्यस्थितीवर त्यांच्या कलाकृतीतली मार्मिकता थक्क करणारी आहे. 

लेखिका : विशाखा विश्वनाथ
[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required