computer

लेन्सकथा : जगातलं शेवटचं आणि सलग ४० दिवस अंधारात राहणारं शहर जगतं कसं, पाहा एका फोटोग्राफरच्या नजरेतून...

मे महिन्याच्या शेवटाकडे आपण सगळेच डोळे लावून बसलेले असतो. घामामुळे जीव अगदी नको-नको झालेला असताना पहिला पाऊस येणार या कल्पनेनेही किती सुखावतो आपण. पावसाळ्याच्या शेवटाकडे पुन्हा कधी एकदा पावसाळा संपतो आणि गुलाबी थंडीला सुरुवात होते असं वाटतं. चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा, चार महिने हिवाळा असं ऋतुचक्र असलेल्या समशितोष्ण कटीबंधातले आपण आतुरतेने उन्हाळ्याची वाट पाहत नाही. पण जगात काही ठिकाणं अशी आहेत जिथे माणसं कडकडीत ऊन सोडाच, पण सूर्याच्या साध्या दर्शनालाही पारखी असतात. त्यामुळे ते लोक सूर्य उगवल्याचा आनंद साजरा करतात. नव्हे, आत्ताही ते दूर तिथे उत्तर ध्रुवाच्या जवळ सूर्य उगवल्याच्या आनंदात आहेत. 

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने फोटो आणि सेल्फी काढणं अगदीच सोपं झालंय. असं असलं तरी लाईट, फ्रेम, कपोझिशन या गोष्टी प्रत्येकालाच ऍडजस्ट करता येतात असं नाही. फोटो काढणं ही एक कला आहे आणि त्याच्याही पलिकडे इतर समाजमाध्यमांसारखंच फोटो हे जनजागृती करण्याचं आणि आसपासच्या घटना उजेडात आणण्याचं एक माध्यम आहे. यामुळेच तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कितीतरी जागतिक घटनांचं दृश्य स्वरूपात डॉक्युमेंटेशन होऊ शकलंय. काळावर आपली छाप सोडणाऱ्या आणि आज फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांसमोर वेगळं जग मांडू पाहणाऱ्या अशाच फोटोग्राफर्सच्या कामाविषयी या मालिकेच्या माध्यमातून लिहिण्याचा मानस आहे.

या लेखमालिकेत इन्व्हायरमेंटल फोटोग्राफी आणि जनजागृती, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि वन्यजीवन, घरदार नसणाऱ्या बायका त्यांचं जीवन यांसारख्या विषयांचा समावेश असेल.

सूर्य उगवल्याचा आनंद साजरा करणारी ही माणसं कदाचित तुम्हाला वेडी वाटतील. कारण तुमच्यासाठी हा तो सूर्य आहे ज्याचा तुम्ही राग-राग करता, ज्याच्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं होतं, रात्र खूपच लहान होती की काय असं वाटत राहतं. हा तोच सूर्य आहे ज्याच्यामुळे बाष्पीभवन होतं, ज्याला आपण अक्षय ऊर्जा स्त्रोत म्हणतो, असा सूर्य काही ठिकाणी ३६५ दिवस उगवतोच असं नाही. त्यातलंच एक शहर म्हणजे नोरिल्स्क. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा अर्थात तिथे  रात्र असते, घनघोर अंधाराची लांबलचक रात्र! पडला ना प्रश्न? तिथली माणसं कशी जगत असतील असा? तुम्हाला पडला नसला तरी हा प्रश्न ‘अलेना चार्निशोव्हा’ या रशियन फोटोग्राफरला मात्र पडला होता. यातूनच तिने २०११-१२ च्या दरम्यान नोरिल्स्कमधल्या दैनंदिन जीवनाचं दर्शन घडवणारी ‘डेज ऑफ नाईट/ नाईट्स ऑफ डे’ ही फोटो सिरीज शूट केली.

‘नोरिल्स्क’ आहे रशियातलं एक अलबेलं शहर!! 

