computer

भारतीय राजा आणि ब्रिटिशांनी नाकारलेल्या ऑस्ट्रेलियन राणीची शोकांतिका! मॉली आणि मार्तंड यांची गोष्ट वाचून घ्या..

प्रेमकहाण्या जगाला नवीन नाहीत. प्रत्येक प्रेमकहाणीतील पात्रे नि चेहरे वेगळे असतात, त्यांचे देश, वेश वेगळे असतात, भाषा वेगळी असते. पण प्रत्येक प्रेमकहाणीचं सूत्र तेच असतं. बॉय मीटस् गर्ल सूत्र. इथं आधी एकमेकांना अनोळखी असलेले मुलगा मुलगी अचानक भेटतात, एकमेकांना हृदय देऊन बसतात, पण त्यांचं एकत्र येणं विनासायास कधीच होत नाही. कोणी ना कोणी त्यांच्या प्रेमात अडथळा निर्माण करतं. ती अडथळयांची शर्यत पार पडली की मग हे प्रेमवीर सुखेनैव नांदू लागतात. कोणत्याच प्रेमकहाणीमध्ये यापेक्षा वेगळं घडत नाही.
सर्वसाधारणपणे प्रेमी जोडप्याचं एकमेकांशी लग्न झालं की कहाणी संपते. लैलाची "अहो, ऐकलंत का?" विचारणारी बायको होते नि मजनूचा "हिला विचारून सांगतो" म्हणणारा नवरा होतो. रोमान्स संपला की प्रेमकहाणी संसाराची कहाणी होते. काही कहाण्या अपवाद असतात. चला भेटू या अशा जोडप्याला ज्यांच्या प्रेमात खलनायक उगवले त्यांचं लग्न झाल्यानंतर!

एसमे सॉरेट फिंक(मॉली)चा जन्म ऑस्ट्रेलियात १८९४ मध्ये झाला. तिचे वडिल ऑस्ट्रेलियन आणि आई टास्मानियन होती. तिचे वडील यशस्वी वकील होते. एप्रिल १९१५ ला ती सिडनीमध्ये असताना तिची भेट मार्तंड भैरव तोंदिमन या भारतीय राजाशी झाली. ते पुदुकोत्ताईचे महाराज होते. ते तिच्यापेक्षा १९ वर्षांनी मोठे होते. त्यांची भेट झाली त्याच वर्षी ते मेलबर्न येथे विवाहबद्ध झाले. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी या घटनेची नकारात्मक दखल घेत जोरदार निषेध नोंदवला आणि प्रतिकाराची पहिली ठिणगी पडली. आपल्या देशातील सुंदर मुलीने जोडीदार म्हणून भारतीय वंशातील तरुणाची निवड करावी हे त्यांच्या पचनी पडले नाही. भारतात देखील याहून वेगळं काही घडलं नाही.

तेव्हा भारतात पंचम जॉर्जचे शासन होते. पंचम जॉर्जने या विवाहास अधिकृत मानण्यास नकार दिला. राजाशी लग्न झाल्याने ओघानेच मिळणारे ‘राणी’ हे पद तिला या नकारामुळे भूषवता आले नाही. राजाचे पद मोठे असल्याने त्याला सरळसरळ दुर्लक्षित करणे शक्य नसल्याने ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन शासकीय अधिकाऱ्यांना या दोघांशी कमीतकमी संपर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. संवाद साधण्याची गरज निर्माण झालीच तर तो खाजगी पातळीवर असावा असे सांगण्यात आले.

लग्नानंतर १९१५ मध्ये जेव्हा मॉली भारतात आली तेव्हा भारतीयांनी तिचे उत्साहात स्वागत केले. परंतु ब्रिटिश सरकारने तिने देश सोडून निघून जावे म्हणून तिच्यावर दबाव आणला. हे लग्नबंधन संपुष्टात यावे म्हणून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रयत्न झाले की माणुसकीवरचा विश्वास उडून जावा. सरकार तरी काय माणसांचेच बनते ना? पण माणसे करणार नाहीत एवढी क्रूरतेची परिसीमा गाठली गेली. ती गर्भवती असताना तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला. कन्हेरी या अत्यंत विषारी वनस्पतीचा अर्क तिला पाजण्यात आला. या घटनेनंतर मार्तंड महाराजास तिच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली. त्यासाठी तिला पुदुकोत्ताईला न ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला. उटकमंड येथे तिच्यासाठी स्वतंत्र घर घेण्याचा त्याचा मनसुबा होता. पण त्याला परवानगी नाकारण्यात आली.

