तब्बल ३०० शस्त्रांचा साठा असलेलं पुण्यातील हे शस्त्रसंग्रहालय तुम्हाला नक्कीच माहित नसेल....

पुण्यातलं केवळ शस्त्रांना समर्पित असलेलं वस्तुसंग्रहालय तुम्हाला माहित आहे का ? माहित नसल्यास ही माहिती नक्की वाचा.
आम्ही बोलत आहोत सिंहगड रोडवरील नव्याकोऱ्या ‘वीर बाजी पासलकर शस्त्रसंग्रहालयाबद्दल’. शस्त्रांच्या मार्फत इतिहास समजून घेण्यासाठी या शस्त्रसंग्रहालयाची स्थापना झाली आहे. इथल्या शास्त्रांची संख्या बघितली तर या शस्त्रसंग्रहालयाने किती मोठा इतिहास जपलाय याचा अंदाज येईल. शस्त्रसंग्रहालयात तब्बल ३०० हून अधिक शस्त्र आहेत.
या शस्त्रसंग्रहालयातील शस्त्र ही विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजे १६०० ते १८०० च्या शतकातील आहेत. खंजीर, तलवार, परशु, भाला, चिलखत, बिचवा, पिस्तुल, वाघनखे, इत्यादी इतिहासात फक्त वाचून माहित असलेली शस्त्र इथे पाहायला मिळतात. उत्तर भारतात प्रसिद्ध असलेली रामप्यारी नावाची कट्यार देखील संग्रहालयात आहे.
वीर बाजी पासलकर शस्त्रसंग्रहालयाची खासियत म्हणजे तिथे वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागाचा आपला इतिहास आहे. उदाहरणार्थ, चिलखत आणि चिलखत भेदणाऱ्या शस्त्रांचा विभाग, खंजीरांचा विभाग. इथे ठेवलेला आडकित्ता पण बघण्यासारखा आहे. हा आडकित्ता सुपारी फोडण्यासाठी तर उपयोगाचा होताच, पण वेळ पडल्यास त्याचा खंजिरासारखा वापर देखील करता यायचा.
वीर बाजी पासलकर शस्त्रसंग्रहालयात याहून बरंच काही बघण्यासारखं आहे. तुम्ही कधी जाताय ??