f
computer

कोहिनूरवर पाकिस्तान आणि अफगणिस्तान पण का हक्क सांगत आहेत आणि का? वाचा या कोहिनूरचा सातशेहून अधिक वर्षांचा प्रवास...

देशाच्या इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विसरणे अशक्य असते मंडळी. त्यातल्या काही दुर्दैवी घटनांच्या जखमा नेहमी ताज्या असतात. कितीही काळ लोटला तरीसुद्धा त्या जखमा बऱ्या होत नाहीत. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी एक अशीच क्रूर, हिंसक घटना अनेक निष्पाप भारतीयांसोबत घडली होती.  जालियनवाला बाग हत्याकांड!

इंग्रज अधिकारी जनरल डायर याने सभेसाठी जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि महिला, बालकांसह अनेकांची सरेआम कत्तल झाली. गोळीबार आणि चेंगराचेंगरीमध्ये कित्येक अभागी जीव हकनाक मारले गेले. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी आलेली बातमी! बातमी अशी आहे की, या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शंभर वर्षानंतर पाकिस्तानचे माहिती तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दोन उल्लेखनीय गोष्टींचा समावेश आहे. एक, शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाबाबत ब्रिटिश सरकारने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची माफी मागितली पाहिजे. आणि दोन, ब्रिटिशांनी कोह-इ-नूर (कोहिनूर) हिरा पाकिस्तानकडे सुपूर्द केला पाहिजे. 

कोहिनूर हिऱ्यावर हक्क सांगणारा पाकिस्तान हा चौथा देश आहे. पण पाकिस्तानचा हा दावा कितपत योग्य आहे? कोहिनूर खरोखर पाकिस्तानच्या मालकीचा आहे की भारताच्या? आपण या विषयी जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी थोडंसं या हिऱ्याची माहिती घेऊया.

कोह-इ-नूर याचा अर्थ होतो प्रकाशाचा पर्वत! हे नाव या हिऱ्याला अगदी शोभेल असे आहे. तब्बल १०८ कॅरेटचा हा तेजस्वी हिरा दक्षिण भारतात गुंटूरमधल्या कोल्लूर खाणीत मिळाला. आज तो जगातल्या सर्वात महत्वाच्या आणि किमती हिऱ्यांपैकी  एक आहे. तसेच आजपर्यंत सर्वाधिक चर्चेत असणारा हा हिरा आहे. याचा इतिहास हजारो वर्षांचा मानला जातो. आपल्या आयुष्यात अनेक राजे, महाराजे यांच्या खजिन्याची शोभा वाढवून आज कोहिनूर लंडनच्या टॉवर म्युझियममध्ये सुरक्षित ठेवला आहे. 

कोहिनूरचा इतिहास फारच मनोरंजक मानला जातो. हा सर्वप्रथम इसवी सन १३०४ मध्ये माळवा प्रांताच्या राजाच्या खजिन्यात होता असा उल्लेख मिळतो. नंतर १३३९ मध्ये हा हिरा समरकंद शहरात तीनशे वर्षे ठेवला गेला. कोहिनूरबाबत संपूर्ण जगात असं मानलं जातं की हा हिरा कुठल्याही पुरुषाला साथ देत नाही. याला फक्त महिलाच परिधान करू शकतात. जर पुरुषाने हा हिरा आपल्या अंगावर बाळगला, तर त्याच्या मागे दुर्दैवाचे दशावतार सुरू झालेच म्हणून समजा! आता हे कितपत खरं ते देव जाणे… असो! 

(अल्लाउद्दीन खिलजी)

चौदाव्या शतकात हा हिरा अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात होता. नंतर तो बाबरकडे गेला. १५२६ मध्ये बाबरने ‘बाबरनामा’ मध्ये लिहिलेल्या नोंदीनुसार कोहिनूर हिरा सुलतान इब्राहिम लोधीने त्याला भेटस्वरूपात नजर केला होता. बाबरानंतर त्याचे वंशज हुमायून आणि औरंगजेब यांनी कोहिनूर सांभाळला. त्या वेळी तो लाहोरमधल्या मशिदीत सुरक्षित ठेवला असताना  नादिर शाह नावाच्या  पर्शियाच्या राजाने आक्रमण करून कोहिनूर स्वतःच्या ताब्यात घेतला आणि  तो त्याला पर्शियाला घेऊन गेला. नादिर शाहनेच या हिऱ्याचे नाव ‘कोहिनूर’ ठेवले. पण तो या हिऱ्याला जास्त काळ सांभाळू शकला नाही. अहमद शाह दुराणी याने नादिर शाहची हत्या केली व तो हिऱ्याचा मालक बनला. या अहमद शाहचा वंशज शुजा दुराणी कोहिनूर भारतात परत घेऊन आला. शीख राजा रणजित सिंग यांनी त्याला एका युद्धात मदत केल्याने त्या बदल्यात शुजा दुराणी याने कोहिनूर रणजित सिंगांना भेट दिला. 

२९ मार्च १८४९ मध्ये ब्रिटिशांनी युद्ध करून रणजित सिंग यांची संपत्ती ताब्यात घेतली व अशातऱ्हेने कोहिनूर ब्रिटिशांकडे गेला तो आजतागायत! 

ब्रिटिशांनी कोहिनूर समुद्रमार्गे इंग्लंडला नेला. तेव्हा इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरियाने या हिऱ्याला आणखी पैलू पाडले व त्याला महाराणीच्या राजमुकुटात स्थान दिले. एका घोषणेत असे जाहीर केले गेले की, कोहिनूर कायमस्वरूपी महाराणीच्या मालकीचा असणार असून त्यावर कुठल्याही पुरुषाचा हक्क असणार नाही. 

आता सांगा मंडळी, हा हिरा नक्की कुठल्या देशाचा? हा भारतात सापडला असला तरी विविध देशांमध्ये अनेक मालकांकडे याचा प्रवास झाला आहे. यावर भारत हक्क सांगतो तसेच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंडसुद्धा हक्क सांगतात. भारताने अनेक वेळा कोहिनूर परत करण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे. पण प्रत्येक वेळी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. आता कोहिनूरचा पुढील इतिहास काय असेल ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा.

 

लेखक : अनुप कुलकर्णी.

 

 

आणखी वाचा :

ओल्ड मॉंक- जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारतातल्या पहिल्या रमचं काय कनेक्शन आहे ??

सबस्क्राईब करा

* indicates required