computer

एक्सिस बँकेच्या एका चुकीमुळे चोरट्यांनी २० कोटी रुपये कसे कमावले?

चोरटे नेहमीच यंत्रणेतल्या चुका शोधून काढून हात साफ करण्याच्या प्रयत्नात असतात. टोल भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या FASTag  यंत्रणेतील चुकाही चोरांनी शोधून काढल्या आहेत. या एका चुकीबद्दल एक्सिस बँकेला एका वर्षात तब्बल २० कोटी रुपये गमवावे लागले आहेत.

FASTag मधली अशी कोणती चूक त्यांच्या लक्षात आली होती? चला तर पाहूया.

FASTag द्वारे ऑनलाईन टोल भारता येतो. भारतातल्या प्रमुख बँकांच्या e-wallet मधून FASTag  साठी रिचार्जची सुविधा उपलब्ध आहेत. एक्सिस बँकेने FASTag  रिचार्जसाठी नवीन e-wallet सुविधा सुरु केली आहे. रोजच्या व्यवहारांसाठी एक सॉफ्टवेअरही घेण्यात आलं आहे. हे अपॅ डाउनलोड केल्यानंतर कोणीही UPI पद्धतीने FASTag विकत घेऊ शकतो.

या प्रकरणातील चोरट्यांनी एक्सिस बँकेच्या e-wallet  मधून खोटा व्यवहार केला आणि त्यानंतर आपण दिलेल्या माहितीत चुका होत्या असा बनाव आणून ‘न भरलेले’ पैसे परत मागितले. एक्सिस बँकेच्या सिस्टममध्ये असलेल्या लहानशा चुकीमुळे अस्तित्वात नसलेल्या रिचार्जचा रिफंड या चोरट्यांना मिळाला.

हा प्रकार मुंबईत घडला आहे.चोरट्यांनी जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एका वर्षात ४२५९ खोट्या व्यवहाराद्वारे तब्बल १९.८ कोटी रुपये रिफंड मिळवले होते.

हा गुन्हा उघड कसा झाला?

एक्सिस बँकेने स्वतः तपास करून हा घोटाळा उघड केला आहे. बँकेच्या लक्षात आलं की वर्षभरात काही अज्ञात बँक खात्यांमध्ये FASTag च्या रिचार्जचे पैसे रिफंड होत आहेत. यातल्या बऱ्याच खात्यांमध्ये पैसेच नव्हते, तर काही खाती ही बंद होती. सायबर क्राईमतज्ञ आणि इतर कायद्याच्या जाणकारांनी आपलं मत देताना  बँकेच्याच सिस्टममध्येच दोष असल्याचं सांगितलं आहे.

पुरुषोत्तम रेवण्णा, किरण मंजू, राजेश शिवण्णा, आणि प्रकाश शिवण्णा उर्फ ​​रासण्णा अशी या चोरट्यांची नावे आहेत.  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून फक्त ७ कोटी रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कोणतंही सॉफ्टवेअर १००% बरोबर असतंच असं नाही. त्यामुळे त्रुटी राहून जातात आणि त्यांचा गैरफायदाही घेतला जातो. पण, तुम्हांला एखाद्या यंत्रणा/प्रणालीमध्ये अशी चूक सापडली, तर ती तुम्ही त्या संस्थेच्या निदर्शनास आणून देऊ शकता. फेसबुक, गुगल, ॲमेझॉन अशा कितीतरी कंपन्या लोकांना अशा त्रुटी शोधण्यासाठी भरभक्कम बक्षीसे देतात. तेव्हा, पुढच्या वेळेस तुम्हांला असं काही सापडलं, तर तुम्ही नक्की संबंधित कंपनीला नक्की कळवा. बक्षीस नाही मिळालं, तरी हे सत्कार्य केल्याचा आनंद वेगळाच असेल!!

सबस्क्राईब करा

* indicates required