computer

लेन्सकथा : जागतिक जलसंपत्ती दिनविशेष...फोटोत पाणी अडवणारी बाई!!

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने फोटो आणि सेल्फी काढणं अगदीच सोपं झालंय. असं असलं तरी लाईट, फ्रेम, कपोझिशन या गोष्टी प्रत्येकालाच ऍडजस्ट करता येतात असं नाही. फोटो काढणं ही एक कला आहे आणि त्याच्याही पलिकडे इतर समाजमाध्यमांसारखंच फोटो हे जनजागृती करण्याचं आणि आसपासच्या घटना उजेडात आणण्याचं एक माध्यम आहे. यामुळेच तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कितीतरी जागतिक घटनांचं दृश्य स्वरूपात डॉक्युमेंटेशन होऊ शकलंय. काळावर आपली छाप सोडणाऱ्या आणि आज फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांसमोर वेगळं जग मांडू पाहणाऱ्या अशाच फोटोग्राफर्सच्या कामाविषयी या मालिकेच्या माध्यमातून लिहिण्याचा मानस आहे.

या लेखमालिकेत इन्व्हायरमेंटल फोटोग्राफी आणि जनजागृती, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि वन्यजीवन, घरदार नसणाऱ्या बायका त्यांचं जीवन यांसारख्या विषयांचा समावेश असेल.

विचार करा, २२ महिने पाऊस न पडलेल्या भागात लोक कसे जगत असतील? हो. हे खरं आहे २२ महिने पाऊस पडला नाही तरी राजस्थानच्या खेड्यातली माणसं, शेतकरी, मेंढपाळ हे सगळे लोक आपलं दैनंदिन जीवन व्यवस्थित व्यतित करू शकतात! कसे? या प्रश्नाचं उत्तर आपल्या फोटो-डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून फोटो जर्नलिस्ट व इन्व्हायरमेंटल फोटोग्राफर असणाऱ्या 'आरती कुमार राव' देतात. 

नॅशनल जिओग्राफीच्या माध्यमातून सर्वश्रुत असणारं नाव म्हणजे 'आरती कुमार राव'.  नदी, जंगल, खाड्या या भौगोलिक प्रदेशांवर आणि तिथल्या लोकांच्या जीवनशैलीवर वातावरण बदलाचा, तापमान वाढीचा आणि प्रदूषणाचा नेमका काय परिणाम होतो हे आपल्या फोटो डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून आरती कुमार राव मांडत असतात. पाणी प्रश्न आणि पाणी व्यवस्थापन या भागावर त्या विशेष भर देतात. कुठल्याही गोष्टीचं नियोजन अथवा व्यवस्थापन करायचं असेल तर माणसाने मूलभूत गोष्टींकडे आधी वळलं पाहिजे. तसं असेल तर सगळ्यात आधी आपण पाणी समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्या व्यवस्थापनात लक्ष घातलं पाहिजे असं आरती कुमार राव म्हणतात.

हे जाणून घेणं का महत्वाचं आहे?

उन्हाळा चालू झालाय. महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्वच शहरांचा पारा चाळीशी पार गेलाय, कोरोनामुळे या वर्षी महाराष्ट्रात वॉटर कॅम्प स्पर्धेचं आयोजन होणार नाहीये. जसजसे दिवस पुढे जातील तसतसा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत जाणार आहे. या सगळ्यात एकीकडे हवामान खात्याने यंदा पाऊस मुबलक पडेल असं म्हटलंय, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असल्याने नद्या स्वच्छ झाल्याची माहिती पर्यावरण तज्ञ आणि वृत्तवाहिन्या देतायत, तिसरीकडे पाऊस-पाण्याच्या नावाने शिमगा असणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या जोडप्याने स्वतः २५ फूट खोल विहिर खणत आपला पाणी प्रश्न सोडवलाय. आणि पुण्यात मात्र दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात पाण्याचे टँकर मागवायला सुरुवात झाली आहे आणि ते आल्यावर पाण्यासाठी एकच एक झुंबड उडवत सोशल/फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरती कुमार राव फोटो डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून पाण्यासाठी, नद्यांसाठी जे काम करतायत ते किती महत्वाचं आहे हे समजतं.

