computer

चक्क उंदीर सेवानिवृत्त होतोय? पण त्यांने कोणतं मोठं काम केलं आहे? वाचा हिरो रॅटबद्दल!!

उंदीर म्हणले की काय आठवते? त्रास हो ना? म्हणजे घरात घुसून कपडे फाडणारा, अन्नधान्याची नासधूस करणारा, शेतकऱ्यांनी साठवलेले धान्य खाऊन त्रास देणारा, कागद कुरतडणारा.. थोडक्यात, हा प्राणी नकोच असतो. पण कोणी सांगितले या उंदराने अनेकांचे प्राण वाचवले तर? विश्वास नाही बसणार ना! हे खरच घडले आहे, गेले पाच वर्ष तो हे काम इमानाने करतोय आणि आता मानाने निवृत्ती घेतोय. कोण आहे हा हिरो रॅट?

कंबोडियामध्ये तब्बल ७१ सुरुंग तसेच कित्येक स्फोटक शोधून हजारो जणांचे प्राण वाचवणारा मागवा उंदीर नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. वयोमानानुसार त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी होऊ लागल्याने तो आता सेवानिवृत्त झाला आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मागवाला PDSA संस्थेने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं होतं. गेल्या ७७ वर्षांमध्ये हा सन्मान मिळवणारा मागवा हा असा पहिलाच उंदीर आहे. दरवर्षी हा सन्मान कुत्र्यांना देण्यात येतो. याला 'हिरो रॅट' असेही म्हणले जाते.

मागवा या उंदराचे वजन १.२ किलो आहे आणि तो फक्त ७० सेंटिमीटर लांब आहे. इतर उंदरांच्या जातीपेक्षा हा उंदीर हलका असतो. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी टांझानिया येथील अपोपो ही संस्था १९९० सालापासून उंदरांना प्रशिक्षण देत आहे. मागवाला तिथेच प्रशिक्षण दिले होते. गेली ५ वर्षे मागवाने खूप चांगली कामगिरी केली. या उंदराचे आयुष्य ८ वर्षांपर्यंत असते.

मागवा या उंदाराचे वजन अतिशय कमी असते, म्हणजे इतर उंदरांच्या जातीपेक्षा तो हलका आहे. त्यामुळे मागवा हा उंदीर एखाद्या सुरुंगावरुन चालला तरी स्फोट होत नाही. तसेच धातूचा कचरा टाळून त्यामधून सुरुंग शोधण्याची कला या उंदराला आहे. तसे प्रशिक्षण दिले असते. त्याच्या याच गुणधर्मामुळे त्याने अनेक माणसांचे जीव वाचवले आहेत. त्याची काम करण्याची क्षमता सांगायची झाल्यास एका टेनिस कोर्टएवढ्या मैदानातून तो अवघ्या २० मिनिटांमध्ये सुरुंग शोधू शकतो. इतक्या लवकर ही कामगिरी करणारा मागवा पहिलाच उंदीर ठरला आहे.

अशा या उंदराला क्षुद्र प्राणी म्हणावा का, असाच प्रश्न पडतोय.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required