तांब्याचा धातूपात्रातील पाणी, आरोग्यासाठी चांगले का एक खूळ?

‘’अरे, काय म्हणतेय प्रकृती?’’

‘’ठीकच आहे म्हणायचं काका आता.’’

‘’अरे, किती दिवस तू असं सहन करणार? अगदी तोळा-मासा झालीय तब्येत.’’

‘’हो ना हो, कालच्यापेक्षा आज बरी, पण उद्याची पुन्हा काहीच गॅरेन्टी नाही. कदाचित पुन्हा पहिले पाढे पंचावन्न…’’

‘’असं होतं तरी काय?’’

‘’एक असेल तर सांगतो काका! भूक लागत नाही, मग खाल्लं जात नाही. थोडसं खाल्लं तरी पचत नाही की अंगी लागत नाही. बारीक-बारीक ताप, खोकला आहेच. डाॅक्टर-वैद्य सांगतील ते केलं पण फरक नाही पडला.’’

‘’अरे, सगळे प्रयत्न केलेस ना, आता मी सांगतो ते कर. मामे मेहुण्याला म्हणजे आमच्या हिच्या मामेभावाला असाच त्रास होता. त्याने मी जे सांगितलं ते व्यवस्थित केलं. पंधरा दिवसात एकदम टुणटुणीत. कामावरही नीट जायला लागला, नि आता तर कंपनी त्याला बाहेरगावी पाठवतेय कामासाठी. पठ्ठ्याला काहीच अडचण नाही.’’

‘’काय सांगता, काका! खरंच हो, तुम्ही सांगाल ते करतो पण काही अख्सीर इलाज सांगा. कंटाळलोय आता…’’

‘’अरे, तू तांब्याच्या लोट्यातलं पाणी सुरू कर. रात्री लोट्यात पाणी भरून तांब्याच्याच ताटलीने झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्या उठल्या अनशापोटी ते पाणीे पिऊन टाकायचं. मग पुन्हा लोटा भरून ठेवायचा नि ते पाणी रात्री प्यायचं. जेवताना तेच पाणी प्यालास तर उत्तमच.’’

‘’नक्की काका, आजच तांब्याचा तांब्या आणतो आणि सुरू करतो.’’

 

हे असे संवाद येता जाता आपल्या कानी पडत असतात. हे असं लाख दुखों की एक दवा, आपल्या इतकी परिचित असते की तिच्या निव्वळ माहितीने आपण तिचा अंगिकार करतो.

तांब्याच्या किंवा तत्सम चांदी, पंचधातू किंवा अगदी गेला बाजार सोन्याच्या भांड्यातलं पाणी, दूध वगैरे खरोखरच इतकं गुणकारी असतं? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यापूर्वी आपल्याला भारतीय मनाचा परिपोष कसा होतो हे समजून घ्यावं लागेल.

भारतीय वैद्यक, ज्याचा पाया आयुर्वेदाचा आहे, त्यानुसार शरीर हे सप्तधातूंपासून बनलेलं आहे. निसर्गातही आपल्याला शुद्ध धातू (मेटल) सापडतात. निसर्गातले काही धातू वैशिष्ट्यपूर्ण असतात. जसं सोनं, चांदी इ. यांच्यावर हवेचा फारच थोडा परिणाम होतो. त्याप्रमाणेच तांबे, लोह असे धातूंच्या शुद्ध रूपावरही फारसा परिणाम होत नाही. प्राचीन मानवाने असा विचार केला की या धातूंचे गुण आपल्या शारीर धातूंमध्ये मिळवता आले तर आपल्या हाती आरोग्याची गुरूकिल्लीच लाभेल. या विचाराने प्रेरित होऊन रसशास्त्राच्या माध्यमातून त्याने नैसर्गिक धातूला भस्म प्रक्रियेने शारीर बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेच्या सुरूवातीच्या प्रयत्नाचा भाग म्हणजे अग्नीच्या साहाय्याने धातूचे गुणधर्म पाण्यात उतरवणे. असं मानण्यात येतं की ज्या धातूच्या भांड्यात पाणी उकळलं जातं, त्या धातूचे गुण त्या पाण्यात उतरतात आणि तसं पाणी सेवन केल्याने शारीर धातूंना निसर्गातील धातूंसारखी बळकटी येते. पुढे असाही विचार झाला असावा की पाण्याचा धातुपात्राशी संपर्क जितका अधिक तितके धातूचे गुण पाण्यात उतरण्याचं प्रमाण जास्त, म्हणून धातूपात्रात रात्रभर पाणी ठेवण्याची पठडी पडली असावी.

संशोधनान्ती अशाप्रकारे धातूंचे गुण पाण्यात उतरल्याचं सिद्ध होत नाही पण परंपरेने हे सत्य मानण्यात येतं आणि म्हणूनच अशाप्रकारे धातूपात्रातील पाण्याचे सेवन लोक आजही करत आहेत.

एका अर्थी अशी कृती वाईट नाही, जोपर्यंत धातूपात्राचा धातू त्याच्या शुद्ध स्वरूपात आहे. आपण वर पाहिलेच आहे की नैसर्गिक धातू त्यावर अग्नी आदिंच्या प्रक्रिया केल्याशिवाय शारीर बनत नाहीत. त्याचप्रमाणे हवा, पाणी, वातावरणातील इतर वायू यांच्या संपर्कामुळे धातूंवर परिणाम होऊन त्यावर त्या धातूचे आॅक्साईड्स, सल्फाईड्स वगैरे अशुद्धी जमा होतात. या अशुद्धी शरीरासाठी विषासमान असू शकतात. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की शुद्ध धातुपात्रातलं पाणी अपाय करणार नाही पण धातूच्या अशुद्धींनी युक्त झालेलं पाणी नक्कीच अपायकारक असू शकतं.

वातावरणाच्या परिणामामुळे काळी पडलेली चांदी, हिरवं पडलेलं तांबं वगैरे अशुद्धीची उदाहरणं होत. अशा अशुद्धींनी युक्त धातुपात्रांचा वापर टाळणंच श्रेयस्कर कारण यामुळे उपायापेक्षा अपाय होण्याचीच अधिक शक्यता असते. तांब्याच्या लोट्यात रात्रभर ठेवलेलं पाणी पिता यावं म्हणून लोक तांब्याचंच पिंप घेतात पण त्यातील नळाच्या आयल्या बाजूला स्वच्छ न करता आल्याने अशुद्धी जमा होऊन शरीरावर दुष्परिणाम दिसल्याच्या भारतात नोंदी आहेत.

म्हणून परंपरेने मान्य उपचारांचा अंगिकार करताना तो डोळसपणे आणि अशुद्धी विरहित अवस्थेत करावा हे योग्य!

image source

सबस्क्राईब करा

* indicates required