‘डेज ऑफ नाईट / नाईट्स ऑफ डे’ ही फोटो सिरीज नोरिल्स्कमधल्या रहिवाशांच्या दैनंदिन जीवनपटात आपल्याला फिरवून आणते. जग आणि नोरिल्स्क शहर यातलं वेगळेपण समजून घेतलं तर या फोटो सिरीजचं वैशिष्ट्य ठळकपणाने जाणवतं. नोरिल्स्क हे खाणींचं  शहर आहे आणि खाणकाम हा तिथला प्रमुख व्यवसाय आहे. तर नोरिल्स्कची लोकसंख्या १,७०,००० पेक्षा जास्त आहे. हे कुठल्याही इतर शहरात असूच शकतं. आता या शहराची खरी ओळख करून घेऊया. नोरिल्स्क हे जगातलं उत्तरेकडेचं शेवटचं शहर आहे. म्हणजेच नोरिल्स्कनंतर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात कुठलेच शहर अस्तित्वात नाही. ज्या शहरी जीवनाचं, शहरातल्या झगमगाटाचं, शानशौकीचं अप्रूप प्रत्येकालाच वाटत असतं ते शहरी जीवन जगाच्या या टोकावर येऊन थांबतं. या शहराचं सरासरी तापमान -१० डिग्री सेल्सिअस असतं. पण हिवाळ्यात ते -५५ डिग्री सेल्सिअस एवढं खाली जातं. शिवाय नोरिल्स्क हे जगातलं सातव्या क्रमांकाचं प्रदूषित शहर आहे. शिवाय नोरिल्स्क हे जगातलं सातव्या क्रमांकाचं प्रदूषित शहर आहे

Flying above the Far East of Russia. Shore of Japanese sea. Tomorrow we will take a flight to Sakhalin Island - our final destination in the trip along the Far East. With Victoir @vicchevreul for @magazinegeo. #showmeyourhectar

Welcome back to Instagram. Sign in to check out what your friends, family & interests have been capturing & sharing around the world.

एकांतवासात जाणारं हे शहर एवढं प्रदूषित कसं ! याचं आश्चर्य प्रत्येकाला वाटतं. गुगल बाबाला हा प्रश्न विचारल्यावर समजलं की तांबे, निकेल आणि पॅलेडीयम च्या खाणी या शहरात आहेत. त्यांचं जगभरातील सर्वाधिक उत्पादन या शहरात होतं. त्याचमुळे इथे रासायनिक पाऊस ही पडतो. आणि इथल्या नद्या नितळ-निर्मळ नाहीत त्या लाल रंगाचा आहेत. जेव्हा या शहरात हिवाळा असतो तेव्हा जवळ-जवळ दोन महिने अंधाराने या संपूर्ण शहराला गिळंकृत केलेलं असतं. त्या दिवसात हे शहर ‘पोलार नाईट्स सिंड्रोम’ ने ग्रासलेलं असतं. इतर शहरांचा आणि नोरिल्स्कचा या काळात संपर्क तुटतो. शहर एकांतवासात जातं. विमानसेवा तेवढी सुरु असते. हे वाचल्यावर या नोरिल्स्क नावाच्या अलबेल्या शहरात अलेना चार्निशोव्हा जाऊन धडकली कशी हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
 

अलेना चार्निशोव्हाची नोरिल्स्क वारी – 

(अलेना चार्निशोव्हा)

फ्रान्समधील रशियन माहितीपट छायाचित्रकार असणारी अलेना तशी आर्कीटेक्चर शिकलेली. तिथेच अलेनाला फोटोग्राफीच्या दृश्यभाषेची भुरळ पडली. ती आपणहून फोटो काढायला शिकली, पुढे त्यात मातब्बर झाली. दरम्यानच्या काळात तिने आर्किटेकट म्हणून दोन वर्ष नोकरी केली. फारसं मन रमत नसल्याने आणि जग खुणावत असल्याने तिने ती नोकरी सोडली. २६ देशांत १,००४ दिवस सायकलवरून सुमारे ३०,००० किलोमीटर अंतर देश, संस्कृती, पर्यावरण न्याहळत ती फिरली. आणि या भ्रमंतीअंती अलेनाने फोटोग्राफर होण्याचा निर्णय घेतला.

If you are in Paris, don't miss What's Up Photo Doc - International Documentary Photo Fair @whatsupphotodoc. My work will be presented by @galerieintervalle. #whatsupphotodoc #photofair #paris #zima #galerieintervalle #documentaryphoto #documentary #photo #fair #norilsk #elenachernyshovaphotography #elenachernyshova

Welcome back to Instagram. Sign in to check out what your friends, family & interests have been capturing & sharing around the world.

