computer

अंतरा मेहता : भेटा महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला फायटर पायलटला !!

महाराष्ट्राच्या आणखी एका लेकीने महाराष्ट्राच्या अभिमानात भर घातली आहे. काही गोष्टी फक्त पुरुषच करु शकतात या समजाला दिवसेंदिवस धक्के बसत आहेत. कारण महिला हळूहळू प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत. त्यात महाराष्ट्र मागे राहिला असता तर नवलच!!!

नागपूरच्या एयरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर असलेल्या अंतरा मेहता या फायटर पायलट होण्याचा मान मिळविणाऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला ठरल्या झाल्या आहेत. नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे.

अंतरा यांनी अजून एका क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. बास्केटबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. 

अंतरा या त्यांच्या पूर्ण बॅचमध्ये फायटर स्ट्रीमसाठी निवड होणाऱ्या एकमेव महिला ठरल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे आजवर फायटर पायलट म्हणून फक्त १० महिलांची निवड झाली आहे.

अंतरा यांनी श्री रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. त्यांनंतर त्यांनी सर्विस सिलेक्शन बोर्ड(ssb)ची परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात पास करून एयरफोर्स ट्रेनिंग अकॅडमी जॉईन केली. या प्रवासाबद्दल बोलताना त्या म्हणतात की तिसऱ्या प्रयत्नावेळी त्यांनी वेगळी स्ट्रेटजी अवलंबिली. त्यांनी ठरवले की याआधी जे काही आपण शिकलो आहोत, ते विसरून नव्याने सुरुवात करू. आणि जे द्यायचे ते आपले 100 टक्के द्यायचे. पुढे त्या सांगतात की ssb खूप कठीण आहे असे नाही तर इथे आपल्या व्यक्तिमत्वाची चाचणी होते. जे ती पार पाडतात ते परिक्षा पण पास होतात.  शनिवारी हैद्राबादमधील दिंडीगुल येथे झालेल्या पासिंग परेडमध्ये अंतरा सहभागी होत्या. आता हॉक्स हे लढाऊ विमान चालवण्याचे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, "रवी आणि पूनम मेहता यांच्या कन्या फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता या महाराष्ट्रातून फायटर विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. २० जून २०२० च्या कंबाईन ग्रॅज्युएशन परेड येथे त्यांची निवड करण्यात आली. फायटर स्ट्रीममधून निवड झालेल्या त्या एकमेव महिला आहेत."

मराठी पाऊल पडते पुढे याचे अजून एक असे हे अप्रतिम उदाहरण अंतरा मेहता यांच्या निवडीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

 

आणखी वाचा :

स्त्रियांना या ७ गोष्टी करण्याची परवानगी नव्हती!! काही परवानग्या तर गेल्या १० वर्षांत मिळाल्या आहेत..

महिलांच्या ड्रेसला १८ व्या शतकापासून या कारणामुळे खिसे नाहीत !!

सबस्क्राईब करा

* indicates required