कोण आहेत आरती कुमार राव?

बायोफिजिक्स शिकून चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या आरती पर्यावरण आणि नद्यांकडे आकर्षित झाल्या याची मुळं त्याच्या बालपणात होती. मुबंईसारख्या शहरात राहूनही नद्या, जंगल याच्याशी त्याची नाळ जोडली गेली ती मुबंईतल्या जंगल परिसरात असलेल्या घरामुळे. वडील नर्मदा बचाव आंदोलनाचा भाग असल्यामुळे तर हे सगळं त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. 

त्यांनी ब्रम्हपुत्रा नदाच्या पात्रातल्या पाण्यावर आलेल्या तैल तरंगांचं फोटो डॉक्युमेंटेशन केलंय. या कामासाठी आणि त्याच्या अभ्यासासाठी आरती कुमार राव यांना भारत सरकारकडून 'अनुपम मिश्रा मेडल' देऊन गौरवण्यात आलंय. 

पर्यावरण ते कॅमेरा प्रवास 

आरती कुमार राव यांचा पर्यावरण प्रेमी ते कॅमेऱ्यातून पर्यावरणासाठी काम करणं हा प्रवास मोठा रंजक आहे. लहान असताना भौतिकशास्त्र आणि लेखन यात करिअर करावं असं त्यांना वाटायचं. भारतात एकाच वेळी दोन्ही क्षेत्रात काम करता येणं अवघड. म्हणून मग त्यांनी बायोफिजिक्समध्ये मास्टर्स केलं. नंतर कळून चुकलं की आयुष्य प्रयोगशाळेत घालवणं अवघड आहे. त्यांना भोवताल खुणावू लागला, पाणी हाका मारू लागलं, म्हणतात ना पाणी तुम्हाला बोलावून घेतं तसंच आरतींच्या बाबतीत झालं. पाण्यासाठी त्यांनी एका स्थिर आयुष्यावर पाणी सोडलं.

नदीपात्र ते वाळवंट सगळी कडच्या पाण्याचा वेध त्यांच्या लेन्सने घेतला. जंगल, किनारा, काठ, वाळवंट सगळं धुंडाळून झालं आणि त्याची ओढाळ पावलं नदीच्या पाण्यात अधिक खोल रुतत गेली. निसर्ग सौंदर्या व्यतिरिक्त निसर्गाचं म्हणणं त्यांनी आपल्या फोटोतून जगासमोर मांडायला सुरुवात केली. पत्रकारिता हा पेशा स्वीकारत एका जनजागृतीच्या चळवळीत त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. नॅशनल जिओग्राफीच्या पिवळ्या चौकटी तर त्यांना आधीपासूनच साद घालत होत्या. त्या चौकटी मोडत आपल्या फोटोतून प्रेक्षकांवर छाप कशी पाडावी हे तर लहान असल्यापासूनच फोटो खाली असणाऱ्या मजकूरामुळे समजायला लागलं होतं. म्हणून मग फोटो फक्त क्षण कैद करण्याचं माध्यम न ठेवता लोकांपर्यत पोहोचण्याचं माध्यम ठेवावं हा निग्रह झाला आणि यातूनच गेलं दशकभर राव यांचे फोटो पाण्याची घुसमट, नद्यांचे हुंकार, आणि जमिनीची तळमळ सांगतायत.

