बालवधू, हिंदू लेडी ते लोकांवर उपचार करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर

पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण असं विचारलं तर त्याचं उत्तर सगळ्यांना माहित असतं- डॉ. आनंदीबाई जोशी. त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांना कोल्हापूर संस्थानात नोकरी मिळाली होती. पण लोकांवर उपचार करायला सुरूवात करण्यापूर्वीच त्यांचा टी.बी.नं मृत्यू झाला. पण मग लोकांवर उपचार करणारी पहिली महिला डॉक्टर कोण याचं उत्तर खूप कमी लोकांना माहित आहे. त्या आहेत- डॉ. रखमाबाई.  आज आपण जाणून घेऊ, कोण होत्या या रखमाबाई, आणि ट्रेलरमध्ये दाखवलेला  त्यांच्यावरचा खटला का आणि कुणी दाखल केला ते..

१८८४ साली एक अघटित घटना घडली. एका विवाहित मुलीनं तिचा नवरा अशिक्षित आहे, व्यसनी आहे, रोगट आहे आणि कफल्लक आहे ह्या कारणासाठी सासरी जाण्यास नकार दिला. हे एक पुरे की काय म्हणून तिच्या नवर्‍यानं - बायको माझ्यासोबत नांदायला येत नाही - म्हणून कोर्टात सरळ दावाच ठोकला! आणि अपेक्षेप्रमाणे, "आजकालच्या मुलींनी अगदीच ताल सोडला आहे" छापाच्या धर्ममार्तंड आणि तथाकथित संस्कृतीरक्षक-पत्रकार यांच्या वक्तव्यांना अगदी पूर आला. पण हे जर असं घडलं नसतं तर कदाचित भारताला वैद्यकीय सेवा देऊ शकणार्‍या पहिल्या स्त्रीडॉक्टरसाठी आणखी काही वर्षं वाट पाहावी लागली असती. ह्याचं श्रेय त्या मुलीच्या खंबीरपणाला जातं, तसंच ते तिला असलेल्या घरच्या पाठिंब्याला आणि अर्थातच कौटुंबिक पार्श्वभूमीलाही जातं. ही मुलगी म्हणजेच डॉ. रखमाबाई.

रखमाबाईंचं लग्न झालं तेव्हा त्या ९ वर्षांच्या होत्या. तेव्हा त्या कुणाशी लग्न व्हावं हा निर्णय त्यांच्या हाती नव्हता आणि कदाचित इतक्या वयाच्या मुलीला एवढी पोचही नसते. त्यामुळं अशा वेळेस लागलेल्या  लग्नात बांधलं जाण्याची सक्ती त्यांना मान्य नव्हती. तेव्हाच्या वर्तमानपत्रात याबद्दल खूप चर्चा झाल्या. दोन्ही बाजूंनी लोक लिहित होते. तेव्हा रखमाबाईंनी ’टाईम्स’मध्ये ’द हिंदू लेडी’ नावानं इंग्रजी पत्रं लिहिली.  भारतातल्या बालवधू आणि स्त्रियांचे हक्क यांच्या अडचणी त्यांनी या पत्रांतून मांडल्या.  भावनाविवश न होता, सौम्य परंतु टोकदार शब्दांत त्यांनी मनातले विचार उतरवले. 'बालविवाह', 'सक्तीचे वैधव्य' 'पडदापद्धत' अश्या काही विषयांवरही त्यांनी लिहिलं. कदाचित असं लेखन करून लोकशाहीच्या मार्गानं स्वतःवरच्या आणि इतर स्त्रियांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा हा त्यांच्यापुरता मार्ग असावा. अर्थातच 'हिंदू लेडी'च्या ह्या पत्रांनी खळबळ माजली. खटला तर आणखी गाजलाच परंतु वाईटातून चांगलं निष्पन्न होतं, ह्या न्यायानं, लेडी डफरिन, लेडी रे आणि मिसेस ग्रँट डफ, ह्यांनी या हिंदू लेडीला साहाय्य केलं.

त्याकाळात परदेशातसुद्धा स्त्रियांचं वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणं', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow' ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेनं उत्तीर्ण झाल्या. 'Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons' ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झालं.

रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली.  इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. पण त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामंही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या.  तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून धिक्कारल्या गेलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. त्यांनी स्त्रियांना पोथ्यापुस्तकं वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं होतं. त्यांच्या कामातून त्यांना इतका वेळ कमी मिळी की अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.

एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्त्वाचं खरंच, पण त्यांनी केलेली इतर कामंपण तितकीच महत्त्वाची आहेत.  १९०७च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या त्या सेक्रेटरी होत्या, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं. त्यांनी अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्यानं देण्याची व्यवस्था केली. स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती.  अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं, तिला लिहायला वाचायला शिकवणं, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवानं रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.

नव्या जाणिवा, नवी क्षितिजं, नवी कार्यक्षेत्रं जी त्याकाळच्या अगदी थोडक्या लोकांनी आपलीशी केली, त्यांची यादी डॉ. रखमाबाई ह्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. फक्त स्वत:साठी न जगता आणि सुधारणेच्या प्रश्नांचा नुसताच खल न करता त्या सुधारणा प्रत्यक्ष जीवनात उतरवून त्या खरोखरी एक ध्येयनिष्ठ जीवन जगल्या.

संदर्भ:

सबस्क्राईब करा

* indicates required