काय म्हणता, रशियाच्या रस्त्यावर सिंह फिरतायत? बातमी फॉरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा !!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणजे गब्बर माणूस. COVID-19 रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांनी रशियन जनतेला दोनच पर्याय दिले आहेत. एक तर घरात राहा किंवा ५ वर्षांचा कारावास भोगा. एवढंच नाही तर लोकांनी घरातच राहावं यासाठी रशियाच्या रस्त्यावर सिंह सोडण्यात आलेत.
या प्रकारच्या बातम्या तुम्ही वाचल्या का? रशियाच्या रस्त्यावर सिंह फिरतायत ही बातमी तर हमखास तुम्हाला मिळाली असणार. पण थांबा, आज आपण या बातमीत असलेलं तथ्य शोधणार आहोत.
सिंहाची बातमी सर्वात आधी ॲलन शुगर नावाच्या अब्जाधीशाने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. हा फोटो म्हणजे एका वृत्तवाहिनीचा फोटो होता. बातमीत सांगण्यात आलं होतं, की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोक आपल्या घरातच राहतील यासाठी रशियाच्या रस्त्यांवर ५०० सिंह सोडण्यात आले आहेत.
यानंतर ही बातमी व्हायरल झाली. २८,००० लोकांनी बातमीला लाईक ठोकलं, तर ६००० जणांनी बातमी रिट्विट केली. हीच बातमी नंतर वेगवेगळ्या माध्यमांवर शेअर करण्यात आली.
बातमी किती खरी किती खोटी?
ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. फोटो वृत्तवाहिनीचा वाटत असला तरी तो मुद्दाम तयार करण्यात आला आहे. इंटरनेटवर ‘Break you own news,’ नावाचं टेम्प्लेट मिळतं. या टेम्प्लेटचा वापर करून आपण खोटी बातमी तयार करू शकतो. सहसा याचा वापर विनोदी पोस्ट तयार करण्यासाठी केला जातो. पण काही खोट्या बातम्या खऱ्याही वाटू शकतात. जशी ही बातमी सगळ्यांनाच खरी वाटली.

तर या फोटोतलं एक तथ्य म्हणजे हा फोटो फोटोशॉप करून तयार केलेला नाही. २०१६ साली साऊथ आफ्रिकेच्या जोहान्सबर्गच्या रस्त्यांवर एक सिंह फिरत होता. पुढे समजलं की तो सिंह एका सिनेमाचा भाग होता. सिनेमाच्या निर्मात्यांनी पोलिसांना न कळवता सिंह रस्त्यावर सोडला होता. बातमीत दिसणारा फोटो त्यावेळी घेण्यात आला होता.
तर मंडळी, कोरोना विषाणू असो किंवा कोणतीही मोठी घटना असो, त्यासोबत अशा खोट्या बातम्यांचं पीक येतं. त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी बातमीच्या खरेपणा नक्कीच तपासून घ्या. कोरोनाबद्दलही अशाच खोट्या गोष्टी पसरल्या आहेत. त्यासंदर्भातला आमचा हा लेख वाचायला विसरू नका.
'कोरोनाव्हायरस'बद्दल असलेल्या १० अफवा...या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवलाय का?