computer

असे बनवा तुमचे स्वतः चे WhatsApp स्टिकर.

एखादे नवीन फिचर मार्केटमध्ये आले की आपल्याकडेही ते असावे असे वाटणे साहजिक आहे. सध्या बोलबाला आहे व्हाट्सअप स्टिकर्सचा. काय मंडळी? तुमच्याकडे आहेत का स्वतःचे व्हाट्सअप स्टिकर्स? की फक्त आलेले स्टिकर्स फॉरवर्ड करून समाधान मानताय? तुम्हालाही वाटतं ना आपले स्वतःचे पर्सनलाईज्ड स्टिकर्स असावेत म्हणून? मग डोन्ट वरी! आम्ही सांगू त्यावर उपाय… 

सध्या भारतात फक्त आयफोनवर हे स्टिकर्स उपलब्ध आहेत. व्हाट्सअप अपडेट केल्यावर स्टिकरचे नवीन फिचर वापरता येते. बाकी अँड्रॉइड मोबाईलसाठी अद्याप ‘प्ले स्टोअर’ वर अपडेट आले नाहीय. पण त्यावरही काही जणांनी उपाय शोधून काढलाय. हे व्हाट्सअप अपडेट गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड न करता .apk सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या काही वेबसाईट आहेत त्यावरून डाउनलोड करत केले जाते. पण मंडळी, अशा अनधिकृत वेबसाईटवरून सॉफ्टवेअर घेणे मोबाईलसाठी धोक्याचे ठरू शकते बरं का! या बाहेरील त्रयस्थ सॉफ्टवेअर वरून तुमचा वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो किंवा मोबाईलच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मग असे अनधिकृत ऍप घेण्यापेक्षा काही दिवस थांबून अधिकृत ऍप घेतलेले चांगले. 

 

तर, एकदा लेटेस्ट व्हर्जन तुमच्यापाशी आल्यानंतर तुम्ही स्टिकर्स वापरण्यासाठी सज्ज व्हाल. इमोजीच्या आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला स्टिकरचे ऑप्शन दिसेल. या स्टिकरवर क्लिक करून तुम्हाला प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या स्टिकर पॅकमधून तुमच्या आवडीचे स्टिकर्स निवडता येतील आणि ते वापरता येतील. 

पण तुम्हाला स्वतःचे स्टिकर हवे असतील तर? 

यावरही उपाय आहे मंडळी! तुम्ही स्वतःचा, कुटुंबीयांचा फोटो स्टिकर स्वरूपात बनवू शकता. तुम्ही एखाद्या आवडत्या इमेजचे स्टिकर तयार करू शकता, तुम्हाला स्वतःच्या शब्दात काही लिहून त्याचे स्टिकर बनवायचे असेल तर ते सुद्धा करू शकता! 

त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरून एक ऍपलिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्याचे नाव आहे, ‘personal stickers for whatsapp’. या ऍपमध्ये तुमच्या मोबाईल मधल्या .png प्रकारच्या इमेजेस आपोआप सेव्ह होतात आणि त्यांचे स्टिकर पॅक बनते. ते स्टिकर पॅक तुम्ही व्हाट्सअप स्टिकरमध्ये ऍड करू शकता. 

आता png इमेज कशा बनवायच्या? तर त्यासाठी सुद्धा प्ले स्टोअरवर ‘background eraser’ किंवा अशा प्रकारची अनेक ऍप आहेत ज्यामध्ये तुम्ही jpeg इमेज घेऊन त्यातला नको असलेला भाग काढू शकता किंवा फोटोच्या मागचे बॅकग्राउंड काढून टाकू शकता. एकदा एडिटिंग पूर्ण झाले की सेव्ह करताना इमेज save as png करायची की काम संपलं! ही सेव्ह झालेली इमेज आपल्या ‘personal sticker for whatsapp’ मध्ये दिसत आहे का याची एकदा खात्री करून घ्या. जर ती तिथे असेल तर शंभर टक्के तीच इमेज स्टिकरच्या रुपात तुमच्या व्हाट्सअप वर आलेली असेल याची खात्री बाळगा.

आता हे स्टिकर तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवून त्यांना आश्चर्यचकित करा… आहे ना भारी गंमत?

हा लेख कसा वाटला आणि यातून तुम्हाला हवी ती माहिती मिळाली का हे कमेंट्समधून अवश्य कळवा.