पाणगोष्टी सांगणारे फोटो

आरती कुमार राव यांचे फोटो नद्यांच्या कथा सांगत असतात, नद्या खवळल्यावर किती रौद्र दिसतात हे सांगतात, पात्रं बदलतात तेव्हा कशा गांगरून जातात हे सांगतात. नदी आणि तिच्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या लोकांचं आयुष्य दाखवतात. त्यांच्या फोटोतून निसर्ग त्याच्या व्यथा सांगत राहतो आणि आरती कुमार राव त्या व्यथेमागच्या कथा लोकांना येऊन सांगतात. ब्रम्हपुत्रेच्या पात्रापासून ते एशियातल्या हत्तीच्या डोळ्यातल्या पाण्यापर्यंत फिरून आल्यावर ही त्याचा कॅमेरा विसावत नाही. तो पाणी शोधतच राहतो. पाण्याच्या मागावर असणाऱ्या बायका हा कॅमेरा टिपतो. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या बायकांच्या आकृत्या दाखवतो.

कधी तर खाडी परिसरात झाडांनी वेढलेल्या फ्रेममध्ये पाण्यात उभी असलेली, प्रकृतीशी एकरूप झालेली बाई दाखवतो. जणू बाई आणि पाणी एक आहे.

स्रोत

पाणी ज्या भांड्यात ठेऊ त्या भांड्याचा आकार घेतं तसं बाई कुठल्याही परिस्थितीत समायोजन करू शकते हे सांगत राहतो. कारण यातले बहुतांश बायकांचे फोटो हे पाठमोरे आहेत, त्यात आपल्याला चेहरा दिसत नाही. पाणी हीच त्यांची ओळख आणि पाणी हाच त्यांचा चेहरा आहे.

हा कॅमेरा आहे राजस्थानमधल्या पाणीव्यवस्थापनाची ही गोष्ट सांगतो. २०१३ साली जेव्हा आरती कुमार राव त्यांच्या पहिल्या फोटो डॉक्युमेंटेशनची तयारी करत होत्या, तेव्हा त्या कित्येक महिने थारच्या वाळवंटात जाऊन राहिल्या. त्यांनी तिथला उन्हाळा अनुभवला आणि पाहिली ती तिथल्या लोकांच्या मनात असणारी निसर्गाठायी असलेली निष्ठा. छत्रसिंह नावाच्या मेंढपाळाकडून समजून घेतला तो फक्त ८०मीमी पाऊस पडूनही निसर्ग आपल्याला भरपूर देतोय आपल्याला ते घेता आलं पाहिजे हा भाव. जसा त्यांनी हा भाव समजून घेतला तसा कॅमेऱ्यात कैदही केला. आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागचं कारण समजून घेताना त्या एका कॉन्फरन्समध्ये छत्रसिंहच्या राजस्थानचं पाणी व्यवस्थान समजावून सांगतात.

उन्हाळा लागला की राजस्थानमधली माणसं एक मॅनमेड डिप्रेशन ( खोलगट भाग) जमिनीवर बनवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात तो यशस्वीच होतो कारण ते वर्षानुवर्ष रेन वॉटर हार्वेस्टिंगची हीच पद्धत वापरतात. तिथे वर्षातून फक्त एक दिवस पाऊस पडतो. म्हणून ते उन्हाळ्यात तत्परतेने पूर्ण करतात. नंतर निसर्गावर श्रद्धा ठेवून पावसाची वाट पाहत राहतात.

जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाचा थेंब अन् थेंब ते साठवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग जेव्हा पाऊस येतो तेव्हा जवळजवळ फूटभर उंच असा पाण्याचा प्रवाह वाहत येत या मॅनमेड डिप्रेशनमध्ये येऊन थांबतो. मग तयार होतं गावकुसासाठी खुलं असणारं एक विशाल तळं. त्यावर गावातल्या प्रत्येकाचा हक्क असतो. ऐन उन्हाळ्यात त्यातलं पाणी संपतं. पाणी संपल्यावर काय? असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो. ते टँकर मागावर असतील असं म्हणत आपण आपल्या पुरतं या प्रश्नाचं उत्तरही शोधून काढतो. खरी गंमत या इथेच आहे. राजस्थानमधल्या माणसांचा मातीवर विश्वास आहे. त्यांनी आपली जमीन ठाऊक आहे. 

