‘फक्त अॅन्ड्रॉइड फोन वापरायचा’ – झुक्या भाउंचा आदेश....वाचा त्यांनी हा आदेश का दिला आहे ते !!

ॲपल आणि फेसबुक या दोन्ही जगातल्या महत्वाच्या कंपन्या आहेत. पण दोघातले संबंध मात्र ताणलेले आहेत राव. आता हेच बघा ना, नुकतंच ‘मार्क झुकरबर्ग’ने आपल्या व्यवस्थापक मंडळाला फक्त अॅन्ड्रॉइड फोन वापरण्याचा आदेश दिला आहे. त्याने असा तडकाफडकी निर्णय का घेतला ? चला जाणून घेऊया.
ॲपलचे CEO टीम कुक यांनी फेसबुकला टोमणा मारताना “व्यक्तिगत जीवनात लुडबुड करणारी सेवा” असं म्हटलं होतं. झुकरबर्गला हे काही पटलं नाही. याबद्दल त्याने उघड उघड नाराजीही व्यक्त केली होती. असं म्हणतात की फेसबुक कंपनीतून ॲपल हद्दपार होण्यामागे हेच कारण आहे.
टीम कुकने आपलं हे मत मार्च मध्ये एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. त्यांना हेही विचारण्यात आलं की केंब्रिज ऍनालिटिका घोटाळ्यात तुम्ही अडकला असता तर तुम्ही काय केलं असतं. त्यावर ते म्हणाले “मी अशा परिस्थितीत अडकलोच नसतो.”
मंडळी, गोष्ट दिसते तेवढी सरळ नाहीये. झुकरबर्ग भाऊने स्पष्ट असं कुठेही म्हटलेलं नाही की त्यांनी टीम कुकच्या वक्तव्यामुळे अॅन्ड्रॉइड वापरण्याचा आदेश दिला. उलट त्याने म्हटलं की ‘अॅन्ड्रॉइड हे जगातील एक लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम असल्याने मी कर्मचाऱ्यांना अॅन्ड्रॉइड वापरण्याचा ‘सल्ला’ दिला आहे.’ याचाच पुरावा म्हणजे डेव्हिड मोर्कस सारखे फेसबुकचे महत्वाचे कर्मचारी ॲपल फोन वापरताना आढळले आहेत. याचा अर्थ या निर्णयाला टीम कुक हे पूर्णपणे जबाबदार नाहीत किंवा झुक्या भाऊला हे उघड सांगायचं नाही.
मंडळी, यातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की फेसबुक आणि ॲपल मध्ये बेबनाव आहे.