दृश्यभाषेची पडलेली भुरळ, पर्यावरण, राजकीय आणि आर्थिक स्थितीतील बदलांचा तेथील नागरिकांवर होणारा परिणाम दृश्यभाषेत पकडण्याची ओढ यांमुळे अलेनाने फोटोग्राफी हा पर्याय निवडला. काही वेगळं आणि जगाला माहित नसलेलं असं जग तिला आपल्या छायाचित्रात कैद करायचं होतं, त्यावर एक ठसठशीत नोंद तिला करून ठेवायची होती. तशी तिने ती केलीही. मानाचे पुरस्कार मिळवले. अलेनाला नोरील्स्कची ओळख झाली ती आलेनाच्या आईमुळे. अलेनाची आई तिच्या तरूणपणी काही काळ या शहरात वास्तव्यस होती. आपल्या आईकडून या शहराविषयी जाणून असल्याने अलेनाच्या मनात नोरील्स्कविषयी आकर्षण निर्माण झालं. तिला नोरील्स्कविषयी अजून जाणून घ्यायचं होतं. म्हणून तिने थेट रीतसर या शहराचं फोटो डोक्युमेंटेशन केलं आणि आपल्या फोटोमालिकेतून ते जगासमोर ते मांडलं.
 

डेज ऑफ नाईट/ नाईट्स ऑफ डे – 

वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी कमीत कमी २४० दिवस पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या वादळाशी नोरील्स्क शहर जुळवून घेतं. एकदा सुट्टीवर गेला की ४० दिवस सूर्य इथे उगवतच नाही तरी हे शहर काळोख पचवतं आणि जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याच्या प्रकाशाने हे शहर उजळून निघतं. हा प्रकाश हवा हवासा असला तरी इथल्या माणसांचे तो डोळे दिपवून टाकतो. वर हा सूर्य तेव्हा लवकर मावळायचं नाव घेत नाही. इथल्या माणसांची फुफ्फुसं जगण्यासाठी प्राणवायु मोठ्या कष्टाने शोधतात. अशा सगळ्या विरोधाभासात जगणारी आणि परिस्थितीशी समायोजन करून घेणारी माणसं आणि त्यांचा भवताल अलेनाने या फोटो डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून जगासमोर मांडला आहे.

वर वर साधे वाटणारे हे फोटो त्यांच्या मागची अलेनाने सांगितलेली गोष्ट ऐकल्यावर आपल्याला थक्क करून सोडतात. त्या ऐकताना आपण स्तिमित होतो, आपल्याला भीती वाटून जाते आणि आपण धीरगंभीर होऊन त्या फोटोत एक कथानक शोधत राहतो. कधी तर त्या फोटोतल्या बर्फात आपण आपली पाऊलवाट शोधू लागतो. असाच एक फोटो अलेनाने विमानातून काढलाय ज्यात बर्फाच्या कैक नागमोडी पाऊलवाटा दिसतात. त्या कुठवर जातात हे आपण फोटो पाहताना नजरेने शोधत असतो, तेवढ्यात नदीला जशा उपनद्या येऊन मिळतात तशाच बर्फाच्या या वाटा एकमेकांत बेमालूमपणे मिसळतात. त्यांच्या असण्यानसण्याच्या सीमारेषा अचानक पुसल्या जातात आणि त्या समुद्राला नद्या मिळाव्यात तशा धूसर होऊन दूर धुक्यात विलीन होतात. शहराच्या १००० किलोमीटर दूरदूरपर्यंत पसरलेल्या आणि भूगोलाच्या पुस्तकात अभ्यासाला असणाऱ्या टंड्रा प्रदेशातल्या गोठलेल्या नदीचा हा विमानातून काढलेला फोटो भलताच विलक्षण आहे.

कुणी या नोरील्स्कला स्वर्ग म्हणतं, तर कुणी इथे जन्मलेला प्रत्येक माणूस हिरो आहे असं म्हणतं. इथे स्थायिक नसलेला माणूस इथे येतो तेव्हा त्याचं रक्त गोठल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यांतही अलेना इथे आली ते इथे माणसं राहतात कशी हे पाहण्यासाठीच. जवळ जवळ ९ महिन्यांच्या तिच्या नोरील्स्क वास्तव्यात ती हे सगळं आपल्या डोळ्यांनी, कॅमेऱ्याने टिपत होती. त्यांच्या जगण्याचा फंडा समजून घेत होती. त्यातलाच एक फंडा अलेनाने तिच्या एका फोटोत टिपलाय. कडाक्याच्या थंडीत टिकून रहायचं तर घराच्या बाहेर पडा आणि थंड पाण्यात पोहायला लागा.

