computer

क्रोएशियामधल्या गावांमध्ये मोठमोठाले खळगे का पडत आहेत? काय आहे रहस्य?

नैसर्गिक आपत्ती आली की माणूस हतबल होऊन जातो. भूकंप, पूर, वादळ, त्सुनामी अश्या अनेक नैसर्गिक संकटांतून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरी अचानक असं काही घडतं की जिथे माणसाचं काही चालत नाही. काही महिन्यांपासून एक वेगळेच नैसर्गिक संकट क्रोएशियामध्ये आले आहे आणि हे इतके विचित्र आहे की तिथे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तज्ञ, सरकारी संघटना या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण अजूनही या संकटाचे सावट गेलेले नाही. नक्की काय घडलंय क्रोएशियामधल्या त्या दोन गावांमध्ये?

क्रोएशियामधल्या मीनियानी (Mečenčani)आणि बोरोयोव्हिकी(Borojovići) या दोन गावांत अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचे खड्डे तयार होत आहेत. हे खड्डे छोटे नाहीत, तर एखाद्या मोठ्या जलाशयाएवढे आहेत. यांना खळगे किंवा सिंकहोल असं म्हटलं जात आहे. तिथले गावकरी या अचानक तयार होणाऱ्या खळग्यांमुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. यांचा आकार तब्बल १०० फूट रुंद आणि ५०फूट खोल आहे. आणि गेले काही महिन्यांत या गावांत असे अनेक खळगे निर्माण होत आहेत.

क्रोएशियामध्ये अनेक भूकंप होत असतात. डिसेंबर २०च्या शेवटी मीनियानीमध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर फक्त ६ दिवसांनी एक मोठा खळगा तयार झाला. तिथे शेजारीच राहणाऱ्या गावकऱ्याने सांगितले की तो आणि त्याची बायको नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघत होते , तेव्हा त्यांना शेजारच्या शेतात काहीतरी विचित्र होत आहे असे जाणवले. त्या दोघांनी बाहेर जाऊन पाहिले तर जवळजवळ १०० फुटांचा एक मोठा खड्डा अचानक तयार झाला आहे. त्यात पाणीही होते. कालपर्यंत त्या जागी असे काही नव्हते आणि अचानक असा खड्डा पाहून ते घाबरले. तो खड्डा म्हणजे सिंकहोल होते जे आकाराने हळूहळू वाढत होते. जणूकाही ते अख्खे गाव गिळण्यास आले आहे.

गेल्या काही महिन्यांत असे १०० खळगे तयार झाले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे खळगे भूस्खलन किंवा भूकंपांमुळे तयार झाले असावेत. क्रोएशिया हा भूकंपग्रस्त प्रदेश आहे. पण गेले काही महिने हे खळगे ज्या विचित्र पध्दतीने वाढत आहेत त्यामुळे सगळेजण हैराण आहेत. आणि महत्वाचे म्हणजे ते कुठे तयार होऊ शकतील याची काही पूर्वसूचना देता येत नाही. आधी हे मोकळ्या जागेत तयार होत होते. परंतु काही खळगे मानवी वस्तीत तयार झाल्याने हजारो लोकांच्या जीवितास आणि मालमत्तेसाठी हे धोकादायक बनले आहे. खळग्यांमध्ये शेत, घरं आणि ट्रॅक्टर बुडण्याच्याही काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावाकऱ्यांच्या मनात भीती आहे.

हे खळगे कसे तयार होतात यावर तज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. याचा आणि भूकंपाचा काही संबंध आहे का याविषयी जुने तपशीलही तपासून पाहिले जात आहेत. याविषयी अजूनतरी काही ठोस माहिती मिळाली नाही. या भागात दर आठवड्याला नवीन खळगे तयार होत आहेत. जमीन खचण्याच्या घटना ही घडत आहेत. त्यामुळे प्रशासन ही दोन्ही गावं स्थलांतरित करण्याचा विचार करत आहे.

हे खळगे पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. क्रोएशिया या नैसर्गिक संकटाचा सामना कसे करते हे पाहणे उत्सुकचे ठरेल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required