कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे टॉप -३ गोलंदाज, एकही भारतीय गोलंदाज नाही..

क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. हा खेळ सुरू होऊन १५० पेक्षा अधिक वर्ष उलटून गेली आहेत. टी -२० आणि वनडे क्रिकेटच्या काळात आजही अनेक क्रिकेट चाहते आहेत, ज्यांना ५ दिवस चालणारा कसोटी सामना पाहण्याची ओढ लागलेली असते. कारण कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांची क्षमता दिसून येत असते. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक असे दिग्गज फलंदाज होऊन गेले ज्यांनी मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तर काही दिग्गज गोलंदाज देखील होऊन गेले आहेत ज्यांनी केलेले विक्रम आजही अजरामर आहेत. या लेखातून आपण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या टॉप -३ गोलंदाजांबद्दल अधिक माहिती देणार आहोत.
१) मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) :
मुथय्या मुरलीधरनला कसोटी क्रिकेटचा जादूगार म्हटले जायचे. आगळ्या वेगळ्या ॲक्शनने गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाचा चेंडू टप्पा पडताच इतका फिरायचा की, फलंदाज आश्चर्यचकित व्हायचा. श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने एकूण १३३ कसोटी सामने खेळले. ज्यात त्याने एकूण ८०० गडी बाद केले. या दरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी केवळ २.४७ होती. यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की, हा गोलंदाज किती घातक गोलंदाज होता.
२) शेन वॉर्न (Shane Warne) :
या यादीत दुसऱ्या स्थानी आहे तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न. वॉर्नची गोलंदाजी समजणं भल्या भल्या दिग्गजांनाही कठीण जात असे. बॉल ऑफ द सेंच्युरी टाकणाऱ्या या गोलंदाजाने काही महिन्यांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण १४५ सामने खेळले. ज्यात त्याने २.६५ च्या इकोनॉमिने ७०८ गडी बाद केले.
३) जेम्स अँडरसन (James Anderson) :
तर तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. त्याने आतापर्यंत ६५० गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या स्विंग गोलंदाजीची जादू अजूनही पाहायला मिळते. त्यामुळे ही आकडेवारी वाढण्याची दाट शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ६५० गडी बाद करणारा तो पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. त्याने आपल्या १७१ व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.
काय वाटतं असा कोण गोलंदाज आहे जो मुथय्या मुरलीधरनचा सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मोडू शकतो.? कमेंट करून नक्की कळवा..