आणि हा इंदौरचा तरूण झाला इजिप्तजवळच्या प्रदेशाचा राजा!! जाणून घ्या हे कसं काय घडलं..

आता राजा व्हावं असं कुणाला वाटत नाही? पण राव, राजे-राज्य-प्रजा-साम्राज्य.. हे सगळे प्रकार केव्हाच इतिहासजमा झाले की. नाही म्हणायला इंग्लंडची आणि काही देशांचे राजे-राण्या आहेत, भारतातही काही 'नावापुरते' संस्थानिक आहेत,  पण त्यांच्या हाती कसलाही राज्यकारभार नाहीय. अशावेळी हा कोण टिक्कोजीराव राजा बनलाय? आणि त्याचा देश आहे तरी कुठं??

या बहाद्दराचं नांव आहे- सुयश दिक्षित. गडी गेम ऑफ थ्रोन्सचा फॅन आहे. तर,  मूळचा इंदौरचा हा तरुण इजिप्त आणि सुदानजवळच्या प्रदेशात फिरायला गेला होता. तिथं या दोन देशांच्या मध्येच कोणत्याही देशाच्या मालकीची नसलेली जमीन आहे. मग काय, सुयशराजेंनी तिथं आपला झेंडा रोवला. स्वत: राजे झाल्याची द्वाही फेसबुकावरून फिरवली. सहसा बाबांची गादी मुलाला मिळते, पण इथं या मुलानं बाबांना वाढदिवसाची भेट म्हणून या देशाचे राष्ट्राध्यक्षही बनवून टाकलं!! हाय काय  न् नाय काय!!!

आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की असं होऊच कसं शकतं? तर, हा जो इजिप्तच्या सीमाभागाच्या दक्षिणेला आणि सुदानच्या सीमाभागाच्या उत्तरेला असलेला भूभाग आहे, तो कुठल्याच देशाच्या मालकीचा नाहीय. त्याला "अनक्लेम्ड लँड" असं म्हणतात आणि या विशिष्ट भागाचं नांव आहे "बिर ताविल".  असा आचरटपणा करणारा हा पहिलाच मनुष्य नाही, पण हा प्रकार करणारा सुयश दिक्षित हा पहिलाच भारतीय आहे बरं..

सुयशनं याबद्दल एक डिट्टेलवार फेसबुक पोस्टच लिहिलीय. तो म्हणतो, "या बीर ताविलच्या जमिनीवर हक्क सांगण्यासाठी मी येऊन-जाऊन तब्बल ३१९किलोमीटर प्रवास केला. त्यासाठी मला अबू सिम्बेलहून भल्या पहाटे ४ वाजता निघावं लागलं. त्यासाठी मला इथल्या मुस्तफा नावाच्या ड्रायव्हरची आणि त्याच्या कारची मदत घ्यावी लागली". 

आता या सुयशच्या राज्यात कसं जायचं असा जर तुम्ही विचार करत असाल, तर ते लै डेंजरस काम है भौ.  तिथं जायचा रस्ता इजिप्तच्या मिलिटरी प्रदेशातून जातो. त्या भागात इतके अतिरेकी असतात, की तिथं 'दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा' आदेश सैनिकांना दिलेला असतो.  आणि या बीर ताविलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाय ठेवण्यासाठीही परवानग्या घ्याव्या लागतात बरं.. वर त्या इजिप्तच्या मिलिटरी एरियाचे फोटोज घ्यायचे नाहीत, एकाच दिवसात परत यायचं आणि कोणतीही मौल्यवान चीजवस्तू जवळ बाळगायची नाही अशा सगळ्या अटी असतात त्या वेगळ्याच. सुयश आणि त्याचा सोबती सुयोग, या दोघांनीही तब्बल ६ तासांचा वाळवंटातल्या ओसाड माळरानातला प्रवास केला, दरम्यान एक मिलिटरी तळ ओलांडला तेव्हा कुठे हे दोघेही बीर ताविलला पोचले. 

अशी केली सुयशने त्याच्या देशाची घोषणा..
म्हटलं ना, हे भाऊ गेम ऑफ थ्रोन्सचे फॅन आहेत. म्हणून अगदी त्याच थाटात  त्याने," I, Suyash Dixit, first of my name and the protector of the realm, declare myself as the king of “Kingdom of Dixit”. I call myself, King Suyash First from today." स्वत:च्या राजेपणाची घोषणा केली आहे. बाबांना राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केल्यावर देशात इतर पदे रिक्त आहेत आणि लोकांनी त्यासाठी अर्ज करावेत असंही त्यानं म्हटलंय. 

पाहा तो त्याच्या देशाबद्दल काय म्हणतो ते..
वेबसाईट- https://kingdomofdixit.gov.best (क्लिक करू नका, अशी कुठली वेबसाईटच अस्तित्वात नाहीय.)
देशाचं नांव: किंगडम ऑफ दिक्षित (केओडी)
झेंडा: दिलेल्या चित्रात पाहा. 
सध्याची लोकसंख्या: १ (मग राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलेले बाबा काय परकीय शक्ती आहेत की काय?) 
राजधानी : सुयशपूर 
राजा: राजे सुयश प्रथम 
देशाचा स्थापनादिन: ५ नोव्हेंबर २०१७ 
राष्ट्रीय प्राणी: पाल (वाळवंटात आणि ओसाड माळरानात आणखी कोण येणार आहे मरायला तिथं?) 

सुयशनं स्वत:ला देशाचा पंतप्रधान आणि सरसेनापतीही म्हणवून घेतलंय. म्हणायला काय जातंय म्हणा.. आपली बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!! 

प्राचीनकाळी टोळ्या कोणत्याही नव्या भूभागावर मालकीहक्क सांगण्यासाठी तिथं आपलं शेत लावायचे. म्हणूनच  सुयशनं त्या बीर ताविलमध्ये एक बी पेरून त्याला पाणी घातलंय. राजेसाहेब  रोज काही इंदूरातून उठून इतक्या दूर इंदूर ते इजिप्त अधिक पुढचा सहा तासांचा प्रवास करून पाणी घालायला काही तिथं जाऊ शकतील असं काही वाटत नाही. त्यातच  वाळवंटात आणि कडक उन्हात ते एक बी कसं काय तग धरेल हे ही माहित नाही.. तरीही ते पेरल्यामुळं सुयशच्या मते त्या भूभागावर त्याचा हक्क प्रस्थापित झालाय. त्यामुळं जरी त्याच्याआधी ४-५ जणांनी या बीर ताविलला आपला देश म्हणून घोषित केलं असलं तरी सुयशच्या मते तोच इथला खरा राजा आहे. 


आता म्हणे तो या देशाच्या मान्यतेसाठी युनायटेड नेशन्सनाही साकडं घालणार आहे. मंडळी, तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं? शुद्ध आचरटपणा की धाडसी कल्पकता? कमेंट्समध्ये आम्हांला नक्की सांगा..

सर्व फोटोज सुयश दिक्षितच्या फेसबुक वॉलवरून साभार..

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required