आरती कुमार राव यांनी जेव्हा ही परिस्थिती पाहिली तेव्हा पाऊस पडून 22 महिने उलटून गेले होते. तेव्हा छत्रसिंह एके दिवशी त्यांना एके ठिकाणी घेऊन गेले. त्यांनी वाळू उपसायला सुरवात केली आणि  हळूहळू ती हाताला ओलसर जाणवू लागली. त्यात पाणी झिरपलं होतं. तिथून जवळच एक विहीर होती. तळ्यातलं पाणी संपलं की बायका या विहिरीवर जमतात. राजस्थानमध्ये याला 'बेरी' असं म्हटलं जातं. यापुढे फोटो डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून जेव्हा या गोष्टीचं वर्णन करतात तेव्हा त्या म्हणतात.

"या बायका बेरीतून जसं-जसं पाणी वर उपसतात तसं-तसं बेरीजमध्ये इतर बाजूंनी आत येतं. त्या पाणी आत खेचून घेतात. यावेळी तुम्ही बेरीजच्या जवळपास असणाऱ्या जमिनीला कान लावले तर तुम्हाला पाणी आत येण्याचा आवाज येतो. हा खरा निसर्गाचा चमत्कार, प्रकृतीचा उत्सव, जमीन आणि पाणी आपल्याशी बोलत असलयाचा अनुभव आहे असं वाटत राहतं". 

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळामुळे वाढलेल्या आत्महत्या पाहून आरती कुमार राव यांना राजस्थानचं पाणी समजावून सांगणारे मेंढपाळ छत्रसिंह म्हणतात की 'दुष्काळ हा प्रत्यक्षात तेव्हा येतो जेव्हा आपल्याकडे कल्पनांचा दुष्काळ असतो'. 80mm पाऊस पडणाऱ्या राजस्थानचा मेंढपाळ 800mm पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन शिकून घ्यावं असं म्हणतो.

आरती कुमार राव त्यांच्या फोटोतून ही राजस्थानच्या पाणी व्यवस्थापनाची गोष्ट रंगवून रंगवून सांगत असताना पुन्हा पुन्हा हे सांगायला विसरत नाहीत की 'पाणी पाण्याचं जीवन, पाण्यामुळे जीवन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी पाण्याची कथा सांगतेय'. म्हणूनच आरती कुमार राव स्वतःला छायाचित्रकार मानत नाहीत. त्या म्हणतात मी कथा सांगते.  रोजच्या जगण्यातल्या, जमिनीच्या, पाण्याच्या, लोकांच्या जगण्याच्या कथा. मी कथा सांगते प्रवाहातल्या माध्यमांनी दुर्लक्षित केलेल्या माणसांच्या, त्यांच्या मुख्य प्रवाहात न आलेल्या प्रश्नांच्या. हे सगळं सांगण्यासाठी मी फोटो हे माध्यम निवडलेलं असलं तरी मी त्या फोटोंविषयी बोलते आणि लिहिते ही, कारण मला सर्वसामान्य माणसाने पाणी समजून घ्यावं असं वाटतं.

असं असलं तरी आरती कुमार राव यांच्या फोटोत एक काव्यात्मकता आहे. त्यामुळे त्यामागची गोष्ट ठाऊक नसली तरी ते फोटो पुन्हा पुन्हा पाहावेसे आणि पाहात रहावेसे वाटतात. फोटोग्राफीच्या माध्यमातून जनजागृती आणि पर्यावरणपूरक कामं होऊ शकतात आणि ती किती नेटकी होऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरती कुमार राव राबवत असलेले उपक्रम.

लेखिका : विशाखा विश्वनाथ 
[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required