computer

कोलकाताच्या वैज्ञानिकाने तयार केलय पॉकेट व्हेंटिलेटर....हे व्हेंटिलेटर काम कसं करतं?

जगभरात गेल्या एक दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत भारतात अतिशय गंभीर परिस्थिती बनली होती. अजूनही बऱ्याच ठिकाणी परिस्थिती  वाईट आहे. व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. पण अश्यावेळी कोलकत्ता येथील शास्त्रज्ञाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना श्वास घेणे सहज शक्य होणार आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी पॉकेट व्हेंटिलेटर तयार केले आहे. या अनोख्या शोधासाठी त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.

कोलकातामधील  डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी हे स्वतः व्यवसायाने अभियंता आहेत. त्यांना कोरोना संसर्ग झाला तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी खूप खाली गेली होती.  SpO2 लेव्हल 88 पर्यंत खाली आली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्याच वेळेस त्यांना असे काही उपकरण बनवता येईल असा विचार मनात आला. बरे झाल्यावर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली आणि फक्त वीस दिवसांत त्यांनी २५० ग्रॅम वजनाचे पॉकेट व्हेंटिलेटर तयार केले. एकदा चार्ज केल्यानंतर हे व्हेंटिलेटर आठ तासांपर्यंत काम करू शकते अन्ड्रॉइड फोनच्या चार्जनंही हे चार्ज केलं जाऊ शकते.हे छोटेसे व्हेंटिलेटर रुग्णासाठी सहज कुठेही नेता येण्यासारखे आहे.

या व्हेंटिलेटरची किंमतही कमी आहे आणि तो रुग्णालयात वापरल्या जाणार्‍या अवजड सीपीएपीला (continuous positive airway pressure)  एक स्वस्त पर्याय ठरू शकतो. या उपकरणाचे दोन भाग आहेत - माउथपीससह एक पॉवर युनिट आणि व्हेंटिलेटर युनिट. हे युनिट एकदा चालू केल्यानंतर व्हेंटिलेटर बाहेरून हवा आत येते आणि ती अल्ट्रा-व्हायलेट (यूव्ही) चेंबरमधून जाते. यूव्ही चेंबरमधून हवा गेल्याने जंतू मरतात. नंतर  हवा माउथपीसमधून वाहाते, त्यामुळे श्वसन प्रणालीमध्ये वायुप्रवाह वाढतो.  एखाद्या व्यक्तीस कोविडचा संसर्ग झाला असला तरीही  यूव्ही फिल्टर श्वासोच्छ्वास सोडल्यानंतर डिव्हाइसमधून हवा सोडण्यापूर्वी व्हायरस नष्ट करतो.  त्यामुळे जंतुसंसर्ग बाहेर पसरत नाही.

कोरोनानंतर होणाऱ्या काळ्या बुरशीच्या संसर्ग वाढ होतेय, त्यांच्यासाठीही  हे उपकरण सुरक्षित पर्याय ठरू शकतो असा दावा डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी केला आहे. हे उपकरण  व्हेंटिलेटरची कमतरता असताना  नक्कीच वरदान ठरू शकते. कोरोनाविरोधात लढा द्यायला असे नवनवीन उपाय येत आहेत, त्यामुळे ही  लढाई आपण लवकरच जिंकू अशी आशा करायला हरकत नाही.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required