On this day: सकलेन मुश्ताकने आजच्याच दिवशी घेतली WC स्पर्धेतील दुसरीच हॅट्ट्रिक, वाचा त्या सामन्याबद्दल अधिक

पाकिस्तान संघाचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकसाठी आजचा (११ जून ) दिवस खूप खास आहे. या दिवशी असं काहीतरी घडलं होतं जे आजही क्रिकेट चाहत्यांना लक्षात असेल. २३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सकलेन मुश्ताकने विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. ११ जून १९९९ रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले होते. लंडनच्या ओव्हल मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात सकलेन मुश्ताकने हॅट्ट्रिक घेत सर्वांना आश्चर्यचकित चकित केले होते. त्यावेळी ही विश्वचषक स्पर्धेतील केवळ दुसरीच हॅट्ट्रिक होती.(Saqlain mushtaq hattrick) 

ओव्हलच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाला सलामीवीर फलंदाज सईद अन्वर आणि वजाहतुल्लाह वस्ती यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ९५ धावा जोडल्या होत्या. वजाहतुल्लाह ४० धावा करत माघारी परतला तर, अनवरने १०३ धावांची खेळी केली होती. तर शाहिद आफ्रिदीने ३७ आणि इंजमाम उल हकने २१ धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला ९ बाद २७१ धावा करण्यात यश आले होते. झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी करताना हिथ स्ट्रिक आणि ओलांगाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले होते.

या धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तान संघाकडून ४० वे षटक टाकण्यासाठी सकलेन मुश्ताक गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने पहिल्या चेंडूवर हेनरी ओलांगाला यष्टीचीत करत माघारी धाडले. तर दुसऱ्या चेंडूवर ऍडम हकले देखील ओलांगाप्रमाणे यष्टीचीत होऊन माघारी परतला. आता तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करून सकलेन मुश्ताकला हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. या संधीचा पुरेपूर लाभ घेत त्याने तिसऱ्या चेंडूवर पॉम्पी म्बांग्वाला पायचीत करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह त्याने आपली वनडे क्रिकेटमधील दुसरी तर विश्वचषक स्पर्धेतील पाहिली हॅट्ट्रिक पूर्ण केली होती.

त्यावेळी विश्वचषक स्पर्धेतील ही केवळ दुसरीच हॅट्ट्रिक होती. यापूर्वी भारतीय गोलंदाज चेतन शर्मा यांनी १९८७ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. त्यांनी न्यूझीलंड संघातील केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवेन चेटफिल्ड यांना बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. आतापर्यंत वनडे विश्वचषक स्पर्धेत असे ११ गोलंदाज आहेत ज्यांना हॅट्ट्रिक पूर्ण करण्यात यश आले आहे. ज्यामध्ये चेतन शर्मा, सकलेन मुश्ताक, चामिंडा वास, ब्रेट ली, लसिथ मलिंगा, केमार रोच, स्टीवन फिन, जेपी ड्यूमिनी,मोहम्मद शमी आणि ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे. तर लसिथ मलिंगाने दोन वेळेस वनडे विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेतली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required