असा काहीसा अजब “लोहा लोहे को काटता है!” सारखा प्रकार प्रत्यक्षात अमलात आणला जातो. त्यासाठी शहरातल्या तलावात आठवड्यातून ४ दिवस नागरिकांना पोहायला जाण्याची परवानगी असते. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा जवळ-जवळ २ तास शहरभर संधिप्रकाश पसरलेला असतो आणि शहर अंधारात गुडूप होतं. मग पुढचे २ महिने इथली माणसं घरात सूर्यप्रकाशासारखे दिवे लावून स्वतःच्या घरात सूर्याची उब निर्माण करतात. छोटी-मोठी झाडं घरात वाढवतात. स्वतःचं मन रमवत राहतात. अलेना या विषयी बोलताना म्हणते की “सूर्य उगवूच नये हे वाटणंच तेवढं छान आहे. तो न उगवणं हे उदासवाणं आहे. मी प्रोजेक्टसाठी तिथे राहत असताना हे अनुभवलंय. इथे राहणाऱ्या माणसांना कसं वाटत असेल याची मी कल्पना करू शकते.”

'डेज ऑफ नाईट/ नाईट्स ऑफ डे' फोटो सिरीजमध्ये नोरील्स्कमधील तरुणांच्या सामाजिक जीवन ही अलेना टीपते. लहान मुलांच्या खेळण्याच्या जागा, त्यांच्या विरंगुळ्याची ठिकाणं, शहरातल्या माणसांची मानसिक स्थिती या सगळ्याचा उल्लेख तिच्या बोलण्यातून येत राहतो. या सगळ्यांविषयी तिचे फोटो बोलतात. प्रदूषण आणि वातावरणातल्या टोकाचे बदल यामुळे इथल्या लोकांचं आयुष्य तसं थोडंथोडकंच. त्यांच्या डोळ्यातली उदासी आणि कोरडे डोळे माणसाला भिववतात. मुळातच या शहराची जडण घडण वेगळी आहे. इथल्या काही इमारती ओस पडलेल्या आहेत. अलेनाने काढलेल्या फोटोत जेव्हा या इमारती दिसतात तेव्हा हे शहर बांधून पडल्यासारखं वाटतं. नॉरिलस्क बांधकाम योजना १९४० च्या दशकात गुलागमध्ये कैदी राहिलेले आर्किटेक्ट यांनी डिझाईन केली होती. एक सोपी आणि ठोस योजना अंमलात आणून एक आदर्श शहर तयार करण्याचा त्यांचा विचार होता. अलेनाच्या काही शॉट्समध्ये सेटलमेंट्सचे अवशेष बर्फ आणि हिमवृष्टीमुळे पांढऱ्या दुलईत गुडूप झाल्यासारखे भासतात.

एकूणच काय, तर सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता न येणं, महिना-महिना घरातच थांबावं लागणं या अशा गोष्टी नोरील्स्क शहरासाठी नव्या नाहीत. संपूर्ण जगासाठीचं जे न्यू नॉर्मल आहे ती नोरील्स्कची  दैनंदिनी आहे. फरक इतकाच आपल्याला सूर्य उगवला नाही तर आनंद होऊ शकतो आणि नोरीलस्क रहिवाशांना तो उगवला तर!!

डेज ऑफ नाईट/ नाईट्स ऑफ डे फोटो सिरीजच्या माध्यामतून अलेनाने एक वेगळ वास्तव जगासमोर मांडलं. या सिरीजसाठी वर्डप्रेसकडून तिला सन्मानितदेखील करण्यात आलंय. हा या सिरीजचा बहुमान आहे. कारण अलेनाने केलेलं धाडस हे खरोखरच चाट पाडणारं आहे.  भौगोलिक आणि पर्यावरणीय तसेच आरोग्यविषयक नोंदींसाठी दृश्यभाषेच्या वापरामुळे त्या भाषेचा नवा पैलू अलेनाने जगासमोर मांडलाय. 

 

-    विशाखा विश्वनाथ 
   [email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required