computer

ओळख जिल्ह्यांची: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ते भविष्यात होऊ घातलेली औद्योगिक राजधानी!!

महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान नाहीतर भविष्य देखील पुण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळापासून पुण्याचे महत्त्व आहे. पुण्याचे नाव देखील अनेक बदल होत पुणे झाले आहे. जुन्या ताम्रपटांमध्ये पुण्याला 'पुण्य विजय', 'पुनवडी' अशी वेगवेगळी नावे असल्याचे आढळतात. शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला, स्वराज्याची मुहूर्तमेढ पुण्यातच रोवली गेली. तसेच पुढे कित्येक वर्षे देशांचे राजकारण पुण्यात राहूनच हलवले जात होते. पुणे म्हणजे जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी आपली साधना केली, तर तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीने लोकांना भक्तीमार्ग दाखवला. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यात पुण्यातील नेत्यांचे महत्त्वाचे योगदान होते. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा पट पुण्यातच मांडला गेला. आज देखील देशात महाराष्ट्राचे महत्वाचे नेते ओळखले जाणारे पुण्यातूनच गेलेले दिसतात. पुणे जिल्ह्याची ओळख तशी एका लेखातून करून देणे कठीण काम आहे. पण आम्ही पुण्याचा एक धावता आलेख मांडणार आहोत.

पुण्यात असलेले कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदैवते ऐतिहासिक म्हणता येतील अशी आहेत. कसबा गणपती पुनर्स्थापना करण्यात जिजाऊंचा महत्त्वाचा वाटा होता. पुण्यात अनेक विचित्र नावांची मंदिरे आहेत. त्यात खुन्या मुरलीधर पासून तर मोदी गणपती पर्यंत अनेक वैशिट्यपूर्ण नावे आहेत. पुण्यात विखुरलेल्या डझनभर बागा या देखील पुण्याच्या वैभवात भर टाकत असतात. त्यातली प्रसिद्ध बाग म्हणजे हिराबाग.

हिराबागेबद्दल सांगितले जाते की नानासाहेब पेशवे यांनी आपल्या हिरा नामक नायकीनीसाठी बांधलेल्या बंगल्याला पुढे जाऊन हिराबाग नाव पडले. अतिशय सुंदर अशी ही वास्तू असून याच ठिकाणी डेक्कन क्लबची स्थापना झाली होती. हिराबागच्या सोबतीला मोतीबाग, माणिकबाग, सारसबाग, रमणबाग, कात्रज बाग यांच्यासारख्या बागा दिवसातील महत्वाच्या वेळी लोकांनी भरलेल्या असतात. जिजामाता उद्यान, संभाजी महाराज गार्डन, बंड गार्डन याठिकाणी देखील लोकांची गर्दी दिसत असते. 

१९६१ साली आलेल्या पानशेत पुराने पुण्याचा नकाशा मात्र मोठ्या प्रमाणावर बदलला. नानासाहेब पेशव्यांनी निर्मिती केलेल्या पर्वती टेकडीचे स्वरूप यानंतर आधीसारखे राहिले नाही. १९४९ साली स्थापन झालेले पुणे विद्यापीठ पूर्वेकडचे ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते. पुण्यातील पुरातन इमारती आणि त्या ठिकाणी घडलेले ऐतिहासिक घटना हे पुण्याच्या सांस्कृतिक ठेव्यात मोठी भर घालत असतात. 

पुण्याचे भौगोलिक स्थान पण विशेष म्हणता येण्याजोगे आहे. आंबेगाव तालुक्यात उगम पावणारी भीमा नदी पुण्यातील मुख्य नदी आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यादरम्यान असलेले भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव प्राण्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याठिकाणी पाहायला मिळणारा शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.

पुण्यात शिवकालीन किल्ले पावलापावलावर आपल्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देतात. इथला एकेक किल्ला हा अनेक मोठ्या घटनांचा साक्षीदार आहे. महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी, तानाजी मालूसरेंच्या बलिदानाने पावन झालेला सिंहगड, स्वराज्याची मुहूर्तमेढ जिथून रोवली गेली तो तोरणा, हे सर्व किल्ले पुण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. 

त्याचप्रमाणे आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई, यासारखी ठिकाणे पुण्याला पर्यटनाच्या बाजूने देखील उजवे बनवतात. आजच्या घडीला पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असण्याबरोबर देशाची औद्योगिक राजधानी होऊ पाहत आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने पुण्यात आणून इथल्या श्रीमंतीत भर घालत आहेत. पुणे जिल्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ऐश्वर्यात मोठी भर घालत आहे असे म्हणता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required