computer

९ वर्षांपूर्वीच्या ट्विट्समुळे आलंय इंग्लिश खेळाडूंचं करिअर धोक्यात...या ट्विटसमध्ये नेमकं काय आहे?

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर फोटो उकरण्याची लाट आली होती. आपल्या मित्रांचे जुने फोटो उरकून त्यावर एक से बढकर एक कॉमेंट करत मुल धुमाकूळ घालत होती. हा प्रकार सर्वांनी एन्जॉय केला. मात्र जुने ट्विट्स उकरण्याचे परिणाम मात्र इंग्लंडच्या खेळाडूंना जाऊन विचारायला हवेत. बिचाऱ्यांचे अक्षरशः हाल होत आहेत.

इंग्लंडचा २७ वर्षीय खेळाडू ओली रॉबिन्सन याचे संपूर्ण करियर त्याच्या जुन्या ट्विट्समुळे संकटात सापडले आहे. या भावाने इंग्लंडच्या संघाकडून जोरदारपणे क्रिकेटमध्ये प्रवेश केला. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्याने ७ विकेट्स झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण नुकतेच २०१२-१३ दरम्यान वयाच्या १८व्या वर्षी त्याने केलेल्या काही वर्णद्वेषी ट्विट्स व्हायरल झाले आणि जगभरातून त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला.

हे प्रकरण समोर आल्यानंतर ओली रॉबिन्सन याने माफी मागून वाद संपवण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण चांगलेच पेटले असल्याने वयाच्या बोर्डने यावर त्वरित कृती करत रॉबिन्सनवर कारवाई केली आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने त्याची सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हकालपट्टी केली आहे.

गोष्ट इथेच संपत नाही. ओली रॉबिन्सन सोबतच इतर इंग्लिश खेळाडू पण या ट्विट्स चक्रात अडकत असलेले दिसत आहेत. जो बटलर, इयॉन मॉर्गन, जेम्स अँडरसन या इंग्लन्डच्या आघाडीच्या खेळाडूंचे मागील काही ट्विट्स व्हायरल होत आहेत. त्यात ते एकमेकांना 'सर' म्हणून स्तुती करत आहेत. असे करणे हा भारतीयांना चिडवण्याचा प्रकार आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे इंग्लिश बोर्ड या ट्विट्सची देखील चौकशी करणार आहे.

इंग्लंडचे खेळाडू तसे मैदानावर आणि मैदानाबाहेर पण आपल्या आक्रमण स्वभावासाठी ओळखले जातात. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ समजला जातो. अँड्रू फ्लिंटॉफने भर मैदानावर शर्ट काढणे असो की नुकतेच केविन पीटरसनने हिंदीत भारतीयांना चॅलेंज देणे असो इंग्लंडचे खेळाडू आक्रमणपणा आणि भांडखोरपणा यात फरक करतात की नाही असा प्रश्न पडतो.

पण या सर्व घटनांतून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, की समाज माध्यमांवर तुम्ही व्यक्त केलेले विचार जरी डिलीट करता येत असले तरी स्क्रीनशॉट नावाचे प्रचंड ताकदीचे हत्यार तुमच्यावर कधीही आदळू शकते आणि ते तुमचे तुम्ही विचार केला नसेल इतके मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे समाज माध्यमांवर वावरताना जबाबदारी बाळगून व्यक्त झाले तरच उत्तम!!!

सबस्क्राईब करा

* indicates required