युवराज सिंग निवृत्त होऊन ३ वर्ष पूर्ण, खास व्हिडिओ शेअर करत झाला भावूक; पाहा व्हिडिओ...

आयसीसी अंडर १९ विश्वचषक, आयसीसी वनडे विश्वचषक आणि आयसीसी टी -२० विश्वचषक जिंकणं हे कुठल्याही क्रिकेटपटूसाठी स्वप्नं असू शकतं. मात्र हे स्वप्नं खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगणारा क्रिकेटपटू म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) . आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांमध्ये त्याने भारताला जेतेपद मिळवून दिले होते, इतकेच नव्हे तर मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला होता. अशा या दिग्गजाने १९ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देत १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. त्याने निवृत्ती जाहीर करून आज (१० जून) ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (yuvraj singh retirement video)

तीन वर्षांपूर्वी युवराज सिंगने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली होती. त्याच्या या निर्णयानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांचे हृदय तुटले होते. त्याने २००० साली आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याने आयसीसी अंडर १९ विश्वचषक, आयसीसी वनडे विश्वचषक, आयसीसी टी -२० विश्वचषक आणि आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तर भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. असा पराक्रम आजवर कुठल्याही भारतीय फलंदाजाला करता आला नाहीये. त्याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. हेच कारण आहे की, त्याला मॅचविनर खेळाडू देखील म्हटले जाते.

नुकताच त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर त्याने लिहिले आहे की, " आज मी निवृत्त होऊन ३ वर्षे उलटून गेली आहेत. तरीदेखील तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम कमी झालं नाहीये. मला नेहमी सपोर्ट करणाऱ्या माझ्या मित्रांचे, माझ्या कुटुंबाचे आणि चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी हा एक व्हिडिओ शेअर करतोय. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप अमूल्य आहे.

It’s been 3 years today to the day I hung up my boots but your love for me has only grown by leaps and bounds!

Thank you my friends, family and fans for always supporting me in every way possible and putting together this heartfelt video.

Your affection is priceless ❤️ pic.twitter.com/dMyMB1WOUm

— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 10, 2022

"

 

अशी राहिली आहे कारकीर्द..

युवराज सिंग याने आपल्या १९ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत वनडे, टी -२० आणि कसोटी क्रिकेट या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाला मोलाचे योगदान दिले. त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये ३३.९३ च्या सरासरीने १९०० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३ शतक आणि ११ अर्धशतक झळकावले होते. तर ३०४ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या होत्या. ज्यात १४ शतक आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २८.०२ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या होत्या. ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश होता.

कॅन्सर सारख्या भयानक आजाराला दिली कडवी झुंज..

युवराज सिंग हे नाव केवळ मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेर देखील आदराने घेतलं जातं. त्यामागचं कारण असं की, रक्ताच्या उलट्या होत असताना देखील हा पठ्ठा भारतीय संघासाठी विश्वचषक स्पर्धेत एक मजबूत भिंत म्हणून उभा होता. त्याने २०११ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या क्वाटर फायनलच्या झुंजार खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विश्वचषक स्पर्धा जिंकून दिल्यानंतर जेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यावेळी त्याला कॅन्सर असल्याचे समोर आले होते. त्याच्या फुफ्फुसात रक्ताची गाठ असल्याचे समोर आले होते. या गंभीर आजारामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता. परदेशात उपचार सुरू असताना संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्यासाठी प्रार्थना करत होतं. पूर्णपणे ठीक झाल्यानंतर २०१२ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून जोरदार पुनरागमन केले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required