computer

कोरोना काळात नोकरी गेली, पण या पठ्ठ्याने मुंबईच्या रस्त्यावरच ५ स्टार बिर्याणी स्टॉल सुरु केला ना भाऊ !!

जगात कोरोनाची लाट आली आणि अनेक आयुष्यं बदलली. अनेकांना आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान सहन करावे लागले. काहींचे व्यवसाय तोट्यात गेले, काहींना तर बंदच करावे लागले. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. या संकटातून देखील उभे राहत अनेकांनी नवे काहीतरी सुरू केले आणि नव्या पद्धतीने जीवन जगण्यास सुरुवात केली. या काळात सोशल मिडिया अनेकांसाठी मोठा आधार ठरला आहे. 

अक्षय पारकर हे देखील या लोकांपैकीच एक आहेत. गेली 8 वर्ष ते ताज ग्रुप ऑफ हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय क्रुझवर शेफ म्हणून काम करत होते. उच्चश्रीमंत लोकांना खुमासदार डिशेस बनवून देण्याचे त्यांचे काम होते. पण कोरोना आला आणि त्यांचे करियर उध्वस्त झाले. हातात असलेली नोकरी गेली. 

एवढे झाल्यावर कुणीही हिंमत सोडली असती. पण अक्षयने नव्याने सुरुवात केली. त्यांनी मुंबईत फूड स्टॉल सुरू केला. इथे ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या चवीची बिर्याणी बनवत असतात. दादर येथे पारकर बिर्याणी हाऊस या नावाने त्यांनी स्टॉल सुरू केला आहे. स्टार मॉलच्या बाजूला जे के सावंत मार्ग, राऊतवाडी या त्यांच्या स्टॉलचा पत्ता आहे.

पारकर यांच्याकडे मार्केटिंगसाठी पैसा नव्हता म्हणून त्यांच्या मित्रांनीच बातमी पसरवली. अशाच पद्धतीने एकदा त्यांची बातमी व्हायरल झाली आणि पारकर यांचा हा लहानसा स्टॉल देशभर प्रसिद्ध झाला.

फेसबुक आणि ट्विटरवर अनेक लोकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. लोकांकडून बाबा का ढाबाला जसे प्रेम मिळाले तसे अक्षय पारकर यांच्या स्टॉलला मिळायला हवे असे आवाहन केले जात आहे. तुम्ही जर मुंबईत असाल तर आपल्या मराठमोळ्या माणसाच्या हातची बिर्याणी नक्की खाऊन पाहा. 

सबस्क्राईब करा

* indicates required