१६ एप्रिल १९१६ ला दोघांनी भारत देश सोडला, पुन्हा कधीही परतून न येण्यासाठी.

त्यानंतर ते सिडनी येथे स्थायिक झाले. डबल बे येथील वाटरफ्रंट मॅन्शनमध्ये वास्तव्य करू लागले. २२ जुलै १९१६ ला मॉलीने एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव मार्तंड सिडनी. आपल्या लग्नाला ब्रिटिश सरकारची अधिकृत मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करण्याच्या भूमिकेतून राजाने मद्रासचे गवर्नर लार्ड विलिंग्डन यांच्याशी संपर्क साधला. विलिंग्डनने या प्रकरणात लार्ड क्रोमरची मदत मागितली. त्याने मार्तंड विषयी काढलेले उद्गार उल्लेखनीय आहेत. तो म्हणतो, "मार्तंड भैरवसारख्या एकनिष्ठ, स्वच्छ आणि प्रामाणिक वर्तन असलेल्या व्यक्तीस ब्रिटिशांनी सहकारी करायला हवं". पण या मध्यस्थीचा फारसा उपयोग झाला नाही.

१९२० साल संपताना एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले की मार्तंड सिडनीला हा पुदुकोत्ताईच्या अधिकृत, कायदेशीर वारसाचा दर्जा मिळणार नाही. मार्तंड भैरवला आपल्या राजेपदाचा त्याग करण्याचा सल्लादेखील दिला गेला. त्याने राजासन सोडल्यावर त्या जागी त्याचा भाऊ राजगोपाल याला नियुक्त करण्याचा ब्रिटिशांचा मानस होता. आपला अधिकार सोडण्याच्या बदल्यात ब्रिटिश त्याला वार्षिक पेंशन देणार होते. त्यांनी त्याला युरोपला जाऊन इतर उद्योगात स्वतःला गुंतवावे हाही सल्ला दिला. त्याने पुदुकोत्ताईला परतू नये ही त्यांची योजना होती.

२८ मे १९२८ मध्ये राजाचे निधन झाले. अंत्यविधिसाठी त्याचं निष्प्राण शरीर भारतात आणण्याच्या तयारीत असलेल्या मॉली नि तिच्या मुलाला ब्रिटिशांनी अडवलं. मार्तंड भैरवचा अंत्यविधि दहन हिन्दू धर्मातील विधिनुसार लंडनमध्ये झाला. त्याची रक्षा लंडनच्या गोल्डर्स ग्रीन क्रिमेटोरियम मध्ये ठेवली गेली. यानंतरच मॉलीचे आयुष्य नाटयपूर्ण होते.

लंडन, फ्रान्स आणि यु. एस. ए. अशा तीन ठिकाणी तिला आपला वेळ विभागून द्यावा लागला. महायुध्दाच्या काळात न्यूयॉर्कमध्ये बोन्विट टेलर अँड कंपनी या फॅशनेबल क्लोथिंग सेंटरमध्ये तिने काम केले. युनायटेड सर्व्हिस ऑरगनायझेशंस फॉर नॅशनल डिफेन्ससाठी तिने कलेक्शन देखील सुरु केले. तिथेही पैशाची अफरातफर केल्याचा आरोप तिच्यावर झाला. एफबीआयने तिला दोषमुक्त केलं खरं, पण नंतर तिच्या मुलाने चोऱ्या करायला सुरुवात केली. १९४५ मध्ये दागिन्यांची चोरी करताना तो सापडल्यानंतर त्याला अटक झाली. मॉलीने मुलाबरोबरचे सर्व संबंध तोडले. युद्धानंतर ती प्रामुख्याने लंडनमध्ये राहिली. १९६७ मध्ये तिने इंग्लंडमधील बाथ येथील कॉसच्युमच्या संग्रहालयाला आपली महागडी वस्त्रे देऊन टाकली.

असाध्य कर्करोगाने तिचं शरीर पोखरुन टाकलं. २० नोव्हेंबर १९६७ रोजी तिनं या जगाचा निरोप घेतला. अखेरचा श्वास तिनं कान्स येथे घेतला.

सबस्क्राईब करा

* indicates required